
मद्रासमध्ये अश्विनी यांचे बी.एस्सी.चे शिक्षण घेत असताना, आयआयटी मद्रासमधून बी. टेक.चे शिक्षण घेत असणाऱ्या आनंद चंद्रसेकरन यांच्याशी मैत्री आणि नंतर मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले.
‘कोडिंग’चे कोणतेही तांत्रिक ज्ञान नसतानादेखील अशा एखाद्या कंपनीची आपल्याला स्थापना करता येऊ शकते, याचा विचारही कोणी करू शकत नाही. परंतु, हीच अशक्य गोष्ट शक्य करून दाखविली ती, स्वतः कलाकार असणाऱ्या अश्विनी असोकन यांनी!
‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’ या तांत्रिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या ‘मॅड स्ट्रीट डेन’ या कंपनीच्या त्या सह-संस्थापिका आहेत. त्या म्हणतात, ‘मी या सॉफ्टवेअर कोडिंग करणाऱ्या कंपनीची सह-संस्थापिका असली तरी, मी कोडिंगची एकही ओळ लिहीत नाही आणि मी हे सर्वांना आवर्जून सांगते; जेणेकरून इतर लोकही त्यांच्या साचेबद्ध कल्पनांमधून बाहेर पडतील.
अश्विनी या मूळच्या चेन्नईच्या आहेत. संगीत आणि शास्त्रीय नृत्यामध्ये प्रशिक्षण घेतल्यानंतर आपण एक कलाकार व्हावे, अशी त्यांची इच्छा होती. परंतु, वडिलांच्या आग्रहामुळे त्यांनी ‘इंटरॅक्शन डिझाईन’ क्षेत्रात पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्यानंतर ‘इंटेल’मध्ये मानववंशशास्त्रज्ञ डॉ. जेनेव्हाईव्ह बेल यांची टीम जॉईन करण्याची संधी अश्विनी यांना मिळाली. टीव्हीचे भविष्य आणि भविष्य़ात त्यामध्ये शक्य असलेले बदल घडविण्याच्या दृष्टीने अभ्यास करणे हा त्या टीमचा उद्देश होता. हा अनुभव अश्विनी यांना खूप काही शिकवून गेला. तिथेच त्यांना ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’ची गोडी लागली. तिथे अश्विनी यांना तंत्रज्ञान कसे एकत्र करावे, न्युरल नेटवर्क कसे काम करते, मशिन लर्निंग बाबत शिकायला मिळाले. ‘इंटेल’मध्ये १० वर्षे नोकरी केल्यानंतर त्या भारतात परतल्या.
सक्सेस स्टोरी : व्यवसायाच्या प्रगतीचा ‘चुंबक’
मद्रासमध्ये अश्विनी यांचे बी.एस्सी.चे शिक्षण घेत असताना, आयआयटी मद्रासमधून बी. टेक.चे शिक्षण घेत असणाऱ्या आनंद चंद्रसेकरन यांच्याशी मैत्री आणि नंतर मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. पाच वर्षे ‘रिलेशनशीप’मध्ये राहिल्यानंतर, त्यांनी २००५ मध्ये लग्न केले. अश्विनी म्हणतात, ‘नवरा न्युरोसायंटिस्ट असल्याने हे सर्व शक्य झाले. त्यावेळी आम्ही दिवस-रात्र ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’ या विषयावरच चर्चा करायचो.’
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
लग्नाच्या काही वर्षानंतर २०१३ मध्ये त्यांनी ‘मॅड स्ट्रीट डेन’ या कंपनीची सुरवात केली. आनंद हे टेक्नॉलॉजी पाहतात, तर अश्विनी या प्रॉडक्ट डिझाइन हा विभाग सांभाळतात. त्या म्हणतात, ‘मी या कंपनीचे ‘ह्रदय’ आहे, तर आनंद कंपनीचा ‘मेंदू’ आहे.’
लग्न, मूल झाल्यानंतर महिलावर्ग व्यवसाय किंवा त्यांचे करिअर करू शकत नाही, असे म्हटले जाते. परंतु, अश्विनी यांनी हे करून दाखविले. त्या म्हणतात, ‘मला महिला उद्योजक म्हणून अल्पसंख्याक राहायचे नाही, तर फक्त उद्योजक व्हायचे आहे. त्यासाठी इतर महिलांनीही व्यवसाय, करिअर करून त्यांचे स्थान निर्माण करायला हवे.’
सध्या त्यांच्या कंपनीची वार्षिक उलाढाल २.७ कोटी डॉलरहून अधिक आहे.