‘कोरोना’ची दहशत कायम; सेन्सेक्‍स ८०७ अंशांनी गडगडला  

पीटीआय
Tuesday, 25 February 2020

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स ८०६ अंशांच्या घसरणीसह ४० हजार ३६३ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी २५१ अंशांची घसरण होऊन ११ हजार ८२९ अंशांवर बंद झाला. 

मुंबई - ‘कोराना’ विषाणूचा संसर्ग जगभरात इतर देशांमध्ये वाढत असल्याने जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. याचा जगभरातील गुंतवणूकदारांनी धसका घेतला असून, याचे पडसाद देशांतर्गत शेअर बाजारात सोमवारी उमटले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स ८०६ अंशांच्या घसरणीसह ४० हजार ३६३ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी २५१ अंशांची घसरण होऊन ११ हजार ८२९ अंशांवर बंद झाला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे आज भारतात आगमन झाले. ट्रम्प यांच्या या दौऱ्याच्या पार्श्‍वभूमीवर शेअर बाजारात तेजी येईल, अशी अपेक्षा होता; परंतु जागतिक पातळीवरील घसरणीच्या वातावरणामुळे देशांतर्गत शेअर बाजारात आज सकाळपासूनच गुंतवणूकदारांनी विक्रीचा सपाटा लावला होता. यामुळे आज दिवसअखेर सेन्सेक्‍स व निफ्टी निर्देशांकांतील सर्व अनुक्रमे ५० व ३० कंपन्यांचे समभाग घसरणीसह बंद झाले. यामध्ये हिंदाल्को, जिंदाल स्टील, टाटा स्टील, वेदांता, सेल, नाल्को, कोल इंडिया, हिंदुस्थान झिंक, एनएमडीसी व टाटा मोटर्स या कंपन्यांच्या समभागांमध्ये सर्वाधिक घसरण झाली. 

गुंतवणूकदारांना फटका
शेअर बाजारात आज झालेल्या पडझडीत गुंतवणूकदारांना सुमारे ३.१८ लाख कोटी रुपयांचा फटका बसला.  बाजारातील सूचीबद्ध कंपन्यांचे बाजारभांडवल आज १५८.५१ लाख कोटी रुपयांवरून १५५.३३ लाख कोटी रुपयांवर घसरले.

घसरणीची कारणे
देशांतर्गत पातळीवर : आठवड्याअखेर तिसऱ्या तिमाहीची एकूण देशांतर्गत उत्पन्नाची (जीडीपी) आकडेवारी जाहीर होणार आहे. तज्ज्ञांच्या मते, मंदीमुळे विकासदर आणखी घसरण्याची शक्‍यता आहे. 

जागतिक पातळीवर : कोरोना विषाणूचा संसर्ग आता इतर देशांमध्ये झाला आहे. चीनपाठोपाठ आता दक्षिण कोरियामध्ये कोरोना विषाणूमुळे ७ जणांचा बळी गेल्याने चिंतेत भर पडली आहे. त्याचबरोबर सिंगापूर, इटली आणि इतर देशांमध्ये कोरोना विषाणूचे रुग्ण वाढले आहेत. यामुळे हॅंगसेंग आणि शांघाई निर्देशांक कोसळले. इटलीचा मुख्य शेअर बाजार असलेला मिलान शेअर निर्देशांकही तीन आठवड्याच्या नीचांकी पातळीवर आला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sensex ends 800 points