esakal | स्मार्ट संधी -शेअर बाजारात ‘खेला होबे’

बोलून बातमी शोधा

Share Market

जास्त परताव्याच्या शोधात आपण कळत-नकळतपणे जास्त जोखीम पत्करत असतो. आपण खरोखरच अशी जोखीम घेतली पाहिजे का? ती आवश्यक आहे का? याचा विचार करूनच गुंतवणुकीचे निर्णय घ्यावेत.

स्मार्ट संधी - शेअर बाजारात ‘खेला होबे’
sakal_logo
By
श्रीनिवास जाखोटिया

आगामी पंधरा दिवस शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात घडामोडी घडण्याची शक्यता आहे. कोरोनाची दुसरी लाट, त्यामुळे आलेले आंशिक निर्बंध आणि त्याचे होणारे आर्थिक परिणाम, मार्चचे तिमाही निकाल, पाच राज्यांतील निवडणूक निकाल अशा अनेक महत्त्वाच्या गोष्टी येणाऱ्या दिवसांत बाजाराची चाल ठरविणार आहेत. मागील काही दिवस बाजार हा त्याप्रमाणे वाटचालदेखील करीत आहे. त्यातल्या त्यात मोठा दिलासा देणारी गोष्ट म्हणजे वस्तू व सेवाकराच्या (जीएसटी) संकलनाचे सर्वोच्च आकडे, प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कराच्या संकलनात अपेक्षेपेक्षा जास्त झालेली वाढ; तसेच या वर्षीसुद्धा मॉन्सून हा सर्वसामान्य राहण्याचा अंदाज.

हेही वाचा: शेअर मार्केट - दुसरी लाट...दुसरी संधी

अशा प्रकारे वरील गोष्टींवर आपला शेअर बाजार हा मोठ्या प्रमाणात वर-खाली होऊ शकतो. त्यामुळे बाजारात ‘ट्रेडर’साठी हा काळ आव्हानात्मक असेल. परंतु, दीर्घकालीन गुंतवणूकदारांनी योग्य संधीची वाट पाहावी आणि बाजारात मोठी घट झाल्यास आपली यादी तयार ठेवावी. तसेच जोखीम क्षमता कमी असलेल्यांनी अर्थातच म्युच्युअल फंडांचा मार्ग निवडावा.

‘रिटर्न’ है तो ‘रिस्क’ है

जास्त परताव्याच्या शोधात आपण कळत-नकळतपणे जास्त जोखीम पत्करत असतो. आपण खरोखरच अशी जोखीम घेतली पाहिजे का? ती आवश्यक आहे का? याचा विचार करूनच गुंतवणुकीचे निर्णय घ्यावेत. त्यामुळे येणाऱ्या दिवसांत बाजारात वर नमूद केलेल्या अनेक बाबीमुळे मोठ्या प्रमाणात ‘खेला होबे!’

(लेखक शेअर बाजारातील गुंतवणुकीचे जाणकार आहेत.)