Delhi: पाच वर्षांच्या प्राप्तीकरातून दिलासा; पण अजूनही टांगती तलवार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sugar factory

पाच वर्षांच्या प्राप्तीकरातून दिलासा; पण अजूनही टांगती तलवार

नवी दिल्ली : ‘‘केंद्र सरकारने साखर कारखान्यांना पाच वर्षांच्या प्राप्तीकरातून काही प्रमाणात दिलासा दिला आहे. परंतु अजूनही अनेक वर्षांच्या प्राप्तीकराची टांगती तलवार कारखान्यावर आहे. केंद्राने सर्वच चोविस वर्षांच्या प्राप्तीकराबाबत कारखान्यांना दिलासा दिला पाहिजे. त्यासाठी केंद्र सरकारकडे म्हणणे मांडून या प्रश्‍नी मार्ग काढावा लागेल, असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी केले.

राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या वतीने उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कारखान्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय सहकार राज्यमंत्री बी. एल. वर्मा, राज्याचे गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे, महासंघाचे जयप्रकाश दांडेगावकर, हर्षवर्धन पाटील, प्रकाश नाईकनवरे, आमदार प्रकाश आवाडे, केतन पटेल आदी यावेळी उपस्थित होते.

खासगी कारखान्यांनी ऊसाचा कितीही भाव दिला, तरी त्यांना प्राप्तीकर लागत नाही. मग सहकारी साखर कारखान्यांना हा कर लावण्याबाबत पवार यांनी सवाल उपस्थित केला. ते म्हणाले, ‘‘साखर कारखान्यांचा प्राप्तीकराचा हा प्रश्‍न २४-२५ वर्षांचा आहे. केंद्राने काही वर्षांबाबत दिलासा देणारा आदेश जारी केला आहे. ही बाब चांगली आहे. परंतु उर्वरित प्राप्तीकराचा प्रश्‍न आहे. याबाबत केंद्राने विचार करावा. तसेच सहकरी साखर कारखाना क्षेत्रातील लोकांना या प्रश्‍नी केंद्राकडे जाऊन त्यातून मार्ग काढावा लागेल.’’

पवार यांनी कारखानदारांना काही सूचना देत विविध पर्याय त्यांच्या पुढे मांडले. ते म्हणाले, ‘‘युरोपात ग्रीन हायड्रोजन हे क्षेत्र कारखानादारी पुढे आले आहे. त्याविषयी कारखान्यांनी विचार केला पाहिजे. उत्पादकतेत सुधारणा कशी करता येईल, त्यासाठी नवतंत्रज्ञान कसे वापरता येईल याचा विचार करावा. कारखानदारीने आपला ब्रँड आणि त्याचे मार्केटिंग करावे. त्यातून आर्थिक फायदा होईल. अनावश्‍यक खर्चात बचतीकडे कारखानदारी लक्ष द्यावे. वाचवलेला पैसा म्हणजे कमावलेला पैसा असतो. म्हणून कॉस्ट कटिंगचा विचार करावा. ऊस उत्पादक शेतकरी हा कारखानदारीचा कणा आहे. त्यांच्याशी सतत संवाद आणि त्यांना मार्गदर्शन करण्याची आवश्यकता आहे. शेतकऱ्यांची परिस्थिती बदलली, तर कारखान्याची स्थिती बदलेल.’’

बी. एल. वर्मा म्हणाले, "साखर कारखानदारी समोरील सर्व समस्या सोडविण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे. आपल्या समस्या आणि सूचनांचे स्वागत आहे. त्यातून सहकार अधिक समृद्ध करता येईल.’’ हर्षवर्धन पाटील म्हणाले, ‘‘साखर उद्योगाला चांगले दिवस आहेत. त्यामुळे व्यावसायिक आणि स्पर्धात्मक शिस्तीने कारखाने चालविले, तर ते अधिक फायदेशीर ठरेल’’

----

ऊस दराच्या पेमेंटबाबतही पवार यांनी भाष्य केले. ते म्हणाले, ‘‘गुजरातने सरकारने उस उत्पादकांना पैसे देण्साची पद्धत सुरू केली. ऊस घेतल्यानंतर चौदा दिवसांत साठ टक्के पैसे दिले जातात. दिवाळीपूर्वी २० टक्क्यांचा दुसरा हप्ता मिळतो आणि तिसरा हप्ता नवीन पेरणीपूर्वी दिला जाईल, अशा तीन हप्य्तात पेमेंट केले जाते. काही राज्यात १०० टक्के पैसे देतात. ते देताही येतील. पण साखरेचा शंभर टक्के साठा एकावेळी बाजारपेठेत विकता येत नाही. त्यामुळे शंभर टक्के उसाचे बिल देण्याचा प्रश्‍न निर्माण होतो. त्यामुळे या क्षेत्रातील तज्ज्ञांनी आणि घटकांनी शेतकऱ्यांना पेमेंट कसे देता येईल, या विषयी विचार विनिमय करून निश्चित पद्धत ठरविण्याची आवश्‍यकता आहे.’’

------

पारितोषकांचे मानकरी (२०२०-२१)

१) देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना वसंतदादा पाटील पुरस्कार श्री पांडुरंग कारखाना, सोलापूर.

२) ऊस विकास व उत्पादकता प्रथम पारितोषिक श्रीदत्त सहकारी साखर कारखाना, शिरोळ, कोल्हापूर. द्वितीय पुरस्कार राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना सांगली.

३) तांत्रिक कार्यक्षमता विघ्नहर सहकारी साखर कारखाना, पुणे. द्वितीय पुरस्कार डॉ. पतंगराव कदम सोनहिरा कारखाना, सांगली.

४) विक्रमी ऊस गाळप जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना, कोल्हापूर.

५) विक्रमी ऊस उतारा अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना, सातारा.

६) अत्युत्कृष्ट सहकारी साखर कारखाना श्री छत्रपति शाहू सहकारी साखर कारखाना, कागल, कोल्हापूर.

७) विक्रमी साखर निर्यात प्रथम विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना, पिंपळनेर. द्वितीय सह्याद्रि पांडुरंग कारखाना, सोलापूर

------

पारितोषकांचे मानकरी (२०१९-२०२०)

१) देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना वसंतदादा पाटील पुरस्कार भीमाशंकर कारखाना, आंबेगाव, पुणे

२) ऊस विकास प्रथम पारितोषिक डॉ. पतंगराव कदम सोनहिरा कारखाना, सांगली. द्वितीय अजिंक्यतारा कारखाना, सातारा

३) तांत्रिक कार्यक्षमता विघ्नहर सहकारी साखर कारखाना, आंबेगाव, पुणे. द्वितीय पुरस्कार क्रांतीअग्रणी जी. डी. बापू लाड कारखाना, पलूस

४) आर्थिक व्यवस्थापन पारितोषिक कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ कारखाना, अंबड, जि. जालना (द्वितीय)

५) विक्रमी ऊस उतारा कुंभी-कासरी साखर कारखाना, कुडित्रे, कोल्हापूर

६) विक्रमी साखर निर्यात प्रथम पारितोषिक जवाहर शेतकरी साखर कारखाना, हुपरी, जि. कोल्हापूर, द्वितीय सह्याद्री साखर कारखाना, कराड

loading image
go to top