सक्सेस स्टोरी : कलापूर्ण उद्योग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सक्सेस स्टोरी : कलापूर्ण उद्योग

सक्सेस स्टोरी : कलापूर्ण उद्योग

प्रत्येकामध्ये काहीनाकाही कला असते. अनेकांना आपल्या व्यग्र वेळापत्रकामुळे त्याच्यासाठी वेळ देता येत नाही, तर काहींना फक्त छंद म्हणून कलेत वेळ घालवायचा झाला तरी आपल्याला हवे असलेले कलेचे साहित्य कोठे मिळेल, असा प्रश्न असतो. त्याचबरोबर व्यावसायिक कलाकारही चांगल्या दर्जाच्या कला साहित्याच्या शोधात असतात. तसे पाहायला गेले तर भारतात बोटावर मोजण्याइतक्याच कंपन्या कला साहित्यांची निर्मिती करतात. पण खरी गरज होती, ती हे सर्व दर्जेदार साहित्य एकाच छताखाली आणण्याची!

गोपाळ पटवर्धन यांनी याची सुरवात पुण्यातील शनिवार पेठेतून १९८९ मध्ये केली. त्यावेळी परदेशी कंपन्यांचे साहित्य उपलब्ध करून देणे थोडे कठीण जात होते. या व्यवसायात पुढे जाऊन गोपाळ पटवर्धन यांचा मुलगा अनंत पटवर्धन आणि त्यांची सून अमिता पटवर्धन कार्यरत झाले आणि त्यांनी हा व्यवसाय वाढवायचा विचार केला. यावेळी विविध देशी; तसेच परदेशी कंपन्यांचे साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी ‘आर्टिस्ट कट्टा’ची स्थापना केली. 

अनंत यांनी यामार्फत चित्रकला, मूर्ती बनविणे, पॉटरी, म्यूरल्स, पेपर क्विलिंग, क्राफ्ट, स्कल्पचर अशा विविध कलांचे साहित्य सवलतींच्या दरात उपलब्ध करून द्यायला सुरवात केली. ते म्हणतात, ‘आपल्या इथे व्यावसायिक कलाकारांसोबतच छंद जोपासणारे कलाकारही मोठ्या प्रमाणात आहेत. पण त्यांची खरी अडचण असते, ती त्यांना हवे असलेले कला साहित्य कोठे मिळेल याची! हीच अडचण आम्ही ओळखली आणि दर्जेदार साहित्य एकाच छताखाली आणले. याचा खरा फायदा ‘लॉकडाउन’मध्ये अनेक लोकांना झाला. कारण ‘लॉकडाउन’च्या काळात लोकांकडे भरपूर वेळ होता. या काळात ते आपला छंद जोपासण्याचा प्रयत्न करीत होते. त्यावेळी आम्ही त्यांना सर्व कला साहित्य ऑनलाइन व्यासपीठावरून उपलब्ध करून दिले. यामुळे आम्हाला त्यांच्यापर्यंत पोचणे आणि त्यांनाही आमच्यापर्यंत पोचणे सोपे झाले.’ 

सध्या ‘आर्टिस्ट कट्ट्या’ची पुण्यात सहा दुकाने आहेत. याव्यतिरिक्त ऑनलाइन पद्धतीनेही ते कला साहित्याची विक्री करीत आहेत. कंपनीच्या ३० वर्षांच्या या प्रवासाचे, अनेक छंद जोपासणाऱ्या कलाकारांसोबतच ज्येष्ठ चित्रकार रवि परांजपे, अमोल पालेकर, मिलिंद मुळीक, अभिजीत धोंडफळे, ओम भूतकर, सौरभ कर्डे, भूषण प्रधान असे लोकप्रिय कलाकारही साक्षीदार आहेत. सध्या या कंपनीची उलाढाल दोन कोटी रुपयांची आहे.

Web Title: Success Story Amita And Anant Patwardhan

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..