शेअर बाजारात मोठ्या पडझडीची भीती नाही

Share-Market
Share-Market

पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका आणि बाजाराचे योग्य मूल्य या बाबी वगळता ज्या कारणांनी बाजारात घसरण झाली आहे, ते घटक आता बाजारासाठी पूरक बनत आहेत. कच्च्या तेलाचा भाव प्रतिपिंप ८६ वरून ५९ डॉलरपर्यंत घसरला असून, रुपयाचा विनिमय दर ७०.६७ पर्यंत वधारला आहे. कच्च्या तेलाच्या भावात ३१.३९ टक्के घट झाली असून, रुपयाचा भाव ४.४८ टक्के वधारला आहे. या दोन्ही घटकांमुळे आयात खर्चात एकूण ३५.८७ टक्के लाभ झाला आहे. या बाजूने बाजाराला वाटणारी टोकाची भीती आता मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. 

सप्टेंबरअखेरच्या तिमाहीचे विविध कंपन्यांचे आर्थिक निकाल लागले असून, बाजारातील २०३ कंपन्यांपैकी १९९ कंपन्यांचे निकाल जाहीर झाले आहेत. यापैकी ९४ कंपन्यांनी महसूल व निव्वळ नफा तिमाही व वार्षिक अंतराने वाढीत जाहीर केला आहे. हे प्रमाण फार उत्साहवर्धक नसले तरी फार खराबही नाही. दुसऱ्या बाजूने रिझर्व्ह बॅंक व सरकार यांच्यातील मतभेद निवळले असले, तरी ‘वाद मिटला; परंतु समस्या तशाच राहिल्या,’ असा निष्कर्ष या घटनेतून निघत आहे. बिगर बॅंकिंग वित्तीय कंपन्यांना (एनबीएफसी) बॅंकांनी वाढीव चलन देण्याची अपेक्षा व सरकारी बॅंकांवर टाकलेले काही निर्बंध मागे घेण्याची सरकारची सूचना, यांवर रिझर्व्ह बॅंकेने अद्याप ठोस निर्णय घेतलेला नाही. परिणामी, ‘एनबीएफसीं’ना रोकड कमी पडल्यास हमीपत्रावरील परतावा वेळेत देण्यास काही कंपन्या कमी पडण्याची भीती बाजाराला वाटत आहे. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या निकालातून २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीचा कल कसा असेल, याचा अंदाज घेत शेअर बाजार थोडे दिवस खाली-वर होत एकाच पातळीत राहण्याची शक्‍यता आहे. 

तांत्रिक कल कसा राहील?
मागील गुरुवारी ‘निफ्टी’ १०,५२६ अंशांवर बंद झाला असून, या आठवड्यासाठी १०,४०० व १०,५५० अंश या पातळ्या महत्त्वाच्या आहेत. बाजार १०,४०० अंशांपर्यंत घसरण्याची शक्‍यता आहे. जर ‘निफ्टी’ १०,५५० अंशांवरती एक दिवस टिकला, तर १०,७०० अंशांपर्यंत सलग वाढेल. परंतु, सर्व संकेत पाहता १०,४०० अंशांपर्यंत प्रथम घसरेल व नंतर वाढण्यास सुरवात करेल. खालच्या बाजूने १०,४०० अंशांवर ‘निफ्टी’ला मोठा आधार असून, वरच्या बाजूने वाढताना १०,७०० अंशांवर विरोध होईल. परंतु, १०,७०० अंशांवरती ‘निफ्टी’ निघताच पुढे बाजारात वेगाने वाढ होईल असे वाटते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com