esakal | सेन्सेक्स, निफ्टीची आपटी
sakal

बोलून बातमी शोधा

सेन्सेक्स, निफ्टीची आपटी

रिलायन्स इंडस्ट्रीज आणि एचडीएफसी बॅंक यांच्या समभागामध्ये मोठ्या प्रमाणात झालेल्या नफेखोरीचा फटका मंगळवारी शेअर बाजाराला बसला. देशांतर्गत आणि जागतिक बाजारातील वर्षअखेरीच्या सुट्यांच्या पार्श्‍वभूमीवर गुंतवणूकदारांसह दलाल सावध पवित्रा घेत आहेत. यामुळे शेअर बाजारात घसरणीचे वातावरण निर्माण झाले.

सेन्सेक्स, निफ्टीची आपटी

sakal_logo
By
पीटीआय

मुंबई : मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 181 अंशांची घसरण होऊन 41 हजार 461 अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 48 अंशांच्या घसरणीसह 12 हजार 214 अंशांवर स्थिरावला. 

देशांतर्गत आणि जागतिक बाजारातील वर्षअखेरीच्या सुट्यांच्या पार्श्‍वभूमीवर गुंतवणूकदारांसह दलाल सावध पवित्रा घेत आहेत. यामुळे शेअर बाजारात घसरणीचे वातावरण निर्माण झाले. याचबरोबर डिसेंबरमधील वायदेपूर्ती गुरुवारी होत असल्याचाही परिणाम शेअर बाजारावर झाला, अशी माहिती शेअर बाजार विश्‍लेषकांनी दिली. 

शांघाय आणि टोकियोतील शेअर बाजारात आज तेजीचे वातावरण होते. हॉंगकॉंग आणि सोल येथील शेअर बाजारांमध्ये मात्र, घसरणीचे वातावरण दिसून आले. युरोपमधील शेअर बाजारांमध्ये आजच्या सत्राच्या सुरुवातीला तेजीचे चित्र होते. जागतिक पातळीवर खनिज तेलाचा भाव आज वधारून प्रतिबॅरल 66.44 डॉलरवर गेला. 

एचसीएल टेकला सर्वाधिक फटका 
सेन्सेक्‍सच्या मंचावर आज एचसीएल टेक कंपनीच्या समभागात सर्वाधिक 1.80 टक्के घसरण नोंदविण्यात आली. त्याखालोखाल रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बॅंक, टीसीएस, टेक महिंद्रा, एल अँड टी, मारुती, बजाज फायनान्स आणि एचडीएफसी यांच्या समभागात घसरण नोंदविण्यात आली. इंड्‌सइंड बॅंक, ओएनजीसी, भारती एअरटेल, हिरो मोटोकॉर्प आणि एनटीपीसी यांच्या समभागात मात्र, वाढ नोंदविण्यात आली. 

रुपयातील घसरण कायम  
देशांतर्गत शेअर बाजारातील घसरण आणि जागतिक पातळीवर खनिज तेलाच्या भावात सुरू असलेली वाढ यामुळे मंगळवारी रुपयातील घसरण कायम राहिली. डॉलरच्या तुलनेत रुपया 9 पैशांची घट होऊन 71.27 या पातळीवर बंद झाला. 
सरकारकडून निर्गुंतवणुकीचे उद्दिष्ट गाठले जाण्याची शक्‍यता कमी असल्याचे वृत्त आल्याने चलन बाजारात रुपयावर दबाव आला. आज चलन बाजारात रुपयाची सुरुवात नकारात्मक झाली. तो आज दिवसभरात 71.15 या उच्चांकी पातळीवर गेला होता. नंतर तो 71.29 या नीचांकी पातळीवर घसरला. अखेर मागील सत्राच्या तुलनेत 9 पैशांची घसरण होऊन रुपया 71.27 या पातळीवर बंद झाला. देशांतर्गत शेअर बाजारात आज नफेखोरीमुळे घसरण कायम राहिली. याचबरोबर जागतिक पातळीवर खनिज तेलाच्या भावातील वाढीचे सत्र कायम राहिल्याचा फटका आज रुपयाला बसला, अशी माहिती चलन बाजार विश्‍लेषकांनी दिली.

loading image