दिलासा: आजपासून 'या' गोष्टी देशभरात स्वस्त

वृत्तसंस्था
गुरुवार, 1 ऑगस्ट 2019

सर्वसामान्य लोकांना आजपासून थोडा दिलासा मिळणार आहे. मोदी सरकारने घेतलेल्या काही निर्णयांची अंमलबजावणी आजपासून होणार आहे.

नवी दिल्ली: सर्वसामान्य लोकांना आजपासून थोडा दिलासा मिळणार आहे. मोदी सरकारने घेतलेल्या काही निर्णयांची अंमलबजावणी आजपासून होणार आहे. बँकिंग आणि ऑटो क्षेत्राकडून ग्राहकांना दिलासा मिळणार आहे. सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बॅंक ऑफ इंडियाने (एसबीआय) आरटीजीएस व एनईएफटी पाठोपाठ आता एमिजिएट पेमेंट सर्व्हिसच्या (आयएमपीएस -  IMPS) माध्यमातून होणाऱ्या व्यवहारांवरील शुल्कही हटविण्याचा निर्णय घेतला आहे. याची अंमलबजावणी देखील आजपासून होणार आहे. तसेच एसबीआयच्या नेट बँकिंग आणि मोबाईल अ‍ॅपचा वापर करणाऱ्यांनादेखील आता कोणतेही अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार नाही.

मोदी सरकारने पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी आता आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. वस्तू आणि सेवाकर (जीएसटी) समितीने इलेक्ट्रिक वाहनांवरील जीएसटीचा दर आता 12 टक्क्यांवरून कमी करून थेट 5 टक्क्यांवर आणला आहे. याचबरोबर ईव्ही चार्जर्सवरील जीएसटी 18 टक्क्यांवरून कमी करून 5 टक्के केला आहे. नवीन दर 1 ऑगस्ट 2019 पासून  म्हणजेच आजपासून लागू करण्यात आले आहेत. 

इलेक्ट्रिक कारवरील जीएसटी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक कार खरेदी करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळेल. साधारणतः 20 लाखांपर्यंतच्या गाड्यांची किंमत एक लाख रुपयांनी कमी होण्याची शक्यता आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: State Bank of India waives IMPS, NEFT and RTGS charges from today