येस बँक: डायमंड टू डस्ट 

Special Crisis Story of Yes Bank
Special Crisis Story of Yes Bank

‘अहंकार’ हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू. अहंकारामुळे होत्याचे नव्हते करून घेतलेल्या रावण किंवा भस्मासुराच्या पौराणिक कथा आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहेत. प्रत्येक व्यक्तीला अहंकार असतो. कुणाला आपल्या सौन्दर्याचा, कुणाला ज्ञानाचा, कुणाला पदाचा तर कुणाला आपल्या कर्तृत्वाचा. एखाद्याने शून्यातून विश्व निर्माण केले की मग बघायलाच नको. मग त्या विश्वाविषयी मी सर्व जाणतो किंवा त्याविषयी निर्णय घेण्याचा अधिकार फक्त माझाच हा अहंगंड अशा व्यक्तीच्या मनात निर्माण होतो. हे त्याविषयी दुसऱ्या कोणी प्रश्न विचारलेले अशा व्यक्तीला आवडत नाहीत. येस बँकेच्या राणा कपूर यांच्या बाबतीत नेमकं असंच काहीस घडलंय.

राणा कपूर दोन वर्षांपर्यंत भारतीय बँकिंग क्षेत्रातील एक अतिशय आदरणीय नाव. 1980 ते 1996 पर्यंत बँक ऑफ अमेरिका आणि 1996 पासून ANZ Grindlays या जागतिक पातळीवरील बँकांमध्ये उच्चपदावर काम केल्यानंतर 2004 साली त्यांनी भारतात येऊन अशोक कपूर यांच्या साथीने येस बँकेची मुहूर्तमेढ रोवली. 'कॉर्पोरेट लेन्डिंग आणि सिंडिकेट लोन फीस' हे बँकेचे प्रमुख व्यावसायिक मॉडेल. प्रामुख्याने कॉर्पोरेट फायनान्स क्षेत्राशी संबंधित कामकाजावर लक्ष केंद्रित केलेल्या येस बँकेने अल्पावधीतच प्रचंड मोठी 'कॉर्पोरेट कर्जे' वाटून आणि व्होलसेल डिपॉझिट्स' स्वीकारून यश मिळविले. कर्ज मागायला आलेल्या कॉर्पोरेट्सना रिकाम्या हाताने जाऊ न देण्याच्या त्यांच्या 'बोल्ड' निर्णयाने त्यांनी बँकेच्या अडचणींची पायाभरणी करायला सुरुवात केली. दरम्यान 'हम करे सो कायदा' या वृत्तीमुळे कर्ज देताना दुसऱ्या कोणाची भूमिकाच नसल्याने प्रश्न विचारण्याचा इतरांना अधिकारच नव्हता. त्यामुळे त्यांनी कोणताही विचार न करता भरमसाट कर्जे वाटली. कर्ज वाटप केलेल्यात डीएचएफएल, आयएल अँड एफएस, अनिल अंबानी यांच्या नैतृत्वाखालील रिलायन्स ग्रुप अशी 'महनीय' नावे होती. त्यामुळे व्हायचे तेच झाले.  

डीएचएफएल, आयएल अँड एफएस, रिलायन्स ग्रुप आणि इतर बड्या कंपन्या ढासळल्याने साहजिकच येस बँकेच्या थकीत कर्जाचा आकडा वाढायला सुरुवात झाली. परंतु, ‘अहंकारा'ने भरपूर राणा कपूर यांनी ती कर्जे दाखविली असती तरच नवल. येस बँकेने 2016-17 या कालावधीसाठी प्रथमच 2,018 कोटी रुपयांचे थकीत कर्ज दाखविले. नेमक्या याच कालावधीत अधिक पारदर्शक आणि कठोर होत चाललेल्या आरबीआयच्या ही बाब लक्षात यायला वेळ लागला नाही आणि त्यांनी केलेल्या 'अॅसेट क्वालिटी ऑडिट'मध्ये थकीत कर्जाचा आकडा 8,373 कोटी इतका आला. येथूनच आरबीआय आणि येस बँकेच्या पारदर्शकतेच्या संघर्षाला सुरुवात झाली. राणा कपूर यांच्या ही बाब लक्षात आल्याने त्यांनी आपली प्रकरणे समोर येऊ नयेत म्हणून बँकेवरील आपली मांड अधिकच घट्ट करायला सुरुवात केली. परिणामी त्यांनी येस बँकेच्या सीईओपदी 1 सप्टेंबर 2018 ते 31 ऑगस्ट 2021 या कालावधीसाठी बहुमताने फेरनिवड घडवून आणली. मात्र देशातील बँकांची सर्वोच्च संस्था असलेल्या आरबीआयने आपल्या अधिकाराचा वापर करून राणा कपूर यांना ब्रेक लावला आणि त्यांची मुदतवाढ रद्द केली.
 
