आता फक्त १२ रुपयांत करा विमान प्रवास

भागवत पेटकर 
मंगळवार, 23 मे 2017

या ऑफरमधील तिकिट मर्यादित असून 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' या तत्वाने तिकिट विक्री होणार असल्याचे स्पाईस जेट कंपनीने स्पष्ट केले आहे.

विमानातून प्रवास करणे महागडं वाटत असले तरी विमान कंपन्यांच्या स्पर्धा आणि त्यातूनच सुरू असलेल्या ऑफरमुळे स्वस्तात विमान प्रवासाच्या संधी प्रवाशांना मिळत आहे. स्पाइस जेट विमान कंपनीने आपल्या १२ व्या वर्षपूर्तीनिमित्त प्रवाशांसाठी अवघ्या १२ रुपयात विमान प्रवास उपलब्ध करून देण्याची घोषणा केली आहे.

स्पाईस जेटच्या १२ रुपयांतील प्रवासाच्या ऑफरमध्ये कर आणि इतर अधिभाराचा समावेश नाही. ही विशेष ऑफर देशातंर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी लागू असणार आहे. या ऑफर अंतर्गत तिकिट विक्रीची सुरूवात २३ मेपासून सुरू होणार असून २८ मेपर्यंत तिकिट बुक करता येणार आहे. '

ही ऑफर २६ जून २०१७ ते २४ मार्च २०१८ या कालावधी दरम्यानच्या कालावधीसाठी लागू असणार आहे. या ऑफरमधील तिकिट मर्यादित असून 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' या तत्वाने तिकिट विक्री होणार असल्याचे स्पाईस जेट कंपनीने स्पष्ट केले आहे. या ऑफरमध्ये तिकिट विक्रीत सहभागी होणाऱ्या ग्राहक लकी ड्रॉ साठी पात्र ठरणार आहे. या लकी ड्रॉमध्ये विजेता ठरणाऱ्या प्रवाशाला आंतरराष्ट्रीय विमान प्रवासासाठी एक मोफत तिकिट, मोफत देशातंर्गत विमान प्रवास आणि १० हजार रुपयांचे हॉटेल व्हाऊचर आदींचा समावेश आहे.

Web Title: spice jet offer flight booking only in 12 rupees