अलविदा २०२२! विजेते आहेत भारतीय गुंतवणूकदार!

श्रीलंका आणि पाकिस्तानमध्ये चलनवाढ झपाट्याने वाढून, त्या देशांची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडली.
Suhas Rajderkar writes about finance investment share market money management
Suhas Rajderkar writes about finance investment share market money managementsakal
Summary

श्रीलंका आणि पाकिस्तानमध्ये चलनवाढ झपाट्याने वाढून, त्या देशांची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडली.

सरलेल्या २०२२ या वर्षाच्या सुरुवातीला, ५८,३१० अंशांनी सुरू झालेल्या शेअर बाजाराने (बीएसई सेन्सेक्स), वर्षाच्या शेवटी ४.३ टक्के परतावा दिला असला तरीही, सुरुवातीच्या सहा महिन्यांतच तब्बल ७,३०० अंशांनी डुबकी मारून, १७ जून रोजी त्याने ५१,००० या नीचांकी पातळीला स्पर्श केला होता.

या घसरणीला महत्त्वाची कारणे ठरली ती अर्थातच, रशिया-युक्रेन युद्ध, कोविड, कच्च्या तेलाचे वाढलेले भाव, गगनाला भिडणारी चलनवाढ आणि ती आटोक्यात आणण्यासाठी विविध देशांच्या मध्यवर्ती बँकांनी, जसे की ‘फेड’, ‘आरबीआय’ यांनी वाढविलेले व्याजदर. खरेतर, आठ एप्रिलच्या पतधोरणामध्ये ‘आरबीआय’ने व्याजदर ‘न’ वाढविण्याचा निर्णय घेतला होता;

परंतु आपल्या शेजारील श्रीलंका आणि पाकिस्तानमध्ये चलनवाढ झपाट्याने वाढून, त्या देशांची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडली. एप्रिल महिन्यात श्रीलंकेमध्ये चलनवाढीचा दर २१.५ टक्के इतका वर गेला.

त्यामुळे ‘आरबीआय’ने चार मे रोजी व्याजदर अचानक ४० आधारभूत अंकांनी वाढविले. संपूर्ण २०२२ मध्ये ‘आरबीआय’ने व्याजदर, २.२५ टक्क्यांनी वाढवून, चार टक्क्यांवरून ते ६.२५ टक्क्यांपर्यंत नेले.

जागतिक परिस्थिती गंभीर

गेल्या वर्षात जागतिक पातळीवर परिस्थिती खूप बिघडलेली दिसली. रशियाने युरोपला तेल आणि गॅस पुरवठा बंद करून तेथील अर्थव्यवस्था वेठीस धरली. ज्यामुळे चलनवाढ मोठ्या प्रमाणात वाढली.

अमेरिकेतसुद्धा चलनवाढीचा दर नऊ टक्के पार करून गेला व अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हने, संपूर्ण वर्षात व्याजदर तब्बल २.५० टक्क्यांनी वाढविले. १९९४ नंतरची ही सर्वांत मोठी वाढ होती.

अमेरिकेचा विकास दर पहिल्या दोन तिमाहीमध्ये उणे राहिला; परंतु तिसऱ्या तिमाहीमध्ये तो सकारात्मक आल्याने तांत्रिकदृष्ट्या मंदी टळली. सिटी बँकेने त्यांचा भारतातील बहुतांश व्यवसाय ॲक्सिस बँकेला विकला.

आयटी क्षेत्रातील कंपन्या मोठ्या प्रमाणात अडचणीत आल्या. फेसबुकची मूळ कंपनी ‘मेटा’ने ११,००० कर्मचाऱ्यांना कमी केले. ज्यामुळे इतर बलाढ्य आयटी कंपन्यांनीसुद्धा मोठ्या प्रमाणात कर्मचारीकपात केली.

चीनमध्ये ‘शून्य कोविड’ धोरणामुळे आर्थिक व्यवस्था अडचणीत आली. ती रुळावर आणण्यासाठी धोरण शिथिल केले, तर कोविड रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली. या सर्वांचा परिणाम म्हणून, अमेरिका, युरोप, चीनसह इतर अन्य देशांचे शेअर बाजार घसरले.

२०२२ मध्ये काही मोठ्या क्रिप्टो एक्स्चेंजेसचे दिवाळे वाजल्यामुळे ‘क्रिप्टो’मधील गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले. बिटकॉईनचा भाव एका वर्षांमध्ये तब्बल ६० टक्क्यांनी गडगडला.

एका डॉलरमागे रुपया ७४ वरून ८२ वर घसरला आणि विकसनशील देशांमधील ही सर्वांत मोठी घसरण होती. जेंव्हा इतर मालमत्ता विभाग धोक्यात येतात तेव्हा सोन्याने १२ टक्के परतावा देऊन, ते विम्यासारखे कामाला येते, हे सिद्ध केले.

