esakal | शेअर बाजारात "एक गरम चाय की प्याली हो...' 
sakal

बोलून बातमी शोधा

Share market update tata beverages shares trade higher

शेअर बाजारात "एक गरम चाय की प्याली हो...' 

sakal_logo
By
भूषण गोडबोले

अमेरिका-इराणमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे मागील आठवड्यात भारतीय शेअर बाजाराने सुरुवात घसरणीने केली; मात्र नंतर युद्धतणाव निवळल्याची बातमी आल्यावर गुरुवारी पुन्हा जोरदार तेजी दर्शविली. सप्ताहअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक "सेन्सेक्‍स' 147 अंशांची तेजी दर्शवून 41,599 अंशांवर, तर "निफ्टी' 40 अंशांची तेजी दर्शवून 12,256 अंशांवर बंद झाला. 
तेजी कशात दिसते? 

चार्टनुसार टाटा केमिकल, टाटा ग्लोबल ब्रेव्हरेजेस, पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन आदी कंपन्यांचे शेअर तेजीचा कल दर्शवत आहेत. खरेदीचा व्यवहार करण्यासाठी तेजीचा कल दर्शविणाऱ्या शेअरची निवड करणे आणि व्यवहार करताना अंदाज चुकण्याचा धोका ओळखून "स्टॉपलॉस' ठेवणे अत्यंत आवश्‍यक असते. टाटा ग्लोबल ब्रेव्हरेजेस या कंपनीच्या शेअरने 12 रुपयांची तेजी दर्शवून शुक्रवारी 342 रुपयांना बंद दिला. ही कंपनी चहा, कॉफी; तसेच पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरचा व्यवसाय करते. 13 डिसेंबर 2019 पासून "लिमिटेड रेंज' म्हणजेच 310 ते 330 या मधेच चढ-उतार दर्शविल्यानंतर मागील आठवड्यात चार्टनुसार शॉर्ट टर्म म्हणजेच अल्पावधीसाठी टाटा ग्लोबल ब्रेव्हरेजेस या शेअरने तेजीचे संकेत दिले आहेत. आलेखानुसार जोपर्यंत या शेअरचा भाव 316 रुपयांच्या वर आहे, तोपर्यंत अल्पावधीमधे चढ-उतार दर्शवत तो आणखी वर जाऊ शकतो. यामुळे सध्या कडाक्‍याच्या थंडीत गरमगरम चहा घेत चहाचा व्यापार करणाऱ्या टाटा ग्लोबल ब्रेव्हरेजेस या शेअरमध्ये अल्पावधीसाठी खरेदी करणे फायदेशीर ठरू शकेल. मात्र, बाजाराचा पीई-प्राईस अर्निंग रेशो 28 पेक्षा जास्त असल्याने म्हणजेच भारतीय शेअर बाजार महाग असल्याने "ट्रेडिंग' करताना मर्यादितच भांडवल गुंतविणे योग्य ठरेल. तसेच या शेअरमधे ट्रेड करताना 316 रुपयांचा "स्टॉपलॉस' ठेवणे अत्यंत आवश्‍यक आहे. थोडक्‍यात, "एक गरम चाय की प्याली हो', म्हणत थंडीत चहा ठीक आहे; मात्र घेताना थोडासा आणि फुंकून पिणे जसे योग्य असते, तसेच ट्रेड करताना भांडवल मर्यादित आणि तेजीचा अंदाज चुकल्यास म्हणजे या शेअरचा भाव 316 रुपयांच्या खाली गेल्यास "लॉस' म्हणजेच मर्यादित तोटा स्वीकारून बाहेर पडणे योग्य ठरेल. 


(डिस्क्‍लेमर ः लेखक "सेबी' रजिस्टर्ड गुंतवणूक सल्लागार आहेत. त्यांनी त्यांच्या अभ्यासानुसार मत व अंदाज व्यक्त केले आहेत. "सकाळ' त्यांच्याशी सहमत असेलच असे नाही. वाचकांनी शेअर बाजारातील जोखीम लक्षात घेऊन आपापल्या जबाबदारीवर गुंतवणुकीचा निर्णय घेणे अपेक्षित आहे.) 
 

loading image