31 जानेवारी 2019 रोजी बँकेच्या सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक पदावरून पायउतार झाल्यानंतर येस बँकेच्या कर्जवाटपातील करामती बाहेर पडल्याने येस बँकेच्या अडचणीत वाढ व्हायला सुरुवात झाली. दरम्यान आरबीआयने नियुक्त केलेल्या रवणीत गिल यांना बँकेच्या भांडवल उभारणीत यश न आल्याने याचा शेवट गुरुवारी, ५ मार्च रोजी बँकेच्या कामकाजावर निर्बंध लादण्यात झाला.

एकेकाळी राणा कपूर म्हणजेच येस बँक हे समीकरण इतके घट्ट असताना कपूर यांनी बँकेच्या शेअरचे वर्णन 'डायमंड' असे केले होते. यावेळी बॅंकेचा शेअर साधारणतः  400 रुपयांच्या घरात व्यवहार करत होता. मात्र बँकेवर निर्बंध लादल्यानंतर शुक्रवारी बँकेच्या शेअरमध्ये एका दिवसात तब्बल 85 टक्क्यांची घसरण होऊन शेअर 5.65 रुपयांवर पोचून किंमत 'धुळीस' मिळाली. बँकेची मुहूर्तमेढ रोवण्यापासून ते 3.4 लाख कोटींचे भागभांडवल असलेली बँक बनविण्यात राणा कपूर यांचा सिंहाचा वाटा होता. मात्र आज त्यांच्याच ‘अहंकरा’ने बँकेचा शेअर 'डायमंड' वरून 'डस्ट' वर पोचला आहे.  

राणा कपूर यांची अशीही बाजू
1997 साली नेदरलँडच्या राबोबॅंकेच्या साथीने राणा कपूर, अशोक कपूर आणि हरकत सिंग यांनी मिळून सुरुवातीला एनबीएफसी म्हणून येस बँकेच्या कामकाजाला सुरुवात केली होती. 2003 साली बँकिंग लायसन्स मिळाल्यानंतर हरकत सिंग यांनी कंपनीतुन बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि येस बँकेची धुरा राणा कपूर आणि अशोक कपूर यांच्या हाती आली. मात्र राणा कपूर हेच बँकेचा चेहरा होते. दरम्यान 2008 साली 26/11च्या आतंकवादी हल्ल्यात अशोक कपूर यांचा 'ट्रायडेंट' हॉटेलमध्ये मृत्यू झाला. अशोक कपूर कुटुंबीय दुःखात असताना राणा कपूर यांच्या अमानवी इच्छाकांक्षेला सुरुवात झाली. 2012च्या दरम्यान राणा कपूर यांनी प्रकाशित केलेल्या येस बँकेच्या अहवालात 12 टक्केची हिस्सेदारी असलेल्या आणि बँकेचे सहसंस्थापक असलेल्या अशोक कपूर यांचा उल्लेख देखील करण्यात आला नव्हता. त्याऐवजी स्वतःच्या 'फेवर'मध्ये असलेल्या दिवाण अरुण नंदा, एम एच श्रीनिवासन आणि रवीश चोप्रा यांसारख्याचा संचालक मंडळात समावेश करण्यात आला होता. विशेष म्हणजे 12 टक्केची मालकी असलेल्या अशोक कपूर कुटुंबियांना संचालक मंडळात देखील स्थान देण्यात आले नव्हते. अशोक कपूर कुटुंबियांसाठी हा दुसरा मोठा मोठा आघात होता.मात्र अशोक कपूर यांच्या पत्नी मधू कपूर आणि कन्या शगुन कपूर यांनी न्यायालयीन लढाई लढून आपला अधिकार मिळविला आणि चुकीच्या मार्गानी केलेल्या संचालकांची नियुक्ती रद्दबातल ठरविली. परिणामी येस बँकेला गिळंकृत करण्याचा राणा कपूर यांचा प्रयत्न असफल झाला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com