बाजाराच्या घसरणीत परीक्षा संयमाची!

ऋषभ पारख
सोमवार, 22 ऑक्टोबर 2018

गेले काही दिवस शेअर बाजारात होत असलेली पडझड पाहून काही म्युच्युअल फंड गुंतवणूकदार घाबरून गेल्याचे दिसून येत आहे. परिणामी, हे लोक आपली म्युच्युअल फंडातील गुंतवणूक भीतीपोटी काढून घेत असल्याचेही दिसून येत आहे. पण त्यांनी असे करणे योग्य आहे का, याचा विचार करूया.

गेले काही दिवस शेअर बाजारात होत असलेली पडझड पाहून काही म्युच्युअल फंड गुंतवणूकदार घाबरून गेल्याचे दिसून येत आहे. परिणामी, हे लोक आपली म्युच्युअल फंडातील गुंतवणूक भीतीपोटी काढून घेत असल्याचेही दिसून येत आहे. पण त्यांनी असे करणे योग्य आहे का, याचा विचार करूया.

अस्थिर स्थितीत काय करावे?
गेले काही दिवस होत असलेले रुपयाचे अवमूल्यन, अमेरिका व चीन यांच्या व्यापारातील काही वादग्रस्त मुद्दे; तसेच अमेरिकेतील व्याजदर वाढण्याची शक्‍यता, कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि लवकरच होऊ घातलेल्या चार राज्यांतील विधानसभेच्या व आणखी पुढच्या वर्षीच्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका या सर्व बाबींचा विचार करता शेअर बाजारातील अस्थिरता व पडझड आणखी काही काळ राहू शकते. अशा अस्थिर (व्होलाटाइल) परिस्थितीत नेमके काय करावे, याबद्दल सर्वसामान्य गुंतवणूकदारामध्ये संभ्रम निर्माण होतो. अशावेळी काहीच न करणे, हा यावर एक उत्तम मार्ग असू शकतो. महत्त्वाचे म्हणजे बाजाराच्या घसरणीच्या काळात आपल्या संयमाची परीक्षा घेतली जात असते. खरे तर चांगल्या कंपन्याचे शेअर किंवा म्युच्युअल फंडाची युनिट्‌स या वेळी स्वस्तात मिळण्याची संधी असते, कारण या काळात अशा कंपन्याच्या कामकाजावर, मूलभूत आर्थिक स्थितीवर कोणताही विपरीत परिणाम झालेला नसतो. भाव घसरणे ही केवळ एक ‘नी जर्क’ (प्रतीक्षिप्त) क्रिया असते आणि असे पडलेले भाव नजीकच्या काळात पुन्हा वाढत असतात. अशा वेळी गुंतवणूकदारांनी असा विचार करणे आवश्‍यक असते, की ज्या उद्दिष्टाने आपण गुंतवणूक केली होती, त्यात काही बदल झाला आहे का? कारण असा बदल मुळात झालेलाच नसतो आणि म्हणून आपली बाजारातील गुंतवणूक काढून घेण्याचे काहीच कारण नसते.

दीर्घकाळातच फायदा!
पण सध्याच्या परिस्थितीत शेअर बाजारातील किंवा म्युच्युअल फंडातील नवख्या गुंतवणूकदारांना भीती वाटणे साहजिक आहे. तथापि, आपण जर शेअर बाजारात किंवा म्युच्युअल फंडात गेली काही वर्षे गुंतवणूक करीत असाल, तर बाजारातील अचानक होणाऱ्या चढ-उतारांची आपल्याला कल्पना असते आणि येथे एक गोष्ट आपण ध्यानात घेतली पाहिजे, की शेअर किंवा म्युच्युअल फंडातील दीर्घकालीन गुंतवणूक (५ ते १० वर्षांसाठीची) अन्य गुंतवणुकीपेक्षा फायदेशीर ठरते. मात्र अल्पकालीन गुंतवणूक फायदेशीर ठरेलच, असे नाही. (कारण दीर्घकालीन गुंतवणुकीमुळे बाजारातील चढ-उतारांची जोखीम कमी होते.) ज्यांना अल्पकालीन गुंतवणूक करायची असेल, त्यांनी शेअर बाजाराशी संबंधित गुंतवणूक टाळलेलीच बरी!

‘एसआयपी’ चालूच हवी!
गुंतवणूकदारांकडून होणारी सर्वांत मोठी चूक म्हणजे बाजार पडल्यावर घाबरून जाऊन आपले शेअर किंवा म्युच्युअल फंड विकून टाकणे. कारण हे शेअर बाजाराच्या मूळ तत्त्वाशी विसंगत आहे. कारण शेअर बाजारात शेअर किंवा म्युच्युअल फंड कमी किमतीत घेऊन जास्त किमतीला विकणे अपेक्षित असते. प्रत्यक्षात मात्र बाजार पडल्यावर घाबरून जाऊन शेअर किंवा म्युच्युअल फंड कमी भावात विकत घ्यायच्या ऐवजी कमी भावात विकून टाकले जातात. तसेच बरेचसे गुंतवणूकदार बाजार पडल्यावर म्युच्युअल फंडातील आपली ‘एसआयपी’ बंद करतात. उलट, अशा वेळी ‘एसआयपी’ चालू ठेवल्यास युनिटची खरेदी आधीच्यापेक्षा कमी किमतीत होते. नियोजित कालावधीसाठी नियमितपणे ‘एसआयपी’ चालू ठेवल्याने एकूण गुंतवणूक सरासरी भावाने होते आणि आपण ज्या उद्दिष्टासाठी गुंतवणूक केली असते, ते साध्य होऊ शकते. त्याऐवजी मध्येच ‘एसआयपी’ बंद केल्याने आपले उद्दिष्ट साध्य होत नाही. 

परताव्याची अयोग्य तुलना
गुंतवणूकदारांची आणखी एक प्रकर्षाने दिसून येणारी चूक म्हणजे बाजार मंदीतून जात असताना अनेक गुंतवणूकदार मिळणाऱ्या परताव्याची (रिटर्न्स) तुलना बॅंक एफडी, पीपीएफ, सोने, रिअल इस्टेट यासारख्या गुंतवणुकीतून मिळणाऱ्या परताव्याशी करतात. अशी तुलनाच करणे चुकीचे असते. कारण शेअर किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणूक दीर्घकालीन असल्याने अन्य पर्यायाच्या तुलनेत फायदेशीर ठरत असते. त्यादृष्टीने आपले आर्थिक नियोजन करणे गरजेचे असते. आपल्या उद्दिष्टानुसार एकदा गुंतवणूक केल्यानंतर केवळ बाजाराच्या चढ-उतारांनुसार त्यात बदल करणे योग्य नसते. अशा वेळी गरज असते ती संयमाची आणि नियमितपणे गुंतवणूक करीत राहण्याची!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Share market Mutual Fund Investment