esakal | सक्सेस स्टोरी : उघडले ‘मोबाईल वॉलेटचे’ द्वार!
sakal

बोलून बातमी शोधा

Upasana Taku  Bipin Preet Singh mobikwik

सध्या ‘मोबिक्विक’चे १२०० कोटींहून अधिक वापरकर्ते (युजर्स) असून, त्यांची संख्या २५०० कोटींच्या जवळपास नेण्याचे उपासना यांचे उद्दिष्ट आहे. त्यांची वार्षिक उलाढाल २३० कोटी रुपयांहून अधिक आहे.

सक्सेस स्टोरी : उघडले ‘मोबाईल वॉलेटचे’ द्वार!

sakal_logo
By
सुवर्णा येनपुरे-कामठे

देशाला २००९ मध्ये हळुहळू डिजिटल दुनियेची ओळख होत होती. बँका व्यवहारांचा लेखा-जोखा ठेवण्यासाठी पूर्णपणे संगणकाचा वापर करू लागल्या होत्या. परंतु, अनेकजण तेव्हाही आपल्या खात्याची नोंद ठेवण्यासाठी पासबुकाचा आधार घेत होते. त्या काळात ‘मोबाईल वॉलेट’च्या संकल्पनेवर काम केले ते उपासना ताकू यांनी! त्या ‘मोबिक्विक’ या कंपनीच्या सह-संस्थापक आहेत. ‘मोबिक्विक’ या ‘फिनटेक’ व्यासपीठाच्या माध्यमातून त्या नागरिकांना आर्थिक सेवा उपलब्ध करून देतात. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

उद्योजकतेच्या क्षेत्रात कौटुंबिक पार्श्वभूमी नसतानाही, त्या जोखीम घेण्यास कधीही घाबरल्या नाहीत. त्या मूळ काश्मीरच्या आहेत. त्यांचे वडील भौतिकशास्त्राचे प्राध्यापक असल्याने घरी शिक्षणाला खूप महत्त्व दिले जायचे. कधी पायलट, कधी डॉक्टर, कधी पत्रकार अशी विविध स्वप्ने पाहिल्यानंतर शेवटी त्यांनी इंजिनिअर बनण्याचे ठरवले. त्यांनी जालंधरमधील ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’मधून ‘इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग’ केले आणि पुढील शिक्षणासाठी त्या अमेरिकेला गेल्या. स्टॅनफोर्ड विद्यापीठातून ‘व्यवस्थापन विज्ञान व अभियांत्रिकी’ विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले.

त्या म्हणतात, ‘तेव्हा माझ्या बॅचमध्ये फक्त तीन मुली होत्या. शिक्षण झाल्यानंतर, मी सॅन दिएगो येथील ‘एचएसबीसी’मध्ये माझे करिअर सुरू केले. तिथे मी ‘लॉयल्टी प्रोग्रॅम’ व्यतिरिक्त विक्री, वित्त, जोखीम अशा विविध प्रकल्पांवर काम केले. नंतर ‘पे-पाल’मध्ये काम करायला सुरवात केली. तिथे बरेच काही शिकले. पण कामातील समाधान मिळत नसल्याने मी भारतात परतले.’

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

२००९ च्या सुरवातीस भारतात परतल्यानंतर, त्या व्यावसायिक कल्पनांवर विचार करू लागल्या. त्यावेळी उपासना, त्यांच्या एका मित्राच्या माध्यमातून बिपिनप्रीत सिंग यांना भेटल्या. पुढे तेच त्यांच्या कंपनीचे सह-संस्थापक बनले. तेव्हा बिपिन ‘स्टार्टअप’च्या शोधत होते. ‘पे-पाल’, ‘मोबाईल वॉलेट’ सारखे भारतात नवे काहीतरी आणण्याची उपासना यांची इच्छा होती. पण ते कसे करावे, याबद्दल त्यांच्याकडे स्पष्टता नव्हती. शेवटी बिपिन यांना त्यांच्या व्यवसायात साथ देण्याचे उपासना यांनी ठरविले. 

फेब्रुवारी २०१० मध्ये उपासना यांना त्यांच्या कल्पनेवर विश्‍वास वाटू लागला आणि त्यांनी बिपिन यांच्यासमवेत ‘मोबिक्विक’ची स्थापना केली. त्यावेळी ई-कॉमर्स क्षेत्राचा विकास होत होता, परंतु स्मार्टफोनची बाजारपेठ संपूर्णपणे विकसित झाली नव्हती. ‘पेमेंट गेटवे’च्या क्षेत्रातही कोणतीही विशेष प्रगती झाली नव्हती. तेव्हा लोकांना ‘मोबाईल वॉलेट’ची उपयुक्तता माहीत नव्हती. म्हणून उपासना यांनी प्रथम ‘मोबिक्विक’चा रिचार्ज प्लॅटफॉर्म सुरू केला, जो नंतर ‘मोबाईल वॉलेट’मध्ये रुपांतरीत झाला.

दोन खोल्यांमध्ये त्यांनी हा व्यवसाय सुरू केला, तेव्हा त्यांच्याकडे फक्त एक कर्मचारी होता. कर्मचाऱ्यांची संख्या पाचवर गेली, तेव्हा त्या स्वतः त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी जेवण बनवायच्या, जेणेकरून कर्मचाऱ्यांचे चांगले लक्ष लागू शकेल. बिपिन आणि उपासना यांनी पुढे लग्न केले. व्यवसाय उभारी घेत असल्याने, लग्नाच्या दिवशीही त्या दोघांना काम करावे लागले होते, आपले ‘पॅशन’ असल्याने त्यांनी त्याचादेखील स्वीकार केला. 

सध्या ‘मोबिक्विक’चे १२०० कोटींहून अधिक वापरकर्ते (युजर्स) असून, त्यांची संख्या २५०० कोटींच्या जवळपास नेण्याचे उपासना यांचे उद्दिष्ट आहे. त्यांची वार्षिक उलाढाल २३० कोटी रुपयांहून अधिक आहे.

loading image
go to top