esakal | निर्देशांकांची पुन्हा आपटी
sakal

बोलून बातमी शोधा

Share market

साडेआठ लाख कोटी पाण्यात 
सलग नवव्या सत्रात भांडवली बाजारावर लाल निशाण फडकले. सेन्सेक्‍स आणि निफ्टीतील घसरण थांबत नसल्याने गुंतवणूकदार हवालदिल झाले असून, आतापर्यंत बाजारात साडेआठ लाख कोटींचा चुराडा झाला. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्‍समध्ये फेब्रुवारीपासून सर्वांत दीर्घकालीन घसरण आहे. निफ्टीसाठी मात्र २०११ नंतर पहिल्यांदाच प्रदीर्घ घसरण सुरू आहे.

निर्देशांकांची पुन्हा आपटी

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

शेअर बाजारात आतापर्यंत साडेआठ लाख कोटींचा चुराडा
मुंबई - अमेरिका-चीनमधील व्यापारी संघर्षाचा धसका घेतलेल्या गुंतवणूकदारांनी सलग नवव्या सत्रात विक्रीचा सपाटा कायम ठेवला. परिणामी, मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्‍स ३७२.१७ अंशांच्या घसरणीसह ३७ हजार ९०.८२ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत १३०.७० अंशांची घट झाली आणि तो ११ हजार १४८.२० अंशांवर स्थिरावला. आजच्या सत्रात गुंतवणूकदारांनी तब्बल दोन लाख कोटी गमाविले.

परस्पर शुल्क वाढविण्यावरून अमेरिका आणि चीनमधील दबाव वाढला आहे. याचा परिणाम जागतिक बाजारपेठेवर होण्याची शक्‍यता आहे.

त्याशिवाय, कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये वाढ झाल्याने भांडवली बाजारातील वातावरण नकारात्मक बनले. त्यामुळे परकी संस्थात्मक गुंतवणूकदार उदयोन्मुख बाजारपेठांमधून पैसे काढून घेत आहेत. शिवाय, सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्यापासून बाजारात दबाव निर्माण झाला आहे. गुंतवणूकदारांचे लक्ष नव्या सरकारकडे लागले असल्याचे शेअर दलालांचे म्हणणे आहे. आज बाजार उघडताच चौफेर विक्रीचा सपाटा सुरू झाला. सन फार्माचा शेअर दिवसभरात २० टक्‍क्‍यांपर्यंत घसरला होता. मात्र, बाजार बंद होताना तो सावरत ९.३९ टक्‍क्‍यांच्या घसरणीसह स्थिरावला.

याशिवाय येस बॅंक, टाटा स्टील, इंड्‌सइंड बॅंक आदी शेअर पाच टक्‍क्‍यांनी घसरले. दरम्यान, तिमाही कामगिरीतील सुधारणेचा एचडीएफसीला फायदा झाला. एचडीएफसीचा शेअर तेजीत होता. त्याशिवाय एचयूएल, इन्फोसिस, बजाज फायनान्स, कोल इंडिया, हिरो मोटोकॉर्प शेअर तेजीसह बंद झाले.

देशात निर्माण झालेली रोकडटंचाई; त्याशिवाय गुंतवणूक आणि खप कमी झाल्याने गुंतवणूकदार चिंतेत असून, पैसे काढून घेण्याला प्राधान्य दिले जात असल्याचे स्पेक्‍ट्रम वेल्थ मॅनेजमेंटचे मुख्य विश्‍लेषक सुनील शर्मा यांनी सांगितले. बाजारात तब्बल ३०० शेअर्सचे मूल्य वर्षभराच्या नीचांकावर गेले आहे. ही पडझड नेमकी कधी थांबविणार, याबाबत गुंतवणूकतज्ज्ञसुद्धा चिंतेत आहेत. दरम्यान, कच्च्या तेलाच्या भावात सोमवारी १.०९ डॉलरची वाढ झाली. तेलाचा भाव प्रतिबॅरल ७१.७१ डॉलरपर्यंत वाढला. सौदी अरेबियाच्या चार मालवाहू जहाजांवर फुजैराह या बंदरानजीक हल्ला झाल्याचा दावा सौदी सरकारने केला आहे. यामुळे मध्य पूर्वेत युद्धजन्य स्थिती निर्माण झाली आहे.

loading image