अर्थभान : शेअरवरील परतावा मोजता का?

आपली कित्येक वर्षे शेअरमध्ये गुंतवणूक आहे
Share Market News Updates
Share Market News UpdatesSakal

आपली कित्येक वर्षे शेअरमध्ये गुंतवणूक आहे, असे सांगणारे अनेक गुंतवणूकदार भेटतात. त्याहीपेक्षा जास्त संख्येने शेअर ट्रेडर भेटतात. बहुधा हे तिशी-पस्तीशीतील असतात. उत्साही असतात; पण थोड्या काळात शेअरवर फायदा करून घ्यायच्या खटपटीत असल्याने शेअर ही दीर्घकाळाची गुंतवणूक आहे, हे समजून घेत नाहीत.

त्यामुळे ट्रेडर आणि गुंतवणूकदार यातील फरक त्यातील अनेकांना माहित नसतो. ट्रेडर हा अगदी कमी कालावधीत सौदे करून फायदा कमावण्याच्या मागे असतो. या फास्ट आणि टेकसॅव्ही जमान्यात झीरो ब्रोकरेज प्लॅनमुळे ट्रेडिंगला उत्तेजनही मिळत आहे. सर्व काही इन्स्टंट आणि अ‍ॅपमध्ये असल्याने कंपनीचे फंडामेंटल अ‍ॅनालिसिस वगैरे संकल्पना हे लोक माहिती करून घ्यायच्या फंदात पडत नाहीत.

टीव्ही चॅनल्सवरसुद्धा टेक्निकल अ‍ॅनालिस्ट सतत खरेदी-विक्रीच्या टिप्स देत असतात. यातील बरेचसे कोणाच्या तरी सांगण्यावरून डी-मॅट खाते उघडतात आणि ब्रोकरने दिलेल्या टिप्सच्या आधारे खरेदी-विक्री चालू करतात. काही तर दुसऱ्या कोणाला तरी आपला पासवर्ड देऊन ठेवतात आणि ती व्यक्ती यांच्यातर्फे शेअरची खरेदी-विक्री करू लागते; पण त्याचा तपशील हे त्यांच्याकडून घेत नाहीत आणि स्वत:ही ठेवत नाहीत.

जे गुंतवणूकदार म्हणजे इन्व्हेस्टर असतात ते काही वर्षे थांबण्याच्या तयारीनेच शेअर खरेदी करतात. शेअर खरेदीपूर्वी त्याकरीता लागणारा गृहपाठही अनेकांनी केलेला नसतो आणि त्यातीलसुद्धा क्वचितच कोणी आपल्या गुंतवणुकीवर नक्की किती परतावा मिळाला आहे, हे खात्रीपूर्वक सांगू शकतात.

अनेक जण असे सांगतात, की आमचे हे शेअर ब्लू-चिप आहेत. आम्ही कित्येक वर्षे ते घेऊन ठेवले असून, त्यावर अनेक वर्षे भरघोस लाभांश मिळाल्यामुळे आता या शेअरची किंमत आमच्या दृष्टीने शून्य झाली आहे. असे लोक आता जो लाभांश मिळतो आहे, तो बोनसच आहे असे समजतात आणि त्यातच समाधान मानतात.

चक्रवाढ गतीचा परतावा

कित्येकांना आपल्या प्रत्येक गुंतवणुकीवर आपल्याला किती परतावा मिळाला, याची माहिती असली पाहिजे, हेच माहित नसते. काही जण खरेदी किंमत आणि आताची किंमत यातील फरक म्हणजे परताव्याचा दर समजतात.

म्हणजे एकूण किती टक्के परतावा मिळाला, हे ते सांगतात. आपली कोणती गुंतवणूक लाभदायी ठरली हे कळण्याकरीता त्यावरचा चक्रवाढ गतीने किती परतावा मिळाला, हा आकडा माहिती असणे आवश्यक आहे, हेच अनेकांना माहिती नसते. एका सोप्या उदाहरणात या दोन्ही पद्धतीने परतावा काढून त्यात किती फरक पडतो ते दाखवले आहे.

शेअर खरेदी किंमत- १०० रुपये, खरेदी तारीख- एक जानेवारी २०१७, विक्री किंमत- १५० रुपये

विक्री तारीख एकूण परतावा चक्रवाढ परतावा

३१/१२/२०१७ १०० टक्के ५०%

३१/१२/२०१८ १०० टक्के २२.५%

३१/१२/२०१९ १०० टक्के १४.५%

३१/१२/२०२० १०० टक्के १०.७ %

३१/१२/२०२१ १०० टक्के ८.४ %

३१/१२/२०२२ १०० टक्के ७%

(याशिवाय जाहीर झालेला लाभांश तारखेनुसार घेऊन परताव्याचा वेगळा हिशेब करावा लागेल.

(एकूण परतावा = टोटल रिटर्न, चक्रवाढ परतावा = कंपाउंडेड अ‍ॅन्युअल ग्रोथ रेट -सीएजीआर)

यावरून लक्षात येईल, की ‘टाईम व्हॅल्यू ऑफ मनी’चे तत्त्व लावले म्हणजे चक्रवाढ गतीने परतावा काढला, तर तो कमी होत जातो.

ही अत्यंत महत्त्वाची बाब अनेक गुंतवणूकदारांच्या ध्यानात येत नाही. याशिवाय विक्रीवरचा कॅपिटल गेन टॅक्स आणि लाभांशावर करप्राप्त उत्पन्नानुसार ३३ टक्क्यांपर्यंत प्राप्तिकर धरून हा परतावा अजून कमी होईल. अनेकदा ब्लू-चिप कंपन्यांच्या शेअरवरही निर्देशांकापेक्षाही कमी परतावा मिळतो. त्यामुळे आपण केलेली शेअरमधील गुंतवणूक फायदेशीर आहे, की नाही, याचा वरीलप्रमाणे तपशील ठेऊन त्याप्रमाणे बदल केले पाहिजेत.

कित्येकवेळा शेअरची नव्याने खरेदी होत असते, नंतर राईट्स-बोनस शेअरही मिळतात. त्यांचाही तारखेनुसार तपशील ठेऊन शेअर विकले नाही, तरी त्याच्या बाजारमूल्यावर दरवर्षी दर शेकडा चक्रवाढ गतीने किती परतावा मिळाला हे तपासून बघितलेच पाहिजे.

‘व्हॉट यू मेजर इज व्हॉट यू गेट’ अशी एक म्हण आहे, म्हणजे ‘काय मिळाले हे तुम्ही मोजले नाही, तर तुमच्यात सुधारणा होणार नाही’. जगप्रसिद्ध व्यवस्थापन गुरू पीटर ड्रकर यांचे हे वाक्य सर्व गुंतवणूकदारांनी लक्षात ठेऊन त्याप्रमाणे कृती केली पाहिजे. शेअरमधील गुंतवणूक हे येरागबाळ्याचे काम नोहे!

(लेखक अनुभवी गुंतवणूक विश्‍लेषक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com