esakal | शेअर बाजारात तेजी;सेन्सेक्सने ओलांडला 34 हजारांचा टप्पा
sakal

बोलून बातमी शोधा

शेअर बाजारात तेजी;सेन्सेक्सने ओलांडला 34 हजारांचा टप्पा

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 284 अंशांनी वधारून 34 हजार 109 पातळीवर स्थिरावला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांक निफ्टीमध्ये 82 अंशांची वाढ झाली. तो 10 हजार 061पातळीवर बंद झाला. 

शेअर बाजारात तेजी;सेन्सेक्सने ओलांडला 34 हजारांचा टप्पा

sakal_logo
By
वृत्तसंस्था

मुंबई - देशाच्या आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये चक्रीवादळाचे संकट टळले आहे, बुधवारी भांडवली बाजारात तेजीची जोरदार बरसात झाली. दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 284 अंशांनी वधारून  34 हजार 109 पातळीवर स्थिरावला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांक निफ्टीमध्ये 82 अंशांची वाढ झाली. तो 10 हजार 061पातळीवर बंद झाला. गुंतवणूकदारांनी सकाळपासून खरेदीचा ओघ सुरू ठेवल्याने बुधवारी बाजार उघडताच सेन्सेक्सने 500 अंशांची झेप घेतली. मात्र अखेरच्या तासात नफा वसुली झाल्याने बाजार खाली आला. तरीही सेन्सेक्स 34 हजार पातळीवर बंद झाला. तर, निफ्टीने 13 मार्चनंतर प्रथमच 10 हजार 100 अंशांची पातळी ओलांडली. सलग सहाव्या दिवशी शेअर बाजार सकारात्मक पातळीवर बंद होण्यास यशस्वी झाला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

जागतिक पातळीवरून मिळणारे सकारात्मक संकेत आणि लॉकडाउन शिथिल करण्याच्या दृष्टिने सरकार उचलत असलेल्या पावलांचे उद्योग जगताकडून स्वागत होत आहे. केंद्र आणि देशातील राज्य सरकारे अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न करत असून त्याची सकारात्मक परिणाम येत्या काळात दिसण्याची आशा आहे. 

 चलन बाजारात आज आशियातील इतर चलनांच्या तुलनेत डॉलरचे मूल्य घसरले. त्याचाही परिणाम भांडवली बाजारावर देखील झाला.

क्षेत्रीय पातळीवर
सध्या बाजारात बँका, वित्त संस्था, एफएमसीजी , ऑटो कंपन्यांचे शेअर सर्वाधिक वधारले होते. सेन्सेक्सच्या मंचावर बजाज फायनान्स, ऍक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, इंडसइंड बँक ,एचडीएफसी बँक, बजाज ऑटो, ओएनसीजी, महिंद्रा अँड महिंद्रा, टायटन, सन फार्मा, एनटीपीसी, कोटक बँकेच्या शेअरमध्ये सर्वाधिक वाढ झाली.   

परकी गुंतवणूकदार परतले
 परकी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (एफआयआय) भारतीय शेअर बाजारात मोठी गुंतवणूक सुरू केली आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार, परकीय गुंतवणूकदारांनी 7 हजार 500 कोटींचे शेअर खरेदी केले आहेत. स्थानिक संस्थात्मक गुंतवणूकदारांनी सुमारे 450 कोटींचे शेअर खरेदी केले.