Success Story:आईस्क्रीम, बिस्कीट आणि मिसेस बेक्टर!

Success Story Rajini Becter is the co-founder of Mrs. Becter Food
Success Story Rajini Becter is the co-founder of Mrs. Becter Food

सरलेल्या वर्षी सर्वाधिक प्रतिसाद मिळालेला ‘आयपीओ’ म्हणजे, मिसेस बेक्टर्स फूड स्पेशालिटीज्! १९८ पट ‘सबस्क्राइब’ झाल्यानंतर त्या शेअरची ७४ टक्के प्रीमियमसह शेअर बाजारात नोंदणी झाली. म्हणजेच, मूळ किंमत रु. २८८ असणारा हा शेअर रु. ५०१ वर नोंदला गेला. त्यानंतर लगेचच याला ‘अप्पर सर्किट’ही लागले. अशी दमदार ‘एंट्री’ करीत सुपरहिट ठरलेल्या या कंपनीमागची प्रेरणा आणि त्यांची यशोगाथा वाचण्यासारखी आहे.  

मिसेस बेक्टर्स फूडच्या सहसंस्थापिका आहेत रजनी बेक्टर! रजनी बेक्टर यांचा प्रवास पाकिस्तानपासून सुरू झाला. त्यांचा जन्म अखंड हिंदुस्तान असताना, सध्याच्या पाकिस्तानात म्हणजेच अविभाजित कराची येथे झाला होता. त्यांनी आपले बालपण लाहोरमध्ये घालवले, तिथे त्यांचे वडील सरकारी कर्मचारी होते. परंतु, भारत-पाकिस्तान विभाजनादरम्यान त्या आपल्या कुटुंबासह दिल्लीला राहायला आल्या. 

वयाच्या १७व्या वर्षी रजनी यांचे लग्न लुधियानाच्या धरमवीर बेक्टर यांच्याशी झाले. लग्नानंतर त्यांनी अभ्यास पूर्ण केला. लग्नानंतर त्या पती आणि तीन मुलांची जबाबदारी सांभाळू लागल्या. रजनी यांना स्वयंपाकाची खूप आवड होती, म्हणून त्यांनी पंजाब कृषी विद्यापीठातील बेकिंग कोर्समध्ये भाग घेतला. या वेळी त्यांनी स्वतः बनविलेले आईस्क्रीम, केक आणि कुकीज खाण्यासाठी लोकांना आमंत्रित केले. त्यातील काहींनी रजनी यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यास सांगितले. लोकांच्या सल्ल्यानुसार ७०च्या दशकात रजनी यांनी आईस्क्रीम बनविण्यास सुरुवात केली. त्यानंतर १९७८ मध्ये २० हजार रुपयांची गुंतवणूक करून त्यांनी बिस्किटे, कुकीज आणि केक बनविण्यास सुरुवात केली. त्यांची मुले बोर्डिंग शाळेत गेली, तेव्हा त्यांनी लुधियानामध्ये ‘क्रीमिका’ या छोट्या खाद्य कंपनीची सुरुवात केली. आता मिसेस बेक्टर्सचा ‘क्रीमिका’ हा ‘नॉन-ग्लुकोज’ विभागात उत्तर भारतातील अग्रगण्य बिस्कीट ब्रँड बनला आहे. 

कुटुंबातील इतर सदस्य १९९० मध्ये कंपनीत सहभागी झाले, तेव्हा कंपनीच्या प्रगतीला वेग आला. त्या वेळी कंपनीचे नाव ‘क्रीमिका’ होते. १९९०च्या दशकाच्या मध्यावर या कंपनीला मोठा ‘ब्रेक’ मिळाला, जेव्हा ‘मॅक्डोनाल्ड’ने भारतात प्रवेश केला आणि साहित्य पुरविण्यासाठी या कंपनीबरोबर करार केला. १९९६ मध्ये या कंपनीने कॅडबरी आणि आयटीसी यांसारख्या मोठ्या कंपन्यांनाही पुरवठा सुरू केला. त्यासाठी कंपनीने फिल्लौर (पंजाब) कारखान्यात उत्पादने तयार केली. १९९९ मध्ये, ‘क्रीमिका’चे नाव बदलून ‘मिसेस बेक्टर्स फूड स्पेशालिटीज्’ असे ठेवले गेले. २००६ मध्ये प्रथमच त्यांनी १०० कोटी रुपयांच्या उलाढालीचा आकडा ओलांडला.

आज त्यांच्या कंपनीची बिस्किटे, ब्रेड आणि आईस्क्रीम ही ६० हून अधिक देशांमध्ये निर्यात केली जातात. आता कंपनीची वार्षिक उलाढाल एक हजार कोटी रुपयांवर गेली आहे. शून्यातून सुरू झालेला रजनी यांचा हा गोड प्रवास प्रेरणादायी यशोगाथा म्हणून समोर येतो. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com