शेअर मार्केट : चला, बांधूया गुंतवणुकीचा पिरॅमिड!

अल्पावधीच्या आलेखानुसार, ‘निफ्टी’ने १७,६१३ ही आधार पातळी तोडल्यावर मोठ्या प्रमाणात पडझड दर्शविली आहे
शेअर मार्केट : चला, बांधूया गुंतवणुकीचा पिरॅमिड!
शेअर मार्केट : चला, बांधूया गुंतवणुकीचा पिरॅमिड!sakal media

गेल्या आठवड्यात ‘सेन्सेक्स’ ५७,१०७ अंशांवर, तर ‘निफ्टी’ १७,०२६ अंशांवर बंद झाला. दक्षिण आफ्रिकेतील नव्या प्रकारच्या कोरोना विषाणूचा वाढता फैलाव, युरोपातील काही ठिकाणी लागू झालेली टाळेबंदी, परदेशी गुंतवणूकदारांनी केलेली शेअरविक्री, नकारात्मक आंतरराष्ट्रीय संकेत यांमुळे गेल्या शुक्रवारी ‘सेन्सेक्स’ने एकाच दिवसात १६८७ अंशांची, तर ‘निफ्टी’ने ५०९ अंशाची घसरण नोंदवून ‘ब्लॅक फ्रायडे’ची नोंद केली. गेल्या शुक्रवारी अमेरिकी शेअर बाजाराचा निर्देशांक ‘डाऊ जोन्स’ने देखील एकाच दिवसात तब्बल ९०५ अंशांची घसरण नोंदविली. यामुळे या आठवड्याच्या सुरवातीस पुन्हा आंतरराष्ट्रीय बाजारातून नकारात्मक संकेत मिळू शकतात. काल-परवापर्यंत पटापट उड्या मारत चाललेल्या ‘सेन्सेक्स’ने पाहतापाहता काही महिन्यांतच ६२ हजार अंशांचा टप्पादेखील गाठला होता. अनेक गुंतवणूकदारांना आता बहुतेक अशा गतीची सवयच करावी लागणार, असे वाटेपर्यंत ‘सेन्सेक्स’ने महिन्याभरात ६२ हजारांपासून पडझड करत ५७,१०७ अंशांची पातळी गाठली आहे. अशा वेळेस गुंतवणूक करणाऱ्यांनी काय करावे?

‘ट्रेंड इज युअर बेस्ट फ्रेंड’

अल्पावधीच्या आलेखानुसार, ‘निफ्टी’ने १७,६१३ ही आधार पातळी तोडल्यावर मोठ्या प्रमाणात पडझड दर्शविली आहे. साप्ताहिक आलेखानुसार देखील ‘निफ्टी’ नकारात्मक कल दर्शवत आहे. यामुळे जोपर्यंत आलेखानुसार तेजीचे संकेत मिळत नाहीत, तोपर्यंत ‘ट्रेडर्स’नी खरेदीसाठी गडबड करू नये. शेअर बाजारात अल्पावधीसाठी; तसेच मध्यम अवधीसाठी म्हणजेच तीन ते सहा महिन्यांसाठी ‘ट्रेडिंग’ करताना दिशा ओळखून ‘ट्रेड’ करणे आवश्यक असते. तेजीच्या काळात तेजीचे; तसेच मंदीच्या काळात मंदीचे अथवा कोणताही व्यवहार न करता जोपर्यंत तेजीचे संकेत मिळत नाहीत, तोपर्यंत योग्य संधीची वाट पाहणे योग्य ठरते. यामुळे ‘ट्रेंड इज युअर बेस्ट फ्रेंड’ हा मंत्र लक्षात घेऊन सद्यःस्थितीमध्ये कल मंदीचा असल्याने जोपर्यंत सक्षम तेजीचे संकेत मिळत नाहीत, तोपर्यंत अल्पावधीसाठी ट्रेडिंग करणाऱ्यांनी खरेदी टाळून सध्या तरी ‘कुछ ना करो’ हा पवित्रा घेणे योग्य ठरू शकेल. तसेच यापूर्वी केलेल्या खरेदीच्या व्यवहारांसाठी आलेखानुसार ‘स्टॉपलॉस’ ठेवणे हिताचे ठरू शकेल.

‘क्रॅश इज अ गिफ्ट’

शेअर बाजारातील पडझड म्हणजे उत्तम व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवणुकीची संधीच असते. दीर्घावधीसाठी गुंतवणूक करताना एकदम सर्व गुंतवणूक करण्याऐवजी टप्प्याटप्प्याने, ‘पिरॅमिड’ पद्धतीने गुंतवणूक करणे फायदेशीर ठरते. ‘पिरॅमिड’ पद्धतीने म्हणजे ‘फंडामेंटल्स’नुसार बाजार; तसेच शेअरचे भाव महाग असताना अल्प प्रमाणात आणि बाजार; तसेच शेअरचे भाव ‘फंडामेंटल्स’नुसार स्वस्त असताना उत्तम व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवणूक वाढवून गुंतवणुकीचा ‘पिरॅमिड’ करणे फायदेशीर ठरू शकते. कोरोनाचे संकट हे कायमस्वरूपी टिकणारे नाही. यामुळे बाजारातील पडझड ही उत्तम कंपन्यांच्या शेअरमध्ये खरेदीची संधीच देत आहे. कारण उत्तम व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांसाठी ‘फॉर्म इज टेम्पररी, क्लास इज पर्मनंट’ अर्थात ‘पर्मनंट’ म्हणजे किमान आगामी ५ ते १० वर्षांचा विचार करता प्रगतीची चक्रे गतिमान ठेवत व्यवसायवृद्धी करू शकणाऱ्या कंपन्यांचा विचार करणे हिताचे ठरू शकते.

बँकिंग क्षेत्रातील दिग्गज एचडीएफसी बँक (भाव रु. १४१०), फेव्हिकॉलची निर्माती पिडिलाइट इंडस्ट्रीज (भाव रु. २२३५), क्रेडिट कार्ड क्षेत्रातील एसबीआय कार्डस अँड पेमेंट सर्व्हिसेस (भाव रु. ९५६), पेंट क्षेत्रातील बर्जर पेंट्स (भाव रु. ७६४), वाहन उद्योग क्षेत्राशी निगडित एन्ड्युरन्स टेक्नॉलॉजिज (भाव रु. १६७६), कॉम्प्युटर एज मॅनेजमेंट सर्व्हिसेस अर्थात ‘कॅम्स’ (भाव रु. ३०६९), सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस अर्थात ‘सीडीएसएल’ (भाव रु. १४१६) आदी कंपन्यांच्या शेअरमध्ये टप्प्याटप्प्याने दीर्घावधीसाठी खरेदी करणे फायदेशीर ठरू शकेल. शेअर बाजारात घसरण होत असताना अशा उत्तम व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांच्या शेअरचे भावदेखील आणखी घसरु शकतात. यामुळे आधी सांगितल्याप्रमाणे, एकदम सर्व गुंतवणूक करण्याऐवजी दीर्घावधीसाठी गुंतवणुकीचा ‘पिरॅमिड’ बांधणे योग्य ठरू शकेल. या लेखातील माहिती अभ्यासाच्या दृष्टिकोनातून दिली गेली आहे. प्रत्यक्ष व्यवहार करताना जोखीम ओळखून वैयक्तिक गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

(लेखक ‘सेबी’ नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com