एअर इंडियाच्या मदतीला टाटा समूह 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 नोव्हेंबर 2019

हजारो कोटीं कर्जाचा बोजा आणि तोट्यात असलेली सरकारच्या मालकीच्या "एअर इंडिया"ला तारण्यासाठी टाटा समूहाकडून पुढाकार घेण्याची चर्चा सध्या रंगताना दिसत आहे.

मुंबई : हजारो कोटीं कर्जाचा बोजा आणि तोट्यात असलेली सरकारच्या मालकीच्या "एअर इंडिया"ला तारण्यासाठी टाटा समूहाकडून पुढाकार घेण्याची चर्चा सध्या रंगताना दिसत आहे. "एअर इंडिया"च्या लिलावात भाग घेण्याचे संकेत टाटा समूहाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी दिले आहेत. एका मुलाखतीत चंद्रशेखरन यांनी "एअर इंडिया"बाबत विचारलेल्या प्रश्‍नावर केलेल्या विधानाने या तर्कविर्तकांना उधाण आले आहे. 

सध्या टाटा समूह हवाई क्षेत्रात दोन कंपन्यांसोबत भागिदारीमध्ये आहे. "सिंगापूर एअरलाईन्स"सोबतच्या संयुक्त उद्यममधून "विस्तारा एअरलाईन्स"ची देशभरात सेवा पुरविण्याचे काम टाटा समूह करत आहे. तसेच एअर एशियासोबतसुद्धा टाटा समूह भागिदारीमध्ये आहे. मात्र या दोन्ही कंपन्यांना चालू वर्षात जवळपास 1 हजार 500 कोटींचा तोटा झाला आहे. सध्या दोन विमान कंपन्यांमध्ये टाटा समूह भागिदार असून तिसऱ्या कंपनीसाठी तूर्त तयार नाही, मात्र विलीनीकरण हाच एकमेव पर्याय असू शकतो, असे चंद्रशेखरन यांनी म्हटले आहे. सद्यस्थितीत एअर इंडियाबाबत हो किंवा नाही सांगता येणार नाही, मात्र पुढे काय होईल, हे देखील माहिती नाही, असे चंद्रशेखरन यांनी सांगून एअर इंडियाबाबतची उत्सुकता आणखी वाढवली आहे. दरम्यान, भक्कम गुंतवणूकदाराअभावी गेल्या वर्षभरापासून एअर इंडियाची हिस्सा विक्री रखडली आहे. सध्या केंद्र सरकार एअर इंडियातील 76 टक्के हिस्सा विक्री करून कंपनीचे खासगीकरण करणार आहे. 

विमान सेवेत संधी आणि जोखीम 

हवाई क्षेत्रातील तीव्र स्पर्धेने विमान कंपन्यांचे आर्थिक गणित बिघडवले आहे. वर्षाच्या सुरूवातीला जेट एअरवेज ही आघाडीची कंपनी दिवाळखोरीत गेली. यामुळे जवळपास 22 हजार कर्मचारी बेरोजगार झाले. हवाई क्षेत्रात संधीसोबत जोखीमसुद्धा असल्याने टाटा समूहाला "एअर इंडिया"साठी सारासार विचार करून निर्णय घ्यावा लागेल, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे. 
 
जे.आर.डी टाटांचे योगदान 

भारतात विमान सेवेची मुहुर्तमेढ रोवणारे टाटा समूहाचे संस्थापक जे.आर.डी टाटा हे देशातील पहिले परवानाधारक वैमानिक होते. त्यांच्या नेतृत्वात "टाटा सन्स"ने 1932 मध्ये टाटा एअरलाईन्सची सुरूवात केली. जे.आर.डी यांनी कराची ते मुंबई हे विमानाचे सारथ्य केले. पुढे 1953 मध्ये टाटा एअरलाईन्स चे राष्ट्रीयीकरण केले आणि ती केंद्र सरकारच्या मालकीची एअर इंडिया बनली. 

web title : Tata Group to help Air India


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tata Group to help Air India