LIC : सहा महिन्यांनंतर घेतली उसळी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Share market lic stock raised investor investment finance mumbai

LIC : सहा महिन्यांनंतर घेतली उसळी

मुंबई : शेअर बाजारात नोंदणी झाल्यापासून सातत्याने घसरण झालेल्या एलआयसीच्या शेअरने आज सहा महिन्यांनी मोठी वाढ नोंदवली आहे. आज या शेअरने सहा टक्क्यांनी उसळी घेत मे महिन्यात नोंदणी झाल्यापासून एक दिवसात झालेली सर्वांत मोठी तेजी दाखवली. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मुंबई शेअर बाजारात आज एलआयसीच्या शेअरने सकाळी व्यवहारांना सुरवात होताच ८.७० टक्के वाढ नोंदवत ६८२.७० रुपयांचा टप्पा गाठला. दिवसअखेर मात्र तो ५.८५ टक्के वाढ नोंदवत ६६४.८० रुपयांवर स्थिरावला. राष्ट्रीय शेअर बाजारात सकाळच्या सत्रात ९.११ टक्के वाढ नोंदवत त्याने ६८४.९० रुपयांची पातळी गाठली. दिवसअखेर ५.८१ टक्के वाढीसह तो ६६४.२० रुपयांवर बंद झाला.

या वाढीमुळे मुंबई शेअर बाजारात कंपनीचे बाजारमूल्य २३, २४४ कोटी रुपयांनी वाढून चार लाख २० हजार ४८५ कोटींवर गेले आहे. देशातील सर्वांत मोठा आयपीओ असा गाजावाजा करत आलेल्या देशातील सर्वांत मोठी विमा कंपनी एलआयसीच्या शेअरने बाजारात मे महिन्यात नोंदणी झाल्यापासून सातत्याने घसरण नोंदवली होती. १७ मे रोजी शेअर बाजारात ८६७ रुपयांवर त्याची नोंदणी झाली. त्यानंतर त्यात फार कमी वेळा वाढ झाली, मात्र त्यानंतर सतत त्याने घसरणच नोंदवली.

तिमाही निकालाचा परिणाम

सप्टेंबर तिमाहीत कंपनीच्या नफ्यात अनेक पटींनी वाढ झाली आहे. प्रीमियम उत्पन्न आणि धोरणातील बदलाचा कंपनीला चांगला फायदा झाला आहे. त्यामुळे एलआयसीच्या शेअरमध्ये ही वाढ झाली आहे. सप्टेंबरअखेरच्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीला १५,९५२ कोटी रुपये नफा झाला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीला १,४३४ कोटी रुपये नफा झाला होता. प्रीमियम उत्पन्न १,३२, ६३१ कोटी रुपये झाले आहे. एकूण एनपीए पहिल्या तिमाहीतील ५.८४ टक्क्यांवरून ५.६० टक्क्यांवर आला आहे.

शेअर खरेदीचा सल्ला

शेअर बाजार सल्लागार कंपन्यांनी या शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला असून, ९१७ रुपयांचे उद्दिष्ट दिले आहे. आयसीआयसीआय सिक्युरिटीजच्या मते, कंपनीचा शेअर ९१७ रुपयांपर्यंत जाऊ शकतो. ७०० रुपयांवर पोहोचल्यानंतर त्यात जोरदार वाढ दिसून येईल, नजीकच्या काळात तो ७०० ते ७२० रुपयांपर्यंत जाऊ शकतो. नवीन गुंतवणूकदार ६३० रुपयाच्या स्टॉप लॉससह अल्प मुदतीसाठी याची खरेदी करू शकतात, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.