esakal | आरबीआयच्या घोषणेनंतर, बँकांच्या शेअर्सवर परिणाम; बाजारही घसरला
sakal

बोलून बातमी शोधा

RBI-bank

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी तातडीची पत्रकार परिषद घेत रेपो दरात 0.40 टक्के कपातीची घोषणा केली. मात्र, सध्याच्या अनिश्चिततेच्या वातावरणामुळे गुंतवणूकदारांनी घोषणांकडे दुर्लक्ष केले आणि विक्रीचा मारा केला. दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 260 अंशांनी घसरून 30 हजार 672 अंशांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजार निर्देशांक निफ्टीमध्ये देखील 67 अंशांची घसरण झाली. तो 9 हजार 39 अंशांवर स्थिरावला.

आरबीआयच्या घोषणेनंतर, बँकांच्या शेअर्सवर परिणाम; बाजारही घसरला

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई - रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी तातडीची पत्रकार परिषद घेत रेपो दरात 0.40 टक्के कपातीची घोषणा केली. मात्र, सध्याच्या अनिश्चिततेच्या वातावरणामुळे गुंतवणूकदारांनी घोषणांकडे दुर्लक्ष केले आणि विक्रीचा मारा केला. दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 260 अंशांनी घसरून 30 हजार 672 अंशांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजार निर्देशांक निफ्टीमध्ये देखील 67 अंशांची घसरण झाली. तो 9 हजार 39 अंशांवर स्थिरावला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

बँकांचे शेअर घसरले
आरबीआयने कर्जदाराच्या मासिक हप्ता वसुलीला पुन्हा तीन महिने मुदतवाढ दिल्याने  बँकांचे शेअर सर्वाधिक घसरले. तज्ज्ञांच्या मते, कर्ज वसुलीला स्थगिती देणे ही पुरेशी उपाययोजना नाही. यामुळे बँकिंग क्षेत्र अडचणीत  येण्याची शक्यता आहे.  बँका आणि वित्त संस्थांच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली. यात एचडीएफसी, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, ऍक्सिस बँक, बजाज फायनान्स, कोटक महिंद्रा बँक आदी शेअर घसरले. सेन्सेक्सच्या मंचावर एचडीएफसी, बजाज फायनान्स, आयसीआयसीआय बँक, बजाज ऑटो आणि टाटा स्टीलचे शेअर सर्वाधिक घसरले होते. तर, महिंद्रा अँड महिंद्रा, इन्फोसिस, एशियन पेंट्स आणि अल्ट्राटेक सिमेंटचे शेअर सर्वाधिक वधारले होते.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

रुपयात मोठी घसरण
आरबीआयने जाहीर केलेल्या मौद्रिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर रुपयावरील दबाव वाढून आंतरराष्ट्रीय चलन बाजारात रुपयाचे डॉलरच्या तुलनेत 33 पैशांनी अवमूल्यन झाले. परिणामी रुपया 75.96 वर स्थिरावला.  

जागतिक शेअर बाजार घसरले
हाँगकाँगमधील लोकशाही आंदोलन दाबण्यासाठी चीनने नवीन सुरक्षा कायदा लागू केल्यानंतर चीन आणि हाँगकाँगमधील शेअर बाजारात मोठी घसरण झाली. परिणामी जपान सहित इतर आशियाई शेअर बाजार देखील घसरले होते. दुसरीकडे अमेरिका आणि चीनमधील वाढत्या व्यापारविषयक संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय वायदे बाजारात कच्च्या तेलाचे दर मोठ्या प्रमाणात घसरले.