ईएलएसएस इंडेक्स फंडाचा नवा पर्याय

‘सेबी’ने आता सर्व म्युच्युअल फंडांना ‘इंडेक्स ईएलएसएस फंड’ बाजारात आणण्याची परवानगी नुकतीच दिली आहे. यामुळे ८० सीच्या अंतर्गत गुंतवणूक करण्यासाठी ‘इंडेक्स ईएलएसएस फंड’ हा सुद्धा एक नवा पर्याय उपलब्ध असणार आहे.
Sudhakar Kulkarni writes elss index fund new option Mutual fund share market sebi
Sudhakar Kulkarni writes elss index fund new option Mutual fund share market sebi esakal
Summary

‘सेबी’ने आता सर्व म्युच्युअल फंडांना ‘इंडेक्स ईएलएसएस फंड’ बाजारात आणण्याची परवानगी नुकतीच दिली आहे. यामुळे ८० सीच्या अंतर्गत गुंतवणूक करण्यासाठी ‘इंडेक्स ईएलएसएस फंड’ हा सुद्धा एक नवा पर्याय उपलब्ध असणार आहे.

प्राप्तिकर कायद्याच्या कलम ८० सीच्या अंतर्गत करपात्र उत्पन्नातून वजावट मिळविण्यासाठी पीपीएफ, एनएससी, एनपीएस, सुकन्या समृद्धी योजना, इन्श्युरन्स प्रीमियम याबरोबरच म्युच्युअल फंडाच्या इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीममध्ये (ईएलएसएस) गुंतवणूक करता येते. गेल्या ८-१० वर्षांत म्युच्युअल फंडाच्या ईएलएसएस स्कीममध्ये गुंतवणूक करण्याकडे लोकांचा कल वाढत चालल्याचे दिसून येते, कारण यातील गुंतवणुकीमुळे मिळणारा गेल्या पाच वर्षांतील सरासरी परतावा सुमारे २०-२१ टक्क्यांच्या आसपास असल्याचे दिसून येते व हा परतावा वरील अन्य पर्यायांच्या तुलनेत जवळजवळ तिप्पट आहे. पण यातील गुंतवणूक अन्य पर्यायांसारखी पूर्णपणे सुरक्षित नसते; शिवाय फंड मॅनेजमेंट चार्जेस २ टक्क्यांच्या जवळपास द्यावे लागतात. यावर पर्याय म्हणून ‘सेबी’ने आता सर्व म्युच्युअल फंडांना आता ‘इंडेक्स ईएलएसएस फंड’ बाजारात आणण्याची परवानगी नुकतीच दिली आहे. यामुळे ८० सी च्या अंतर्गत गुंतवणूक करण्यासाठी ‘इंडेक्स ईएलएसएस फंड’ हासुद्धा एक पर्याय असणार आहे.

टॉप २५० कंपन्यांत गुंतवणूक

प्रचलित ईएलएसएस फंड अॅक्टिव्हली मॅनेज्ड असतात व यातील गुंतवणूक लार्ज कॅप, मिड कॅप, तसेच स्मॉल कॅप कंपन्यांत केली जाते. या उलट ‘इंडेक्स ईएलएसएस फंडा’तील गुंतवणूक मार्केट कॅपिटलायझेशननुसार आघाडीच्या (टॉप) २५० कंपन्यांतच करावी लागणार असल्याने ही गुंतवणूक निफ्टी-५०, निफ्टी-१००, निफ्टी-२०० किंवा तत्सम इंडेक्समधेच केली जाईल व यासाठी अॅक्टिव्ह फंड मॅनेजमेंट करावी लागणार नाही, तर अन्य इंडेक्स फंडासारखी पॅसिव्ह फंड मॅनेजमेंट असेल. यामुळे प्रचलित ईएलएसएस फंडासारखे सुमारे १.७५ ते २.२५ टक्के इतके फंड मॅनेजमेंट चार्जेस न लागता सुमारे ०.२० टक्के इतकेच चार्जेस लागतील. तसेच होणारी गुंतवणूक टॉप २५० कंपन्यांत होणार असल्याने गुंतवणुकीतील जोखीम प्रचलित इंडेक्स फंडांच्या तुलनेने कमी असेल.

इंडेक्सच्या आसपास परतावा

थोडक्यात, ज्यांची मार्केट रिस्क घेण्याची तयारी आहे; शिवाय करसवलतीचाही फायदा घ्यायचा आहे, त्यांच्यासाठी हा एक उत्तम पर्याय असू शकेल. यातून मिळणारा परतावा हा जो इंडेक्स गुंतवणुकीसाठी निवडला असेल, त्या इंडेक्सच्या परताव्याच्या जवळपासच असेल. उदा. ईएलएसएस इंडेक्स निफ्टी-५० फंड असेल आणि जर निफ्टी-५० चा परतावा १३ टक्के असेल, तर या ईएलएसएस फंडाचा परतावा १३ टक्क्यांच्या जवळपासच असेल. एनएसई आणि बीएसई यांचे विविध इंडेक्स असल्याने म्युच्युअल फंड सुद्धा विविध ईएलएसएस इंडेक्स फंड बाजारत घेऊन येतील व गुंतवणूकदारास आपल्या पसंतीचा ईएलएसएस इंडेक्स फंड निवडता येईल. गेल्या १० वर्षांत निफ्टी-५० ने सरासरी १२.५ टक्के ते १३ टक्क्यांच्या दरम्यान परतावा दिला आहे व हा परतावा अन्य गुंतवणुकीतून मिळणाऱ्या परताव्याच्या तुलनेने निश्चितच चांगला आहे.

‘सेबी’च्या निर्देशानुसार म्युच्युअल फंड अॅक्टिव्ह ईएलएसएस (सध्याचे ईएलएसएस फंड) किंवा पॅसिव्ह ईएलएसएस इंडेक्स फंड या दोन्हींपैकी एकच पर्याय देऊ शकतील. मात्र, नजीकच्या भविष्यात एकाच वेळी दोन्ही पर्याय देण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com