छोट्या कुटुंबाची बजेट कार

छोट्या कुटुंबाची बजेट कार

मारुती सुझुकी कंपनीने १९८३ मध्ये सर्वसामान्यांचे बजेट समोर ठेवून मारुती ८०० ही कार तयार केली होती. १९७९ सालच्या सुझुकी या जपानी कंपनीच्या ८०० सीसी पॉवरचे इंजिन असणाऱ्या सुझुकी अल्टो गाडीसारखीच मारुती ८०० कार तयार करण्यात आली होती. मारुती ८०० ही भारतात सर्वाधिक विकण्यात आलेली दुसऱ्या क्रमांकाची कार असून सर्वाधिक विकलेली कार ॲम्बेसिडर आहे. १९८३ ते २०१४ या काळात जगभरात जवळपास २८ लाख मारुती ८०० तयार करण्यात आल्या. त्यामधील सर्वाधिक २६ लाख गाड्या भारतात विकल्या गेल्या.

७० आणि ८० च्या दशकात भारतात प्रीमियर, टाटा यांसारख्या काही मोजक्‍या कंपन्याच कार तयार करत होत्या. मात्र १९८२ साली भारताच्या मारुती उद्योग लिमिटेड या कंपनीने जपानच्या सुझुकी मोटर्ससोबत भागीदारीतून मारुती सुझुकी ही कंपनी सुरू केली. अवघ्या वर्षभरात या कंपनीची पहिली कार मारुती सुझुकी ८०० भारतीय बाजारात दाखल झाली. आतापर्यंत बाजारात असणाऱ्या सर्व गाड्यांच्या तुलनेत आकाराने लहान असणारी मारुती ८०० ची किंमतही इतर गाड्यांच्या तुलनेत कमी होती.

मारुती ८०० या गाडीची भारतात दाखल होण्याचा समारंभ इतक्‍या थाटात पार पडला की, ही गाडी सर्वप्रथम विकत घेण्यासाठी कंपनीला लकी ड्रॉ काढण्याची वेळ आली. हरपाल सिंग यांनी हा पहिला लकी ड्रॉ जिंकून ही गाडी घेण्याचा मान मिळवला आणि तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी हरपाल यांना गाडीच्या चाव्या सुपूर्द केल्या. १४ डिसेंबर १९८३ साली नवी दिल्ली इथे हा कार्यक्रम पार पडला होता. 

१९८६ मध्ये मारुती ८०० ची दुसरी आवृत्ती आधीच्या कारपेक्षा अधिक आधुनिक तंत्रज्ञान वापरून तयार करण्यात आली होती. नव्या गाडीत फ्रंट व्हिल ड्राईव्हची सुविधा देण्यात आली होती. याच सोबत आकाराला छोटी असल्याने त्या किमतीतील इतर गाड्यांच्या तुलनेत ही गाडी वेगवान होती. नव्या आलेल्या मारुतीची लोकप्रियता इतकी होती, की भारतासह या गाडीला परदेशातूनदेखील मागणी येऊ लागली. १९८७ मध्ये तब्बल ५०० कार या हंगेरी येथे पाठवण्यात आल्या. त्यापाठोपाठ पश्‍चिम युरोपातील काही देशातदेखील मारुती ८०० ची विक्री होऊ लागली.

१९८९ मध्ये फ्रान्स आणि १९९० मध्ये नेदरलॅंडच्या वाहन बाजारातदेखील मारुती ८०० ने आपली पाळेमुळे रोवली आणि बघता बघता युरोपातील बऱ्याच देशातील रस्त्यांवर मारुती ८०० धावू लागली. आशियात भारतासह नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका या देशातही मारुती ८०० ची विक्री लक्षणीय होती. 

१९८३ ते २००४ अशी तब्बल २१ वर्षे मारुती ८०० ही भारतातील सर्वाधिक विकली जाणारी कार म्हणून ओळख मिळवून होती. दरम्यान २००४ मध्ये मारतीच्याच अल्टो या गाडीने मारुती ८०० ला मागे टाकत सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या गाडीचा मान मिळवला. १९८३ ते २००८ पर्यंत भारतीय बाजारातील सर्वात स्वस्त गाडी असणारी मारुती ८०० ला टक्कर देण्यासाठी टाटा या कंपनीने २००८ साली ‘नॅनो’ गाडी बाजारात आणली. एक लाखात कार अशी जाहिरात करत नॅनो मध्यमवर्गीयांची कार म्हणून बाजारात आली. काही दिवसांतच नॅनोने मारुती ८०० चे बरेच ग्राहक आपल्याकडे खेचले. मात्र, कमी ताकदीचे आणि मागच्या बाजूस इंजिन दिले असल्याने नॅनोला ग्राहकांनी हवी तशी पसंती दिली नाही. दरम्यानच्या काळात वॅगेनार, सॅन्ट्रो, इंडिगा या गाड्या बाजारात आल्या.

या गाड्या आकाराला मारुती ८०० पेक्षा थोड्याच मोठ्या आणि किमतीतही काहीशाच अधिक असल्याने ग्राहक या गाड्यांना पसंती देऊ लागले. हळूहळू मारुती ८०० ची विक्री कमी होऊ लागली आणि अखेर २०१० मध्ये या गाडीची निर्मिती बंद झाली. सामान्यांसाठी तयार करण्यात आलेली पहिली वहिली कॉम्पेक्‍ट कार रस्त्यांवरही हळूहळू कमी दिसू लागली. त्यामुळे २०१० च्या आधी तयार करण्यात आलेल्या मारुती ८०० आता केवळ दिसणार असून, काही वर्षांत त्यादेखील दिसेनाशा होणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com