सेन्सेक्‍सची घसरगुंडी !

पीटीआय
Wednesday, 22 January 2020

शेअर बाजारातील घसरणीचे वारे सलग तिसऱ्या सत्रात बुधवारी कायम राहिले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 208 अंशांच्या घसरणीसह 41 हजार 115 अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 62 अंशांची घट होऊन 12 हजार 106 अंशांवर बंद झाला.

मुंबई : ऊर्जा, वीज, वाहननिर्मिती आणि वित्तीय कंपन्यांच्या समभागांवर आज गुंतवणूकदारांकडून विक्रीचा मारा झाला. शेअर बाजारात आज मोठ्या प्रमाणात अस्थिरतेचे वारे पाहायला मिळाले.

सेन्सेक्‍स आज 437 अंशांनी कोसळला होता. नंतर तो काही प्रमाणात सावरला. अखेर मागील सत्राच्या तुलनेत तो 208 अंशांची घसरण होऊन 41 हजार 115 अंशांवर बंद झाला. जागतिक पातळीवरील पतमानांकन संस्थांकडून भारताचा विकास दराचा अंदाज घटविण्यात आला असून, कंपन्यांचे तिमाही निकाल अपेक्षेप्रमाणे लागलेले नाहीत. यामुळे गुंतवणूकदारांमध्ये निराशेचे वातावरण आहे. याचा फटका शेअर बाजाराला बसत आहे. 

आशियाई देशांतील शेअर बाजारांमध्ये आज तेजीचे वातावरण होते. शांघाय, हॉंगकॉंग, टोकियो आणि सोल येथील शेअर बाजार वधारले. युरोपीय देशांतील शेअर बाजारांमध्ये आजच्या सत्राच्या सुरवातीला सकारात्मक वातावरण दिसून आले. 

ओएनजीसीला फटका 
सेन्सेक्‍सच्या मंचावर आज ओएनजीसीच्या समभागात सर्वाधिक 5.13 टक्के घसरण झाली. त्यापाठोपाठ एनटीपीसी, मारुती, कोटक बॅंक, एचडीएफसी, एशियन पेंट्‌स, आयसीआयसीआय बॅंक आणि ऍक्‍सिस बॅंक यांच्या समभागात घसरण झाली. याचवेळी नेस्ले इंडिया, टीसीएस, इन्फोसिस, एचसीएल टेक, एसबीआय आणि भारती एअरटेल यांच्या समभागात 1.86 टक्‍क्‍यांपर्यंत वाढ नोंदविण्यात आली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sensex settles 208 points lower at 41115