'एनएव्ही': गेले ते दिन गेले...

सुहास राजदेरकर
Monday, 21 September 2020

‘सेबी’ने म्युच्युअल फंडांचे ‘निव्वळ मालमत्ता मूल्य’ (एनएव्ही) मिळण्याच्या दिवसाबाबतचे नियम नुकतेच बदलले आहेत. काय आहेत हे बदल आणि त्याचे महत्त्व थोडक्‍यात पाहूया. 

१. इक्किटी योजना
तुमची गुंतवणूक दोन लाख रुपयांपर्यंतच असेल, तर तुम्हाला ज्या दिवशी तुम्ही अर्ज देता; त्याच दिवसाची ‘एनएव्ही’ मिळत होती. परंतु, ‘सेबी’च्या नव्या नियमाप्रमाणे ज्या दिवशी म्युच्युअल फंडाच्या बॅंक खात्यामध्ये हे पैसे जमा होतील, त्या दिवसाची ‘एनएव्ही’ मिळेल. हा नियम एक जानेवारी २०२१ पासून अमलात येईल. समजा, तुम्ही अर्ज २२ तारखेला दिला; परंतु तुमचे पैसे म्युच्युअल फंड योजनेच्या खात्यामध्ये २४ तारखेला जमा झाले, तर नव्या नियमानुसार तुम्हाला २४ तारखेची ‘एनएव्ही’ मिळेल. समजा, २३ तारखेला बाजार खूप वर गेला आणि योजनेची ‘एनएव्ही’ खूप वाढली, तर तुम्हाला कमी युनिट मिळून तुमचे नुकसान होऊ शकते. याउलट, बाजार खाली गेला, तर अर्थातच युनिट जास्त मिळून तुमचा फायदा होईल. दोन लाख रुपयांच्या वर गुंतवणूक असेल, तर ज्या दिवशी म्युच्युअल फंडाच्या बॅंक खात्यामध्ये हे पैसे दिसतील, त्या दिवसाची ‘एनएव्ही’ मिळेल. थोडक्‍यात, यासाठी आधी होता तोच नियम कायम राहील. गुंतवणुकीसाठी ‘कट ऑफ’ वेळ दुपारी एक वाजताची राहणार आहे. अर्थात, तुमचे पैसे म्युच्युअल फंडाच्या बॅंक खात्यामध्ये दुपारी एकपूर्वी जमा झाले पाहिजेत. बाजार खूप अस्थिर असतो आणि क्षणाक्षणाला बदलत असतो. उदाहरणार्थ, तुम्ही एखाद्या म्युच्युअल फंडाच्या इक्विटी योजनेमध्ये दोन लाख रुपये गुंतविले. अर्ज २२ तारखेस दिला आणि तुमचे पैसे जमा झाले २४ तारखेला. समजा, २२ तारखेची ‘एनएव्ही’ रु. ४०० असेल, तर त्याप्रमाणे तुम्हाला ५०० युनिट मिळतील. पण, २३ आणि २४ तारखेला बाजार खूप वर गेला आणि २४ तारखेची ‘एनएव्ही’ रु. ४२५ झाली असेल, तर नव्या नियमानुसार तुम्हाला फक्त ४७०.५८८ युनिट मिळतील.

देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

२ लिक्विड योजना
या योजनांतील गुंतवणुकीसाठी ‘कट ऑफ’ वेळ दुपारी १२.३० राहणार असून, ज्या दिवशी म्युच्युअल फंडाच्या बॅंक खात्यामध्ये पैसे आलेले दिसतील; त्याच्या आधीच्या दिवसाची ‘एनएव्ही’ मिळणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

3. डेट योजना
या योजनांतील गुंतवणुकीसाठी ‘कट ऑफ’ वेळ दुपारी एक वाजताची राहणार असून, ज्या दिवशी म्युच्युअल फंडाच्या बॅंक खात्यामध्ये पैसे आलेले दिसतील; त्याच दिवसाची ‘एनएव्ही’ मिळणार आहे.

तुम्हाला वरील कोणत्याही योजनेमधून पैसे काढायचे असतील, तर ‘कट ऑफ’ वेळ दुपारी एकची राहणार आहे, हे लक्षात घ्यायला हवे.

जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

(लेखक म्युच्युअल फंड क्षेत्रातील जाणकार आहेत.)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: suhas rajderkar writes article about Net asset value