गृहकर्जाची वेळेआधीच परतफेड करावी का?

Homeloan
Homeloan

गृहकर्ज घेणाऱ्यांकडून दोन प्रश्न नेहमी विचारले जातात. गृहकर्जाची परतफेड नियोजित वेळेआधी पूर्णपणे किंवा अंशत: करावी का? आणि नियमित गृहकर्ज हप्ता भरला तरीही कर्जाची रक्कम तेवढीच का? पहिल्या प्रश्नाचे उत्तर व्यक्तिपरत्वे बदलत जाते. यामध्ये गृहकर्ज घेतलेल्या व्यक्तीची आर्थिक स्थिती, त्याचा स्वभाव, जोखीम घेण्याची क्षमता, उपलब्ध गुंतवणुकीच्या संधी, अर्थव्यवस्थेची स्थिती आणि आर्थिक बाबींचे विश्‍लेषण करण्याची क्षमता या बाबींचा विचार करावा लागेल.

गृहकर्जाची नियोजित वेळेआधी परतफेड करण्यापूर्वी विचार करा
‘इमर्जन्सी फंड’ 

गृहकर्जाची नियोजित वेळेआधीच परतफेड न करण्यामागे आणखी एक कारण म्हणजे, ‘इमर्जन्सी फंड’ म्हणून अतिरिक्त निधीचा वापर. त्यामुळे तो निधी लिक्विड फंड किंवा अडचणीच्या वेळी लगेच उपलब्ध होईल अशा गुंतवणूक प्रकारात गुंतवा.

करवजावटीच्या तरतुदींचा लाभ 
तुमचे उत्पन्न अधिक असेल आणि गृहकर्जामुळे तुमची झोप उडत नसेल तर तुमच्या नियोजित कालावधीसाठी ‘ईएमआय’ सुरू ठेवणे योग्य ठरेल. कारण करवजावटीच्या तरतुदींचा लाभ घेता येईल. 

गुंतवणुकीचे उत्तम परतावा देणारे इतर पर्याय 
अतिरिक्त निधी अधिक चांगला परतावा देणाऱ्या गुंतवणूक साधनांमध्ये गुंतविल्यास त्यातून मिळणारा करपश्‍चात परतावा हा गृहकर्जासाठी भराव्या लागणाऱ्या व्याजदरापेक्षा अधिक असेल तर गृहकर्जाची वेळेआधी परतफेड करू नका. नियमितपणे ‘ईएमआय’ सुरू ठेवा. 

इन्शुरन्स विसरू नका
गृहकर्ज घेत असाल तर त्यासाठी ‘इन्शुरन्स कव्हर’ अवश्‍य घ्यावे. ज्या व्यक्तीने गृहकर्ज घेतले आहे त्याने ‘टर्म इन्शुरन्स’ घेणे गरजेचे आहे. बॅंक किंवा वित्तीय संस्थाच आता कर्जासोबत इन्शुरन्स कव्हर सक्तीचे करतात. त्यातही योग्य तो इन्शुरन्स निवडून घेणे योग्य ठरेल.

लवकर गृहकर्जाची परतफेड करून त्यावरील व्याजापोटी भराव्या लागणाऱ्या रकमेची बचत
समजा गुंतवणुकीवर मिळणाऱ्या करपश्‍चात परताव्यापेक्षा गृहकर्जावरील व्याजदर जास्त ठरणार असेल तर अतिरिक्त निधी वापरून गृहकर्जाची नियोजित वेळेआधी परतफेड करा. गृहकर्ज लवकर फेडल्यामुळे भविष्यात होणारी बचत चांगल्या गुंतवणूक साधनांमध्ये गुंतवा. मात्र लवकर परतफेड करताना बॅंकेच्या शुल्काचा हिशेब करूनच तो निर्णय घ्यावा.

नियमित गृहकर्ज 
हप्ता भरला तरीही कर्जाची रक्कम तेवढीच का? 

सर्वसाधारणपणे गृहकर्ज हे दीर्घकालावधीसाठी असते. गृह कर्जाचा हप्ता (ईमआय) भरल्यानंतर गृहकर्जाची मुद्दल आणि त्यावरील व्याज यांची रक्कम कमी होत असते. मात्र सुरुवातीच्या काळात ‘ईएमआय’मध्ये मुद्दलाची रक्कम कमी असते आणि कर्जावरील व्याजाच्या रकमेचाच भाग त्यात अधिक असतो. म्हणजेच बॅंकांकडून आधी व्याज वसूल केले जाते. यामुळे गृहकर्जाच्या परतफेडीच्या सुरुवातीच्या टप्प्यात मुद्दलात फारशी घट होत नाही, तर व्याजाचीच अधिक परतफेड होत असते. मात्र नंतरच्या टप्प्यात मुद्दलदेखील कमी होत जाते. अतिरिक्त निधी गृहकर्जाच्या परतफेडीसाठी वापरल्यास मुद्दलात तर घट होतेच पण त्यामुळे मुद्दलावर आकारण्यात येणाऱ्या व्याजातही घट होते. मात्र कर्जाची नियमित परतफेड केल्यानंतर काही कालावधीनंतर ‘ईएमआय’ची रक्कम तितकीच ठेवली तर गृहकर्जाची परतफेडीचा नियोजित कालावधी कमी होतो किंवा जर ग्राहकाला गृहकर्जाचा कालावधी तितकाच ठेवायचा असेल तर ‘ईएमआय’च्या रकमेत घट होते. 

एकूणच, गृहकर्जाची वेळेआधीच परतफेड करावी का, या प्रश्नाचे उत्तर सरळ आणि सोपे नाही. व्यक्ती आणि परिस्थितीनुरूप यासंदर्भात निर्णय घेणेच योग्य ठरते. 
(शब्दांकन - विजय तावडे)

(‘फायनान्शियल अफेअर्स आॅफ द काॅमन मॅन’ या प्रसिद्ध झालेल्या पुस्तकाच्या साैजन्याने)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com