स्मार्ट गुंतवणूक : ‘म्युच्युअल फंड सही है’ आणि ‘सही’ राहणार... | Mutual Funds smart investment | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mutual Funds smart investment
स्मार्ट गुंतवणूक : ‘म्युच्युअल फंड सही है’ आणि ‘सही’ राहणार...

स्मार्ट गुंतवणूक : ‘म्युच्युअल फंड सही है’ आणि ‘सही’ राहणार...

सरलेल्या २०२१ या एका वर्षात, म्युच्युअल फंडांच्या सोने वगळता बाकी सर्व म्हणजे लिक्विड, डेट, इक्विटी अशा सर्व विभागातील योजनांनी सकारात्मक परतावा दिला. बहुतेक इक्विटी योजनांचा परतावा २० टक्क्यांच्या वर होता. ९०५ इक्विटी योजनांपैकी ४६१ योजनांनी आपापल्या ‘बेंचमार्क’पेक्षा जास्त परतावा दिला. स्मॉलकॅप योजनांनी सर्वांत जास्त परतावा दिला, जो सरासरी ६० टक्क्यांच्या वर आहे.

म्युच्युअल फंड उद्योगातील एकूण मालमत्ता २०२१ मध्ये सलग नवव्या वर्षी वाढली. २०२१ मध्ये ४५ म्युच्युअल फंड कंपन्यांच्या एकूण मालमत्तेमध्ये तब्बल २४ टक्के वाढ होऊन त्याने ३८.५० लाख कोटी रुपयांचा उच्चांक गाठला. इक्विटी योजनांमधील निव्वळ गुंतवणूक, जी २०२० मध्ये फक्त ९४०० कोटी रुपये होती, ती २०२१ मध्ये अनेक पटींनी वाढून तब्बल ७१,६०० कोटी रुपये झाली. ‘एनएव्ही’ अर्थात मालमत्तामूल्यांमधील वाढ आणि निव्वळ गुंतवणूक मिळून २०२१ मध्ये एकूण मालमत्ता २०२० पेक्षा सात लाख कोटी रुपयांनी वाढली. यामध्ये १०० च्या वर आलेल्या ‘न्यू फंड ऑफर’ (एनएफओ) योजनांचा महत्त्वाचा वाटा होता. आयसीआयसीआय फ्लेक्सिकॅप फंड आणि एसबीआय बॅलन्स्ड ॲडव्हांटेज फंडांनी अनुक्रमे १०,००० आणि १३,००० कोटी रुपये, असे विक्रमी पैसे जमा केले.

२०२० या वर्षात ७२ लाख गुंतवणूकदार वाढले होते. परंतु, २०२१ मध्ये ते तब्बल २.६५ कोटींनी वाढले. सोने; तसेच रिअल इस्टेट यांनी दिलेला उणे (नकारात्मक) परतावा, तसेच बॅंकांतील मुदत ठेवींचे खूप कमी झालेले व्याजदर यामुळे गुंतवणूकदारांचा ओढा इक्विटी म्युच्युअल फंडांकडे जास्त दिसून आला.

‘सेबी’चे उल्लेखनीय प्रयत्न

२०२१ या वर्षी, ‘सेबी’ने काही महत्त्वाची पावले उचलली, ज्यामुळे म्युच्युअल फंड उद्योग अधिक पारदर्शक झाला. डेट योजनांमधील जोखीम कमी करण्यासाठी एक महत्त्वाचा नियम लागू केला, तो म्हणजे ‘पोटेन्शिअल रिस्क क्लास मॅट्रिक्स’ (पीआरसी मॅट्रिक्स). या नियमानुसार, प्रत्येक डेट योजनेमध्ये फंड व्यवस्थापकाला ‘पीआरसी मॅट्रिक्स’ (त्यांनी घेतलेली जोखीम) द्यावे लागतील आणि त्याचे उल्लंघन करता येणार नाही. दुसऱ्या नियमाप्रमाणे, एक जुलैपासून, सर्व म्युच्युअल फंड मॅनेजर आणि महत्त्वाच्या सभासदांचे २० टक्के वेतन त्यांना थेट न देता, ते सांभाळत असलेल्या योजनांमध्ये गुंतवले जाईल. त्याला तीन वर्षांचा ‘लॉक इन पिरियड’ असेल. ‘सेबी’ने सोन्याप्रमाणेच चांदीसाठी ‘एक्स्चेंज ट्रेडेड फंडा’चा (सिल्व्हर ईटीएफ) मार्ग मोकळा केला असून, आता लवकरच काही म्युच्युअल फंडांचे ‘सिल्व्हर ईटीएफ’ बाजारात येतील. सर्व म्युच्युअल फंडांना, प्रत्येक योजनेमध्ये ‘एन्व्हायरन्मेंट, सोशल आणि गव्हर्नन्स (ईएसजी) नियमांचे पालन करावे लागेल. या वर्षात काही नव्या संकल्पना असलेल्या योजना बाजारात आल्या. त्यात ‘कोटक निफ्टी अल्फा ५० ईटीएफ’ यासारख्या योजनांचा समावेश होता.

नव्या गुंतवणूकपद्धती लोकप्रिय

म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीच्या नव्या पद्धती लोकप्रिय होताना दिसत आहेत. त्यात ‘फ्लेक्सि एसटीपी’ आणि ‘फ्रीडम एसडब्ल्यूपी’ आधीचा समावेश आहे. ‘एसआयपी’ ही संकल्पना तर आता घराघरात रुजली आहे. ‘एसआयपी’चे जवळजवळ पाच कोटी खातेदार झाले असून, नोव्हेंबर या एकाच महिन्यात ‘एसआयपी’द्वारे तब्बल ११,००० कोटी रुपयांचा टप्पा पार केला गेला होता. वर्षाला एक लाख कोटी रुपयांच्या वर पैसे फक्त ‘एसआयपी’द्वारे म्युच्युअल फंड आणि त्यामुळे शेअर बाजारात गुंतविले जात आहेत.

देशी आणि परदेशी कंपन्या

म्युच्युअल फंड उद्योगातील स्वदेशी अशा सुंदरम म्युच्युअल फंडाने परदेशी प्रिन्सिपल म्युच्युअल फंड विकत घेतला, तर दुसऱ्या बाजूला परदेशी कंपनी ‘एचएसबीसी’ने स्वदेशी एल अँड टी म्युच्युअल फंड ताब्यात घेतला.

आता पुढे काय?

म्युच्युअल फंड उद्योग अधिकाधिक प्रगत आणि पारदर्शक होत आहे. म्युच्युअल फंड म्हणजे एक वेगळा ‘ॲसेट क्लास’ नाही. आज असा एकही ‘ॲसेट क्लास’ नाही, की ज्यामध्ये म्युच्युअल फंडांची योजना नाही. लवकरच ‘क्रिप्टोकरन्सी’साठी सुद्धा योजना येऊ शकतात. म्युच्युअल फंड इक्विटी योजनांनी मागील वर्षात जो परतावा दिला, तो नववर्षात सुद्धा मिळेल, ही अपेक्षा चुकीची ठरू शकते. परंतु, ज्यांची पाच वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक थांबण्याची तयारी आहे, त्यांनी गुंतवणूकतज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार म्युच्युअल फंडाच्या इक्विटी योजनांमध्ये गुंतवणूक करणे योग्य राहील.

(लेखक म्युच्युअल फंड क्षेत्रातील ज्येष्ठ सल्लागार आहेत.)

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Mutual Fund
loading image
go to top