शेअर बाजाराला व्यापारयुद्धाची भीती!

राजेंद्र सूर्यवंशी
रविवार, 22 जुलै 2018

अमेरिका-चीन या दोन आर्थिक महासत्तांमधील व्यापारयुद्ध पुन्हा डोके वर काढत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनमधून होणाऱ्या ५०५.५ अब्ज डॉलरच्या आयातीवर वाढीव कर आकारण्याची तयारी सुरू केली असल्याची चर्चा सुरू झाली आहे. तसे झाल्यास त्याची झळ जगातील सर्व शेअर बाजारांना सोसावी लागेल. 

अमेरिका-चीन या दोन आर्थिक महासत्तांमधील व्यापारयुद्ध पुन्हा डोके वर काढत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनमधून होणाऱ्या ५०५.५ अब्ज डॉलरच्या आयातीवर वाढीव कर आकारण्याची तयारी सुरू केली असल्याची चर्चा सुरू झाली आहे. तसे झाल्यास त्याची झळ जगातील सर्व शेअर बाजारांना सोसावी लागेल. 

चीनमधून अमेरिकेत होणाऱ्या निर्यातीच्या तुलनेत अमेरिकेतून चीन फार कमी म्हणजे साधारण १७०-१९० अब्ज डॉलरची आयात करते. क्रिया-प्रतिक्रिया सुरू झाल्यास चीन जास्तीतजास्त आयातीएवढ्या रकमेवर करवाढ करू शकेल. त्यापुढे चीनने प्रतिक्रिया देण्याचे ठरविल्यास ज्या मूळ अमेरिकी कंपन्या चीनमध्ये उत्पादन घेतात, त्यांच्यावर करआकारणी वाढण्याची शक्‍यताही राहील. अशा प्रसंगात जागतिक पातळीवर तणाव वाढण्याची शक्‍यता राहील. ट्रम्प यांचा स्वभाव पाहता या अडचणीला सामोरे जाण्याची तयारी करणे, एवढेच आपल्या हातात आहे.

आपल्या देशांतर्गत परिस्थितीचा आढावा घेता, कच्च्या तेलाचे भाव घसरत असून, रुपयाच्या विनिमय दरात घसरण चालूच आहे. हा भाव ७० रुपये प्रतिडॉलरच्या जवळ पोचला आहे. उत्तर प्रदेश व बिहार राज्यात सरासरी ५० टक्‍क्‍यांपेक्षा कमी पाऊस पडला आहे. यामुळे किरकोळ चलनवाढ वाढण्याची भीती राहील. याही परिस्थितीत आपल्या राष्ट्रीय बाजाराचा निर्देशांक- ‘निफ्टी’ ११,२०० अंशांपर्यंत जाण्याची शक्‍यता राहील. पुढे यात हळूहळू वाढ होत ११,५०० अंशांपर्यंत जाण्याची अपेक्षा आहे. परंतु, वाढीच्या प्रत्येक टप्प्यावर नफावसुलीची तीव्रता वाढेल. सध्यातरी जागतिक बाजार वाढीत दिसत आहेत. परंतु, व्यापारयुद्ध वाढल्यास यांची दिशा बदलण्यास वेळ लागणार नाही.  

तांत्रिक कल कसा राहील?
मागील शुक्रवारी ‘निफ्टी’ ११,०२४ अंशांवर बंद झाला असून, या आठवड्यासाठी १०,९०० व ११,२०० अंश या पातळ्या ‘निफ्टी’साठी महत्त्वाच्या आहेत. सध्या ‘निफ्टी’ वाढीत असून, ११,०६० अंशांच्या वर एक तास टिकला, तर पुढे गतीने ११,२०० अंशांपर्यंत वाढेल. ‘निफ्टी’चे यापुढचे लक्ष्य ११,५०० अंशांचे दिसत असून, टप्प्याटप्प्याने हे गाठले जाण्याची शक्‍यता बळावली आहे. जर, ‘निफ्टी’ १०,९०० अंशांखाली घसरला, तर पुढे १०,८०० अंशांपर्यंत घसरण्याची शक्‍यता राहील. सध्यातरी ‘निफ्टी’ ११,२०० अंशांचे पहिले लक्ष्य लवकर गाठेल, असे संकेत मिळत आहेत. ‘बॅंक निफ्टी’ २७,५०० अंशांपर्यंत वाढण्याची शक्‍यता वाढली आहे. 

सध्या बाजार तेजीत दिसत असला, तरी सावध राहण्याची गरजही तेवढीच आहे. वाढीच्या प्रत्येक टप्प्यावर विक्रीचा मारा वाढण्याची शक्‍यता राहील.
(डिस्क्‍लेमर ः लेखकाने स्वतःच्या अभ्यासानुसार वरील मत व अंदाज व्यक्त केले आहेत. त्याच्याशी ‘सकाळ’ सहमत असेलच, असे नाही. शेअर बाजारातील जोखीम लक्षात घेऊन वाचकांनी गुंतवणुकीचे निर्णय स्वतःच्या जबाबदारीवर घेणे अपेक्षित आहे.)

Web Title: share market business war america chin