शेअर बाजारात धूळधाण..!

पीटीआय
मंगळवार, 17 सप्टेंबर 2019

तेलाच्या भाववाढीमुळे आधीच मंदीच्या फेऱ्यात अडकलेल्या अर्थव्यवस्थेसमोरील अडचणी आणखी वाढणार आहेत. यामुळे गुंतवणूकदार धास्तावले. गुंतवणूकदारांनी विक्रीचा मारा केल्याने शेअर बाजार गडगडला. 

मुंबई : खनिज तेलाच्या भडक्‍यामुळे वित्तीय तूट वाढण्याच्या भीतीने शेअर बाजारात मंगळवारी धूळधाण उडाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 642 अंशांनी कोसळून 36 हजार 481 अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 185 अंशांनी गडगडून 10 हजार 870 अंशांवर बंद झाला. 

खनिज तेलाचे भाव वाढल्याने सरकारवरील चालू खात्यावरील तूट आणि वित्तीय तुटीचा बोजा वाढणार आहे. भारत एकूण गरजेपैकी 70 टक्के खनिज तेल आयात करतो. तेलाच्या भाववाढीमुळे आधीच मंदीच्या फेऱ्यात अडकलेल्या अर्थव्यवस्थेसमोरील अडचणी आणखी वाढणार आहेत. यामुळे गुंतवणूकदार धास्तावले. गुंतवणूकदारांनी विक्रीचा मारा केल्याने शेअर बाजार गडगडला. 

सेन्सेक्‍सच्या मंचावर हिरो मोटोकॉर्प, टाटा मोटर्स, ऍक्‍सिस बॅंक, टाटा स्टील, मारुती आणि एसबीआय यांच्या समभागात 6.19 टक्‍क्‍यांपर्यंत वाढ झाली. याचवेळी एचयूएल, एशियन पेंट्‌स आणि इन्फोसिस या कंपन्यांच्या समभागात वाढ नोंदविण्यात आली. 

खनिज तेलाच्या भावात थोडी घट 
सौदी अरेबियातील तेल शुद्धीकरण प्रकल्पावर झालेल्या ड्रोन हल्ल्यानंतर भूराजकीय तणाव निर्माण झाला आहे. याचवेळी जागतिक पातळीवर खनिज तेलाच्या पुरवठ्याबाबत अनिश्‍चितता निर्माण होऊन भावाचा भडका उडाला आहे. काल खनिज तेलाचा भाव प्रतिबॅरल सुमारे 20 टक्‍क्‍यांनी वाढून 71.75 डॉलरवर गेला होता. आज भावात घट होऊन तो प्रतिबॅरल 67.97 डॉलरवर आला. 

जगभरातील बाजारांमध्ये संमिश्र वातावरण 
आशियातील शांघाय कम्पोझिट आणि हॅंगसेंग या निर्देशांकांत आज घसरण नोंदविण्यात आली, तर निक्केई आणि कोस्पी हे निर्देशांक वधारले. युरोपमधील शेअर बाजारांमध्ये आजच्या सत्राच्या सुरवातीला संमिश्र वातावरण होते


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sensex sinks 642 points