esakal | शेअर मार्केट : तेजीच्या लाटेत कोणत्या शेअरचा विचार करावा?
sakal

बोलून बातमी शोधा

share market

शेअर मार्केट : तेजीच्या लाटेत कोणत्या शेअरचा विचार करावा?

sakal_logo
By
भूषण गोडबोले

गेल्या आठवड्यात ‘सेन्सेक्स’ ६०,०५९ अंशांवर, तर ‘निफ्टी’ १७,८९५ अंशांवर बंद झाला. अपेक्षेप्रमाणे गेल्या आठवड्यात रिझर्व्ह बँकेने व्याजदरात कोणताही बदल नसणारे पतधोरण जाहीर केले. मात्र, कोरोना महासाथीच्या धक्क्यातून अर्थव्यवस्था सावरत असल्याने आगामी दीड वर्षांच्या काळात अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी केलेले उपाय टप्प्याटप्प्याने मागे घेणार असल्याचे संकेतही दिले गेले आहेत.

गेल्या शुक्रवारी आयटी क्षेत्रातील दिग्गज टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) या कंपनीचे तिमाही निकाल जाहीर झाले. ‘टीसीएस’ने या निकालानुसार, विक्री; तसेच नफ्यात वृद्धी दर्शवत रु. ९६२४ कोटी नफा मिळविल्याची नोंद केली आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने भागधारकांसाठी प्रति शेअर सात रुपये अंतरिम लाभांश मंजूर केला आहे. येत्या आठवड्यात आयटी क्षेत्रातील विप्रो, इन्फोसिस, एचसीएल टेक या कंपन्यांचा; तसेच बँकिंग क्षेत्रातील एचडीएफसी बँक यांचे तिमाही निकाल जाहीर होतील, ज्याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष असणार आहे. ‘ॲम्फी’च्या ताज्या आकडेवारीनुसार, ३० सप्टेंबर २०२१ अखेर मासिक तत्वावर ‘एसआयपी’च्या माध्यमातून तब्बल १०,३५१ कोटी रुपयांची नव्याने गुंतवणूक झाली आहे. साठीचा आकडा पार केलेला ‘सेन्सेक्स’ आणि १८ हजारांच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या ‘निफ्टी’कडे पाहता आगामी काळात गुंतवणूक; तसेच ट्रेडिंगचा दृष्टीने कोणत्या कंपन्यांच्या शेअरचा विचार करावा, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणारे असेल.

‘सुप्रजीत इंजिनिअरिंग’कडे लक्ष

सुप्रजीत इंजिनिअरिंग लि. ही ऑटोमोटिव्ह केबल आणि हॅलोजन बल्ब उद्योगातील एक अग्रेसर कंपनी म्हणून उदयास आली आहे. भारतातील उत्पादनक्षमता आणि तांत्रिक वैशिष्ठ्यांमुळे ही कंपनी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय ग्राहकांना योग्य उत्पादन विकास आणि उत्पादन उपाय प्रदान करीत आहे. एकूण उलाढालीत लक्षणीय वाढ दर्शवत गेल्या शुक्रवारी या कंपनीच्या शेअरने रु. ३४९ ला बंद भाव दिला आहे. जोपर्यंत या कंपनीच्या शेअरचा भाव रु. २९८ या आधार पातळीच्या वर आहे, तोपर्यंत आलेखानुसार तेजीचा कल दर्शवत आहे. गुंतवणुकीच्या दृष्टीने विचार करता मध्यम अवधीमध्ये या कंपनीच्या शेअरचा भाव आणखी मोठ्या प्रमाणात वधारू शकतो. यामुळे सुप्रजीत इंजिनिअरिंगच्या शेअरकडे लक्ष ठेवणे योग्य ठरू शकेल.

मार्चपासून जुलै २०२१ पर्यंत ५३,००० ते ४७,००० या पातळ्यांच्या जवळ चढ-उतार केल्यानंतर पुढील दोन महिन्यांत तेजीची वाटचाल करीत ‘सेन्सेक्स’ने ६० हजार अंशांपर्यंत उडी मारली. जसा उडी मारून बाजार झपकन वर जाऊ शकतो, तसाच कधीही झपकन खालीदेखील येऊ शकतो. म्हणजेच कधीही ‘करेक्शन’ दर्शवू शकतो, याचे भान ठेऊन ‘ट्रेडिंग’ करताना आवश्यकतेनुसार ‘स्टॉपलॉस’; तसेच मर्यादित भांडवलावरच जोखीम स्वीकारणे योग्य ठरू शकेल.

तेजीचा कल दर्शविणारे शेअर

वाहननिर्मिती क्षेत्रातील टाटा मोटर्स, पॅकेजिंग क्षेत्रातील युफ्लेक्स लि., तसेच मद्यनिर्मिती आणि वितरण क्षेत्रातील युनायटेड स्पिरिट्स, जीएम ब्रेव्हरेज लि., असोसिएटेड अल्कोहोल अँड ब्रेव्हरेज लि. आदी अनेक कंपन्यांचे शेअर आलेखानुसार तेजीचा कल दर्शवत आहेत. असोसिएटेड अल्कोहोल अँड ब्रेव्हरेज या कंपनीच्या शेअरने पाच जुलैपासून मर्यादित पातळ्यांमध्येच चढ-उतार केल्यावर गेल्या आठवड्यात रु. ५४६ ला बंद भाव देऊन मध्यम अवधीच्या आलेखानुसार तेजीचे संकेत दिले आहेत. आलेखानुसार जोपर्यंत या कंपनीच्या शेअरचा भाव रु. ४१२ या आधार पातळीच्या वर आहे, तोपर्यंत चढ-उतार दर्शवत मध्यम अवधीमध्ये तो आणखी वधारू शकतो.

या लेखातील माहिती अभ्यासाच्या दृष्टिकोनातून दिली गेली आहे. यामुळे प्रत्यक्ष व्यवहार करताना जोखीम ओळखून वैयक्तिक गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

(लेखक ‘सेबी’ नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार आहेत)

loading image
go to top