esakal | करकायदा : ‘युलिप’वरील करआकारणी
sakal

बोलून बातमी शोधा

Tax Law

करकायदा : ‘युलिप’वरील करआकारणी

sakal_logo
By
सुधाकर कुलकर्णी

कर आकारणीच्या दृष्टीने म्युच्युअल फंड व युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन (युलिप) यांना समान पातळीवर आणण्याच्या उद्दिष्टाने ‘युलिप’मधील गुंतवणुकीवर प्राप्तिकर कलम १० (१०डी) नुसार मिळणारी सूट यांमध्ये बदल करण्यात आला आहे.

यंदाच्या वित्त विधेयकानुसार आता ‘युलिप’मधील गुंतवणुकीवर पुढीलप्रमाणे करआकारणी होणार आहे-

  • एक फेब्रुवारी २०२१ नंतर घेतलेल्या युलिप पॉलिसींचा वार्षिक हप्ता (प्रीमियम) जर रु. २,५०,००० किंवा त्याहून अधिक असेल तर यापुढे पॉलिसीची मुदत संपल्यावर कलम १० (१०डी) नुसार मिळणारी रक्कम पूर्वीप्रमाणे करमुक्त असणार नाही. त्या रकमेतील रु. एक लाखाच्या पुढील भांडवली लाभावर १० टक्के दराने लाँग टर्म कॅपिटल गेन आकारला जाईल.

  • जर एखाद्याने एकाहून अधिक ‘युलिप’ पॉलिसी घेतल्या व प्रत्येक पॉलिसीचा वार्षिक प्रीमियम रु. २,५०,००० पेक्षा जरी कमी असला; मात्र सर्व पॉलीसींचा एकत्रित प्रीमियम जर रु. २,५०,००० किंवा त्याहून अधिक असेल तर वरीलप्रमाणे करआकारणी केली जाईल.

  • जरी पॉलिसी नव्याने घेताना वार्षिक प्रीमियम रु. २,५०,००० पेक्षा कमी असेल आणि पुढे पॉलिसी टर्ममध्ये कोणत्याही वर्षी प्रीमियम रु. २,५०,००० पेक्षा जास्त झाला असेल, तरी सुद्धा कलम १०(१०डी) नुसार सूट मिळणार नाही.

  • ‘युलिप’ पॉलिसी घेताना आपण जर गुंतवणुकीसाठी डेट पर्याय निवडला असेल किंवा सुरवातीला इक्विटी व नंतर डेट असा पर्याय ठेवला असेल, तरी करआकारणीत बदल होणार नाही. पर्याय कोणताही असला तरी करआकारणी इक्विटी म्युच्युअल फंडाच्या लाँग टर्म कॅपिटल गेन आकारणीनुसारच होईल.

  • एक फेब्रुवारी २०२१ नंतर घेतलेल्या ‘युलिप’ पॉलिसींचा वार्षिक प्रीमियम जर रु. २,५०,००० किंवा त्याहून अधिक असेल तर यापुढे पॉलिसीची मुदत संपल्यावर मिळणाऱ्या रकमेवर ‘सिक्युरिटीज ट्रॅन्झॅक्शन टॅक्स’ (एसटीटी) ०.००१ टक्के दराने आकारला जाईल.

  • लाँग टर्म कॅपिटल गेन व ‘एसटीटी’ची आकारणी मुदतपूर्व ‘रिडम्प्शन’ किंवा ‘पार्शल विड्रॉवल’ यावर सुद्धा केली जाईल.

  • एक फेब्रुवारी २०२१ च्या आधीच्या पॉलिसींना असणारी सवलत रद्द होणार नाही.

  • असे असले तरी नव्याने घेतलेल्या (१/२/२०२१ पासून) पॉलिसींच्या वारसांना मिळणाऱ्या ‘डेथ क्लेम’वर लाँग टर्म कॅपिटल गेन व ‘एसटीटी’ आकारला जाणार नाही.

  • नव्याने घेण्यात येणाऱ्या ‘युलिप’ पॉलिसीचा वार्षिक प्रीमियम जर रु. २,५०,००० च्या आत असेल तर पूर्वीप्रमाणेच सर्व सवलती मिळत राहतील.

थोडक्यात असे म्हणता येईल, की म्युच्युअल फंड व मोठ्या प्रीमियमच्या ‘युलिप’ पॉलिसींची करआकारणी आता सारखीच झाली आहे.

(लेखक सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनर- सीएफपी आहेत.)

loading image
go to top