भाजप खासदाराचा घरचा आहेर; 'एअर इंडिया विकणे म्हणजे देशद्रोह'

वृत्तसंस्था
Monday, 27 January 2020

सरकारने आजच (सोमवार) एअर इंडियाच्या निर्गुंतवणुकीची योजना जाहीर केली आहे. त्याअंतर्गत सरकार एअर इंडियाची संपूर्ण मालकी विकणार असून 17 मार्चपर्यंत अर्ज मागवले आहेत.

नवी दिल्ली : एअर इंडिया ही राष्ट्रीय संपत्ती असून कंपनीमधील सरकारची 100 टक्के मालकी विकणे म्हणजे देशद्रोह असल्याचे भारतीय जनता पक्षाचे राज्यसभा खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांनी म्हटले आहे. तसेच सरकारच्या या निर्णयाविरोधात न्यायालयात जाऊ असे देखील त्यांनी म्हटले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सरकारने आजच (सोमवार) एअर इंडियाच्या निर्गुंतवणुकीची योजना जाहीर केली आहे. त्याअंतर्गत सरकार एअर इंडियाची संपूर्ण मालकी विकणार असून 17 मार्चपर्यंत अर्ज मागवले आहेत. एअर इंडियाबरोबरच एअर इंडिया एक्स्प्रेस (Air India Express) आणि  AISATS मधील 50 टक्के मालकी सरकार विकणार आहे. सरकारच्या या निर्णयावर विरोधी पक्षाकडून देखील टीका केली जात आहे.

काँग्रेसचे जेष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी देखील सरकारवर टीका करत सरकार कफल्लक झाल्याने एअर इंडिया विक्रीस काढली असल्याचे म्हटले आहे. जीडीपी दर पाच टक्क्यांच्या खाली घसरला आहे. मनेरगासारख्या योजनांना आर्थिक बाळ देण्यासाठी सरकारकडे पैसे नसल्याने सरकार मौल्यवान वस्तू विकत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Subramanian Swamy threatens to drag Modi govt to court for Air India sale