देशातील गुंतवणूकदारांचा पाठिंबा

जगातील बहुतेक देशांचे शेअर बाजार गडगडत असताना आपल्या शेअर बाजाराने, मात्र ‘रेकॉर्ड ब्रेक’ उच्चांकी पातळी गाठली. (सेन्सेक्स १ डिसेंबर, ६३,५८३) परकी गुंतवणूकदार आपल्या बाजारातील शेअर विकत असताना देशातील गुंतवणूकदारांनी,

मात्र त्यांची खरेदी भक्कमपणे सुरूच ठेवली. २०२२ या वर्षामध्ये परकी गुंतवणूकदारांनी तब्बल २,७५,००० कोटी रुपयांची विक्री केली, तर स्वदेशी गुंतवणूकदारांनी तितकीच म्हणजे साधारणपणे २,७३,००० कोटी रुपयांची खरेदी करून बाजाराला मोठया पडझडीपासून वाचविले. म्युच्युअल फंडांनी साधारणपणे १,८०,००० कोटी रुपये शेअर बाजारात ओतले.

त्यामुळेच, मला असे वाटते, की २०२२ चे विजेते आहेत, स्वदेशी गुंतवणूकदार, ज्यामुळे वर्षाच्या अखेरीस, आयटी, फार्मा विभाग सोडले, तर बहुतेक विभागांनी गुंतवणूकदारांना मालामाल केले. बँक ‘निफ्टी’ने भरघोस २१.५ टक्के परतावा दिला. यामध्ये ‘निफ्टी’वरील पीएसयू बँकांनी तब्बल ७० टक्के परतावा दिला. मेटल, एफएमसीजी, ऑटो या विभागांनी अनुक्रमे २२, १८ आणि १६ टक्के परतावा दिला.

‘एसआयपी’ची कमाल

म्युच्युअल फंडांकडे महिन्याला फक्त ‘एसआयपी’ द्वारे १३,००० कोटी रुपयांच्या वर गुंतवणूक आली असून, १० कोटींच्या वर गुंतवणूकदार म्युच्युअल फंडांद्वारे गुंतवणूक करीत आहेत. एक फेब्रुवारी २०२२ रोजी सादर झालेला अर्थसंकल्प गुंतवणूकदारांच्या हिताचा असल्याने बाजाराने ८०० अंशांची उसळी मारून त्याचे स्वागत केले.

प्रथमच आयटी सेवा निर्यात उत्पन्न हे आपल्या तेलाच्या आयातीच्या मोबदल्यापेक्षा जास्त झाले. भारताने ज्या प्रकारे सर्व राष्ट्रांशी सलोख्याचे संबंध कायम ठेवून त्यांच्याकडून आपला तेल पुरवठा नुसताच सुरू ठेवला नाही, तर त्यात रशियाकडून घसघशीत सवलतसुद्धा मिळविली. त्यामुळे आपली चालू खात्यातील तूट वाढली असली, तरीही हाताबाहेर गेली नाही.

ब्रिटनला मागे टाकत भारताची अर्थव्यवस्था जगातील पाचवी बलाढ्य अर्थव्यवस्था बनली. ‘चीन प्लस-वन’ प्रमाणेच ‘युरोप प्लस-वन’ चा भारताला फायदाच झाला. प्राप्तिकर संकलन, टोल संकलन, जीएसटी भरणा यामध्ये विक्रमी वाढ पहायला मिळाली. मे महिन्याचे जीएसटी संकलन, तब्बल १.६८ लाख कोटी रुपये इतके झाले.

गुगलने आपल्या ‘भारती एअरटेल’ मध्ये एक अब्ज डॉलरची गुंतवणूक केली. ब्लॅकरॉक आणि मुबादला यांनी टाटा पॉवरमध्ये चार हजार कोटी रुपये गुंतविले. रिलायन्सने ‘डन्झो’ या छोट्या स्टार्टअपमध्ये २४ कोटी डॉलर गुंतविले. एचडीएफसी लि. आणि एचडीएफसी बँक यांचे एकत्रीकरण झाले, तर पीव्हीआर आणि आयनॉक्ससुद्धा एकत्र आले.

आयटी क्षेत्रातील शेअरना मार बसला, तरीही बँकिंग तसेच संरक्षण क्षेत्रातील शेअरमध्ये तेजी दिसली; परंतु २०२१ मधील घवघवीत यशानंतर, या वर्षी, ‘एलआयसी’ सोडला, तर फार मोठे ‘आयपीओ’ आले नाहीत. मे महिन्यामध्ये गाजावाजा करून आलेल्या ‘एलआयसी’च्या आयपीओने गुंतवणूकदारांची निराशाच केली.

