‘कठीण समय येता, इमर्जन्सी फंड कामास येतो...’

‘कठीण समय येता, इमर्जन्सी फंड कामास येतो...’

कबीर उच्चशिक्षित आहे. तो एका नामांकित कंपनीमध्ये प्रमुख पदावर काम करतो. काही वर्षांपूर्वी कबीर मला भेटला होता. ‘आपत्कालीन निधीचे म्हणजेच इमर्जन्सी फंडाचे महत्त्व’ या विषयावर त्या वेळेस आम्ही सविस्तर चर्चा केली होती. हा निधी उपलब्ध असावा, हे त्यास तंतोतंत पटले होते. पण, अंमलबजावणी झाली नाही. ‘लॉकडाउन’च्या काळात मला अचानक कबीरचा फोन आला. तो अस्वस्थ व तणावात होता. त्याची मनःस्थिती बिघडली होती आणि त्यामागची तीन प्रमुख कारणे त्याने मला  सांगितली. 

लॉकडाउनमुळे त्याच्या कंपनीस तात्पुरते टाळे लागल्याने चार महिन्यांपासून त्याचा पगार थांबला होता. त्याची बचतही संपली होती. 
तोच घरातील एकमेव कमावणारी व्यक्ती म्हणून सर्व कुटुंबाची जबादारी त्याच्यावर होती. पगार नसल्याने दैनंदिन आयुष्याची घडीच विस्कटली होती.
घर व गाडीचे हप्ते, विविध प्रकारची बिले,  मुलांच्या शिक्षणाची फी, किराणामालाचा खर्च,
विमा हप्ते हे टाळता न येणारे खर्च रौद्र रूप धारण करून उभे होते. 

मित्रहो, असे असंख्य कबीर या कोविड-१९ महासाथीत अक्षरशः होरपळून निघाले आहेत. या परिस्थितीत उत्तम आर्थिक नियोजन नसेल, तर निधी उपलब्ध करणे कठीण असते. जे पर्याय समोर उभे राहतात, ते निश्चित नुकसानकारक असतात. 
कसे ते पाहा... 

पर्सनल लोन किंवा क्रेडिट कार्डमार्फत पैशांची उचल खूप महाग पडते. व्याजदर न परवडणारे, अवास्तव असतात. यातून फक्त कर्जाचा बोजा वाढतो.
भविष्यनिर्वाह निधी, मुलांच्या उच्च शिक्षणासाठी गुंतविलेले पैसे, निवृत्तीसाठी गुंतविलेली दीर्घकालीन रक्कम मोडल्यास भविष्यातील आर्थिक उद्दिष्टे डळमळीत होतात.
मित्र, आप्तेष्टांकडून उसने पैसे घेऊन मानहानी होतेच व परतफेडदेखील करावीच लागते. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

आपत्कालीन निधीचा आपण जर गांभीर्याने विचार केला, तर वर नमूद केलेले पर्याय टाळता येऊ शकतात. असा निधी प्रत्येकाकडे असणे अपरिहार्य असते किंवा आहे.

‘मला काय होणार? मी एकदम फिट आहे. जग काय उद्या बुडणार आहे का? आगे का आगे देखेंगे, अशी उत्तरे आपणास नेहमीच ऐकायला मिळतात. आत्ताचेच बघा. सुमारे वर्षभरापूर्वी सगळे सुरळीत होते आणि मग निसर्गाचा एक झटका बसला अन् जगाची अर्थव्यवस्थाच पूर्णपणे बिघडली. उत्पन्न घटले आणि भलेभले भुईसपाट झाले.

माझ्या मते, तीन प्रमुख प्रकारच्या आर्थिक आपत्कालीन परिस्थितींना सामोरे जाण्यासाठी आपण एखाद्या दक्ष सैन्याप्रमाणे सज्ज असायला हवे. 

गंभीर आजार वा अपघात अचानक दारावर धडक देतात. रुग्णालयात धाव घ्यावी लागते आणि मग रुग्णालयाचा खर्च सुरू होतो. या खर्चाची तरतूद म्हणून आरोग्य विमा घेतला असल्यास जवळपास ८० टक्के भरपाई होऊ शकते. कुटुंबाला आरोग्य विम्याने कवच असायलाच हवे. याचबरोबर आता ‘कोरोना कवच’ही घ्यावे लागेल. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

घरातील कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाला, तर कुटुंबीयांच्या आर्थिक गरजा कशा भागणार, याचा विचार करता ‘टर्म इन्शुरन्स’ घेणे योग्य ठरते. अशा व्यक्तींचे जीवनमूल्य दीड ते दोन कोटी रुपयांच्या घरात जात असेल, तर त्यांचे ‘टर्म इन्शुरन्स’ कमीत कमी त्या  पटीत असावे. 

आपत्कालीन निधी किती असावा, हा प्रश्न मनात येऊ शकतो. सर्वसाधारणपणे कुटुंबाचा पूर्ण मासिक खर्च + मासिक हप्ते गुणिले १२ महिने एवढा तरी तो असावा.

कोरोनाच्या संसर्गासारख्या स्थितीत उत्पन्न घटते किंवा दीर्घकालीन आजाराने काही महिने घरी विनापगारी राहावे लागले अथवा नोकरी गमवावी लागली, तर ‘आपत्कालीन निधी’चा आधार हवाच. 

आपत्कालीन निधीचा स्वयंव्यावसायिक व्यक्तींनी (उदा. डॉक्टर, वकील, लघुउद्योजक) दक्षतापूर्वक गांभीर्याने विचार करायला हवा.

आपत्कालीन निधी कोठे गुंतवावा?
ज्या वेळेस आपण आपत्कालीन निधीचा विचार कराल, तेव्हा दोनच गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. एक म्हणजे हा निधी सुरक्षित असणे आणि दुसरी तो अतिशय तरल (लिक्विड) असणे. मुद्दलाला धक्का न लागता कोणत्याही क्षणी पैसे काढणे सहजशक्य झाले पाहिजे. अशा गुंतवणुकीसाठी बँक एफडी, म्युच्युअल फंडामधील लिक्विड फंड, अल्ट्रा शॉर्ट टर्म फंड या पर्यायांचा विचार करता येईल.

(लेखक गुंतवणूक सल्लागार आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com