esakal | पुन्हा ‘लॉकडाउन’? पुन्हा शेअर खरेदीची संधी?

बोलून बातमी शोधा

share_20market

काही काळापासून निर्देशांकातील तेजीला बाधा होऊन दम लागला असला तरी अनेक कंपन्यांचे शेअर मात्र तेजीचा डोस घेऊन वधारत असल्याचे दिसत आहे.

पुन्हा ‘लॉकडाउन’? पुन्हा शेअर खरेदीची संधी?
sakal_logo
By
भूषण गोडबोले

गेल्या आठवड्यात ‘सेन्सेक्स’ ४९,५९१ अंशांवर, तर ‘निफ्टी’ १४,८३४ अंशांवर बंद झाला. ‘कोरोना’च्या दुसऱ्या लाटेमुळे ठिकठिकाणी पुन्हा नव्या स्वरूपात ‘मिनी लॉकडाउन’, जमावबंदी, संचारबंदी, वर्क फ्रॉम होम, त्यातच लसींचा झालेला तुटवडा आदी प्रकारांमुळे निर्देशांकाच्या तेजीला लगाम लागल्याचे चित्र समोर येत आहे. गेल्या आठवड्यात शुक्रवारी अमेरिकी शेअर बाजाराने तेजी दाखविल्याने पुढील आठवड्याच्या प्रारंभी सकारात्मक संकेत मिळत आहेत.

तेजीत असणारे शेअर

काही काळापासून निर्देशांकातील तेजीला बाधा होऊन दम लागला असला तरी अनेक कंपन्यांचे शेअर मात्र तेजीचा डोस घेऊन वधारत असल्याचे दिसत आहे. आलेखानुसार, टाटा इलेक्सी, एल अँड टी टेक्नॉलॉजीज, सिप्ला, एलटी फूड्स किंवा दावत आदी अनेक कंपन्यांचे शेअर तेजीचा कल दाखवत आहेत. टाटा इलेक्सी ही टाटा समूहाची एक कंपनी आहे. ती वाहन, प्रसारण, संपर्क, दळणवळण, आरोग्य सेवा आदी अनेक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कंपन्यांना तंत्रज्ञान योजना देणारी जगातील एक अग्रगण्य सॉफ्टवेअर कंपनी आहे. २२ एप्रिल २०२१ रोजी या कंपनीचे निकाल जाहीर होणार आहेत. आलेखानुसार, दोन फेब्रुवारी २०२१ पासून रु. ३०५० ते २५४१ या मर्यादित पातळ्यांमध्येच चढ-उतार दर्शविल्यानंतर या कंपनीच्या शेअरने रु. ३०५० या अडथळा पातळीच्या वर रु. ३१०१ ला बंद भाव देऊन मध्यम अवधीसाठी तेजीचे संकेत दिले आहेत. यामुळे जोपर्यंत या कंपनीच्या शेअरचा भाव रु. २५४० या पातळीच्या वर आहे, तोपर्यंत मध्यम अवधीत चढ-उतार दर्शवत आणखी भाववाढ होणे अपेक्षित आहे.

कोरोनाकाळात वाढलं ‘मेडिक्लेम’चं महत्त्व!

फार्मा कंपन्यांकडे लक्ष

कोविडच्या वाढत्या प्रसारामुळे औषध क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरचे भाव वधारत आहेत. गेल्या आठवड्यात फार्मा किंवा औषध क्षेत्रातील कंपन्यांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या सीएनएक्स फार्मा इंडेक्सने लाक्षणिक तेजी दर्शविली. (आगामी काळात १३,११८ या पातळीच्या वर ‘फार्मा इंडेक्स’ने बंद भाव दिल्यास आणखी तेजी होणे अपेक्षित आहे.) आलेखानुसार, सिप्ला या कंपनीच्या शेअरने गेल्या आठवड्यात रु. ८७८ या पातळीच्या वर रु. ८८२ ला बंद भाव देत मध्यम अवधीच्या आलेखानुसार तेजीचे संकेत दिले आहेत. या कंपनीच्या शेअरचा भाव जोपर्यंत रु. ७३७ या पातळीच्या वर आहे, तोपर्यंत मध्यम अवधीत चढ-उतार दर्शवत आणखी तेजी अपेक्षित आहे.

अर्थभान - कोणती करप्रणाली घेऊ हाती?

शेअर बाजार; तसेच तेजी दर्शविणारे शेअर कधीही दिशा बदलू शकतात. यामुळे मर्यादित भांडवलावरच धोका स्वीकारून व्यवहार करणे हितावह ठरेल. पुन्हा ‘लॉकडाउन’ जाहीर झाल्याने बाजार घसरल्यास शेअर खरेदीची संधी पुन्हा मिळू शकते.

(या लेखातील माहिती अभ्यासाच्या दृष्टिकोनातून दिली गेली आहे. यामुळे प्रत्यक्ष व्यवहार करताना वैयक्तिक गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे नेहमीप्रमाणेच आवश्यक आहे.)
(लेखक ‘सेबी’ रजिस्टर्ड गुंतवणूक सल्लागार आहेत.)