निर्देशांकांची पुन्हा गटांगळी

पीटीआय
गुरुवार, 16 मे 2019

येस बॅंक, टाटा मोटर्सला फटका  
येस बॅंक आणि टाटा मोटर्सच्या समभागात आज सर्वाधिक ८ टक्के घसरण झाली. इंड्‌सइंड बॅंक, कोल इंडिया, सन फार्मा, पॉवर ग्रीड, भारती एअरटेल, ॲक्‍सिस बॅंक, टाटा स्टील, एचयूएल, मारुती, एम अँड एम, आयसीआयसीआय बॅंक, एचडीएफसी आणि आरआयएल या कंपन्यांच्या समभागात ३.६६ टक्‍क्‍यांपर्यंत घसरण झाली.

मुंबई - सलग नऊ सत्रांतील घसरणीनंतर सावरलेल्या शेअर बाजारात बुधवारी पुन्हा अस्थिरतेचे वारे निर्माण झाले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स २०३ अंशांची घसरण होऊन ३७ हजार ११४ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी ६५ अंशांची पडझड होऊन ११ हजार १५७ अंशांवर बंद झाला.

सेन्सेक्‍स आणि निफ्टीमध्ये आज मोठ्या प्रमाणात अस्थिरता पाहायला मिळाली. सेन्सेक्‍समध्ये आज दिवसभरात सुमारे पाचशे अंशांचे चढउतार झाले. सेन्सेक्‍स आज दिवसभरात ३७ हजार ४७ अंश या नीचांकी, तर ३७ हजार ५५९ या उच्चांकी पातळीवर पोचला होता. अखेर तो मागील सत्राच्या तुलनेत २०३ अंशांची घसरण होऊन ३७ हजार ११४ अंशांवर बंद झाला. शेअर बाजारात सलग नऊ सत्रांत सुरू असलेले घसरणीचे वारे मंगळवारी (ता. १४) थांबले होते. आज पुन्हा ते सुरू झाले.

बजाज फायनान्सला फायदा 
बजाज फायनान्सच्या समभागात आज सर्वाधिक ४.११ टक्के वाढ झाली. त्याखालोखाल आयटीसी, कोटक बॅंक, इन्फोसिस आणि टीसीएस यांच्या समभागात १.०५ टक्‍क्‍यांपर्यंत वाढ झाली. 

घसरणीची कारणे 
  परकी निधीचा बाहेर चाललेला ओघ 
  गुंतवणूकदारांचे नफेखोरीला प्राधान्य 
  निवडणूक निकालाकडे बाजाराचे लक्ष 
  जागतिक पातळीवरील संमिश्र परिस्थिती


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sensex Decrease Share Market