Budget 2019: जाचक एंजल टॅक्‍समधून सुटका

पौला मारिवाला
Saturday, 6 July 2019

नवउद्यमींच्या (स्टार्टअप) पंखांना बळ देण्याच्या दृष्टीने अर्थसंकल्पातून मोठा दिलासा मिळाला आहे. कर यंत्रणांकडून होणारी पिळवणूक थांबवत सरकारने जाचक ‘एंजल टॅक्‍स’मधून स्टार्टअपची सुटका केली. यामुळे देशभरातील जवळपास ३० हजार नोंदणीकृत ‘स्टार्टअप’ना फायदा मिळेल.

अर्थसंकल्प 2019:

शेअर प्रीमियमच्या मूल्यासंदर्भात कुठलीही चौकशी होणार नसल्याने ‘स्टार्टअप’ सुरू करण्यास इच्छुक असलेल्या हजारो तरुणांना प्रोत्साहन मिळेल. वर्षभरापासून ही मागणी करण्यात आली होती. कारण, वारंवार होणाऱ्या चौकशीने ‘स्टार्टअप’ हैराण झाले होते.

स्टार्टअपसंदर्भातील कर मंडळाकडे प्रलंबित दाव्यांची चौकशी करण्यापूर्वी संबंधित अधिकाऱ्यांना वरिष्ठांची परवानगी घ्यावी लागेल. निवडक गुंतवणूकदारांना दिल्या जाणाऱ्या शेअरच्या बाजारमूल्याबाबत ‘स्टार्टअप’ला स्पष्टीकरण द्यायची आवश्‍यकता नाही. हे शेअर ‘अल्टरनेट इन्व्हेस्टमेंट फंडा’च्या (एआयएफ) ‘प्रवर्ग-एक’ आणि ‘प्रवर्ग-दोन’लासुद्धा देता येतील. ही घोषणा स्वागतार्ह आहे. ‘स्टार्टअप’ना होणाऱ्या तोट्यासंदर्भात उपाययोजना करण्याची घोषणा केली आहे. ‘स्टार्टअप’च्या यशोगाथा, अडीअडचणी याविषयी माहिती सांगणारा विशेष कार्यक्रम दूरदर्शनवर सुरू केला जाणार आहे. यामुळे स्टार्टअपविषयी प्रचार आणि प्रसार होण्यास मदत मिळेल. 

नवउद्यमीला व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा संशोधनासाठी आवश्‍यक असलेल्या भांडवलासंदर्भात आजच्या अर्थसंकल्पात कुठलीच घोषणा झाली नाही. त्याचबरोबर विनातारण कर्ज किंवा वाजवी दरांत कर्ज उपलब्धतेबाबतदेखील अर्थमंत्र्यांनी कुठलाही शब्द काढला नाही. त्यामुळे ‘स्टार्टअप’साठी भांडवलाचा मुद्दा अनुत्तरित राहिला. स्टार्टअपसाठी २० हजार कोटींचा निधी सुरू करण्याचे वचन निवडणुकीपूर्वी देण्यात आले होते. मात्र, त्याची घोषणा झालीच नाही. तरुणाईतील संशोधन वृत्तीला प्रोत्साहन देणाऱ्या ‘अटल इनोव्हेशन मिशन’बाबत कुठलीही घोषणा झाली नाही. नॅशनल रिसर्च फाउंडेशनची स्थापना होणार असून, त्यात संशोधनाला चालना देण्यासाठी निधी दिला जाईल. मात्र, हा ‘स्टार्टअप’साठी किती असेल, हे पाहावे लागेल.

ठळक वैशिष्ट्ये...
 ‘ई-व्हेरिफिकेशन’ची घोषणा
 घर विकून ‘स्टार्टअप’मध्ये गुंतविणाऱ्यांना भांडवली नफा करात सवलत मार्च २०२१ पर्यंत कायम
 भांडवलीसाठी २० हजार कोटींच्या घोषणेचा अभाव 

परिणाम
 शेअर प्रीमियमच्या संदर्भात 
चौकशी नाही
 गुंतवणूकदार आणि त्याच्या उत्पन्नाविषयी ऑनलाइन छाननी पुरेशी
 नवउद्यमींमधील गुंतवणुकीचा ओघ वाढेल

पुढील पाच वर्षांची दिशा
 सर्वाधिक स्टार्टअप असलेल्या पहिल्या पाच देशांमध्ये भारताचा समावेश
 नजीकच्या काळात प्रगतीच्या संधी
 भांडवलाचा प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रयत्न हवेत 
 ‘फिनटेक स्टार्टअप’ची संख्या झपाट्याने वाढेल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: startup has got a lot of comfort from the budget