सात सरकारी बँकांना तब्बल 11 कोटींचा दंड

वृत्तसंस्था
रविवार, 4 ऑगस्ट 2019

"एसबीआय', "पीएनबी'लाही दंड 

आर्थिक गैरव्यवहाराची माहिती उशिरा दिल्याबद्दल रिझर्व्ह बॅंकेने स्टेट बॅंक ऑफ इंडिया (एसबीआय) व पंजाब नॅशनल बॅंकेला (पीएनबी) प्रत्येकी 50 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. 

नवी दिल्ली : चालू (करंट) खाते उघडण्यासंदर्भातील नियमावलीचे उल्लंघन केल्याप्रकरणी रिझर्व्ह बॅंकेने (आरबीआय) सात सरकारी बॅंकांना एकत्रित 11 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. 

आरबीआयने एका प्रसिद्धिपत्रकाद्वारे याबाबतची माहिती दिली. संबंधित बॅंकांनी चालू खाते उघडण्यासंदर्भातील काही नियमांकडे दुर्लक्ष केल्याचे आरबीआयने म्हटले आहे. यात अलाहाबाद व बॅंक ऑफ महाराष्ट्रला प्रत्येकी दोन कोटी, बॅंक ऑफ बडोदा, बॅंक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हरसीज बॅंक आणि युनियन बॅंक ऑफ इंडियाला प्रत्येकी दीड कोटी, तर ओरिएंटल बॅंक ऑफ कॉमर्सला एक कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

आरबीआयने एका समूहातील कंपन्यांच्या खात्यांची पडताळणी केली असता संबंधित बॅंकांकडून काही तरतुदींचे उल्लंघन झाल्याचे समोर आले. त्यानंतर संबंधित बॅंकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. 

"एसबीआय', "पीएनबी'लाही दंड 

आर्थिक गैरव्यवहाराची माहिती उशिरा दिल्याबद्दल रिझर्व्ह बॅंकेने स्टेट बॅंक ऑफ इंडिया (एसबीआय) व पंजाब नॅशनल बॅंकेला (पीएनबी) प्रत्येकी 50 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Seven Government banks fined Rs 11 crore