सेन्सेक्‍स : आता लक्ष्य 41 हजारांचे! 

पीटीआय
Tuesday, 26 November 2019

सेन्सेक्‍सची आता 41 हजारांच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीदेखील 159 अंशांच्या वाढीसह 12 हजार 084 अंशांवर व्यवहार करत बंद झाला.

मुंबई - भारतीय शेअर बाजारात आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍सने ऐतिहासिक उच्चांकी पातळी गाठली. दिवसअखेर सेन्सेक्‍स 529 अंशांच्या वाढीसह 40 हजार 889 अंशांवर बंद झाला. इंट्राडे व्यवहारात सेन्सेक्‍सने 40 हजार 931 अंशांची ऐतिहासिक उच्चांकी पातळी गाठली. सेन्सेक्‍सची आता 41 हजारांच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीदेखील 159 अंशांच्या वाढीसह 12 हजार 084 अंशांवर व्यवहार करत बंद झाला. निफ्टी आता 12 हजार 103 या आधीच्या उच्चांकापासून थोडाच दूर आहे. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

जागतिक पातळीवर अमेरिका- चीन व्यापारयुद्ध निवळण्याच्या दृष्टीने नव्याने आशावाद निर्माण झाला आहे. वर्षाच्या अखेरीस अमेरिका-चीन यांच्यात प्राथमिक व्यापार करारावर स्वाक्षऱ्या होण्याची शक्‍यता आहे. परिणामी जागतिक बाजारातील सकारात्मक संकेतांनी भांडवली बाजारातील मूड बदलल्याचे चित्र आहे. तसेच, मुख्यत्वे दूरसंचार, मेटल आणि वाहन कंपन्यांच्या शेअरमध्ये झालेल्या वाढीमुळे शेअर बाजाराने नवीन उच्चांक गाठला आहे. 

आज सेन्सेक्‍सने नोंदविलेल्या उच्चांकात भारती एअरटेलचा वाटा मोठा होता. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सकारात्मक कामगिरी करणारा भारती एअरटेलचा शेअर 8 टक्‍क्‍यांनी वधारला होता. तर, दुसरीकडे अमेरिका-चीन सकारात्मक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर स्टील उत्पादक कंपनी टाटा स्टीलच्या शेअरमध्ये 5 टक्‍क्‍यांची वाढ नोंदविण्यात आली. 

खासगी क्षेत्रातील येस बॅंक आणि सार्वजनिक क्षेत्रातील ओएनजीसी वगळता जवळजवळ सर्वच कंपन्यांच्या शेअरमध्ये सकारात्मक व्यवहार होते. येस बॅंकेचा शेअर 1.70 टक्‍क्‍यांच्या घसरणीने 63.70 रुपयांवर बंद झाला, तर ओएनजीसीचा शेअर 2.17 टक्‍क्‍यांच्या घसरणीसह बंद झाला. 

आज राष्ट्रीय शेअर बाजारात बॅंकिंग क्षेत्रातील इंडसइंड बॅंक, ऍक्‍सिस बॅंक, एचडीएफसी, कोटक बॅंक आणि एसबीआय यांचे शेअर प्रत्येकी 2 ते 3.5 टक्‍क्‍यांनी वधारले. तर, ऑटो क्षेत्रातील हीरो मोटोकॉर्प, टाटा मोटर्स आणि मारुती या कंपन्यांच्या शेअरमध्ये 1.5 ते 2.5 टक्‍क्‍यांची तेजी होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sensex jumps 530 pts