Share Market : निर्देशांकांमध्ये घसरण; वाहन उद्योग टॉप गिअरमध्ये | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

share market

निर्देशांकांमध्ये घसरण; वाहन उद्योग टॉप गिअरमध्ये

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : संमिश्र जागतिक संकेतांमुळे आज भारतीय शेअरबाजारांमध्ये नफावसुली झाली व बाजार निर्देशांक अर्ध्या टक्क्यांहूनही जास्त घसरले. तरीही त्या वातावरणातही वाहन उद्योगांच्या समभागांनी चांगलीच तेजी पकडली. आज सकाळपासूनच भारतीय शेअरबाजार घट दाखवीत उघडले, दुपारी ते थोडेसे सावरले, तरीही सेन्सेक्स 61 हजारांची पातळी गाठू शकला नाही. पण पुन्हा व्यवहार संपताना नफावसुलीमुळे निर्देशांक घसरले, त्यामुळे निफ्टीदेखील 18 हजारांखाली घसरला. सेन्सेक्स 396.34 अंशांनी घसरून 60,322.37 अंशांवर तर निफ्टी 110.25 अंशांनी घसरून 17,999.20 अंशांवर स्थिरावला.

अस्थिर जागतिक परिस्थितीमुळे गुंतवणुकदारांनी सावधगिरीचे वातावरण स्वीकारले आहे. पण त्यातही वाहनांमध्ये लागणाऱ्या सेमीकंडक्टर चीप च्या निर्मितीची परिस्थिती सुधारण्याची अपेक्षा असल्याने वाहन उद्योगांचे शेअर आज वाढले. मारुतीचा शेअर सव्वासात टक्के म्हणजे 548 रुपयांनी वाढून 8,049 रुपयांवर स्थिरावला. तर महिंद्र आणि महिंद्र चा शेअर देखील 31 रुपयांनी वाढून 960 रुपयांवर गेला. त्याखेरीज बजाज ऑटो, लार्सन अँड टुब्रो (बंद भाव 1,955 रु.), टेक महिंद्र, नेस्ले, बजाज फिनसर्व्ह, बजाज फायनान्स, इन्फोसिस व टीसीएस या शेअरचे भावही वाढले.

हेही वाचा: पाच वर्षांच्या प्राप्तीकरातून दिलासा; पण अजूनही टांगती तलवार

आज घट दाखविणाऱ्या शेअरची संख्या जास्त होती. टक्केवारीच्या हिशोबात रिलायन्स इंडस्ट्रीज चा शेअर सर्वात जास्त म्हणजे अडीच टक्के किंवा 66 रुपयांनी घसरून 2,512 रुपयांवर आला. 11 रुपयांनी घसरलेला स्टेट बँकेचा शेअर 495 रुपयांवर आला. अल्ट्राटेक सिमेंटही 163 रुपयांनी (बंद भाव 7,883) कोलमडला. इंडसइंड बँक (1,021), सनफार्मा (797), टाटास्टील (1,228), डॉ. रेड्डीज लॅब (4,819) व आयसीआयसीआय बँक (764) यांचेही भाव कमी झाले.

आजचे सोन्याचांदीचे भाव

सोने - 49,360 रु.

चांदी - 66,800 रु.

loading image
go to top