त्याचप्रमाणे नवीन युगातील शेअरनी, जसे की, पेटीएम, झोमॅटो, नायका यांनीसुद्धा गुंतवणूकदारांना निराश केले. दुसरीकडे वर्षाच्या सुरुवातीलाच ‘एअर इंडिया’ तब्बल ६९ वर्षांनी परत टाटा समूहाकडे आली. त्यासाटी टाटा समूहाने २.४० अब्ज डॉलरची गुंतवणूक केली, यामुळे एअर इंडियातील सुधारणांनी ‘टेक-ऑफ’ घेतला.

अन्य आर्थिक घडामोडी

‘ईझ ऑफ डुईंग बिझनेस’ मानांकन सहा पातळ्या वर येऊन ३७ झाले. २५ फेब्रुवारी २०२२ पासून, ‘टी+१’ सेटलमेंट या प्रक्रियेचा श्रीगणेशा झाला. जुलै महिन्यामध्ये भारतामधील पहिल्या आंतरराष्ट्रीय बुलियन अर्थात सोने-चांदी बाजाराची सुरुवात झाली.

‘एनएसई-आयएफएससी’, अर्थात नॅशनल स्टॉक एक्सचेंज-इंटरनॅशनल फायनान्स सर्व्हिस सेंटर, एक्सचेंजद्वारे आता तुम्ही घरबसल्या अमेरिकेतील शेअरसुद्धा खरेदी करू शकता. त्याचप्रमाणे सोने खरेदीसाठी ‘बीएसई’चा ‘ईजीआर’ हा एक नवा पर्याय आपल्याला उपलब्ध झाला. ‘सेबी’ने ‘एनएसई’ला ‘सोशल स्टॉक एक्स्चेंज’ स्थापन करण्याची परवानगी दिली.

‘आयपीओ’मध्ये ‘यूपीआय’द्वारे भरणा करण्याची मर्यादा रू. दोन लाखांवरून पाच लाखांवर नेली. ‘आरबीआय’ने बाजारातील नोटांचे प्रमाण कमी करण्यासाठी; तसेच डिजिटल ऑनलाइन व्यवहार वाढविण्यासाठी नुकतेच ‘डिजिटल रुपी’ किंवा ‘ई-रुपया’ बाजारात आणला. रुपयाचे मूल्य टिकून राहावे आणि आयात सुलभ व्हावी याकरिता आयात व्यवहार भारतीय रुपयांमध्ये करण्याच्या पद्धतीला मान्यता मिळाली.

भारत गौरव योजनेअंतर्गत भारतातील ‘कोईमतूर ते शिर्डी’ अशी पहिली ‘खासगी’ रेल्वेगाडी सुरू झाली. ऑक्टोबरमध्ये भारताने मोबाईल फोनच्या निर्यातीचा एक अब्ज डॉलरचा निर्यातीचा महत्त्वाचा टप्पा पार केला. म्युच्युअल फंडाने ४० लाख कोटी मालमत्तेचा टप्पा पार केला. नोव्हेंबरमध्ये देशांतर्गत हवाई प्रवास करणाऱ्यांचा एक दिवसीय आकडा प्रथमच चार लाख प्रवाशांचा टप्पा पार करून गेला.

अपेक्षा नववर्षाकडून

सध्या साधारण सात टक्क्यांनी वाढणारी आपली अर्थव्यवस्था २०२३ मध्ये जगातील सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था ठरेल असे वाटते. लोकसंख्येमध्ये आपण चीनला मागे टाकण्याची शक्यता आहे. बहुतेक कंपन्यांचे निकाल चांगले असतील, स्वदेशी गुंतवणूकदारांचा पाठिंबा चांगला राहील. वर्ष २०२४-२५ हे निवडणुकांचे वर्ष असल्याने, एक फेब्रुवारी २०२३ रोजी सादर होणारा अर्थसंकल्प विकासाभिमुख राहील.

रेल्वे, तसेच संरक्षण क्षेत्रात मोठी गुंतवणूक व सुधारणा दिसून येईल. कच्च्या तेलाचे भाव कमी झाले आणि जागतिक युद्धजन्य परिस्थिती निवळली, तर २०२३ या वर्षात शेअर बाजाराने सध्याच्या पातळीपासून साधारणपणे १० टक्के परतावा द्यायला हरकत नाही.

त्याचप्रमाणे, ज्यांची जोखीम घेण्याची तयारी नाही अशा गुंतवणूकदारांना, खास करून ज्येष्ठ नागरिकांना, सरकारने, अल्पबचत योजनांचे जानेवारी ते मार्च २०२३ साठीचे व्याजदर वाढवून, त्यांचेसुद्धा नवे वर्ष चांगले जाईल, याची जणू नांदीच केली आहे.

सर्वांत जास्त परतावा दिलेले पहिले पाच शेअर

शेअरचे नाव परतावा (टक्के)

क्रिसेन्डा सोल्युशन्स - ३१०

उगार शुगर -२४०

एनडीटीव्ही -२१०

अदानी पॉवर -२०३

माझगाव डॉक -१९१

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com