esakal | टाटांच्या 'ताज महाल'ला मंदावलेल्या अर्थव्यवस्थेचे ग्रहण !
sakal

बोलून बातमी शोधा

टाटांच्या 'ताज महाल'ला मंदावलेल्या अर्थव्यवस्थेचे ग्रहण !

मंदावलेल्या अर्थव्यवस्थेमुळे टाटांचे ताज हॉटेल करणार मालमत्तेची विक्री 

टाटांच्या 'ताज महाल'ला मंदावलेल्या अर्थव्यवस्थेचे ग्रहण !

sakal_logo
By
वृत्तसंस्था

मुंबई: टाटा समूहातील महत्त्वाची कंपनी असलेल्या इंडियन हॉटेल्स लि. ही कंपनी आपल्या मालत्तांची विक्री करणार आहे. इंडियन हॉटेल्स ही जगप्रसिद्ध ताज हॉटेलची साखळी चालवते. देशातील मंदावलेल्या अर्थव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर ही आलिशान हॉटेलची साखळी आपल्या काही मालमत्ता विक्रीसाठी काढणार आहे. त्याचबरोबर नव्या मालमत्ता विकत घेण्याचेही कंपनीकडून टाळण्यात येणार आहे. कंपनीच्या खर्चात कपात करण्यासाठी आणि कर्ज कमी करण्यासाठी कंपनीने हे धोरण स्वीकारले आहे.

देशातील मुख्यत: बिगर मेट्रो शहरांमधील काही हॉटेल विकण्याचे किंवा भाडेत्त्वावर देण्याचा कंपनीचा प्लॅन आहे. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पुनीत छतवाल यांनी एक मुलाखतीत यासंदर्भातील माहिती दिली आहे. आम्ही आमचे लक्ष मॅनेजमेंट कंत्राटांकडे वळवले असून नव्याने स्वत:च्या मालकीची हॉटेल घेणे आम्ही टाळत आहोत, असे ते म्हणाले. भारताची अर्थव्यवस्था सध्या मंदावली असून मागील पाच वर्षांतील ही सर्वात मोठी मंदी आहे. एनबीएफसी क्षेत्रातील आर्थिक अरिष्ट, ऑटोमोबाईल क्षेत्रातील मंदी, एव्हिएशन क्षेत्रातील मंदी यासारख्या घटकांचा परिणाम कंपनीच्या हॉटेल व्यवसायावर झाला आहे. त्यामुळेच कंपनीने कर्जात घट करण्याचे ठरवत नवी खरेदी टाळण्याचा निर्णय घेतला आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवरसुद्धा अनेक अर्थव्यवस्थांमध्ये मंदी दिसून येते आहे. ताज हॉटेल्सची न्यूयॉर्क, लंडन यासारख्या जगातील महत्त्वाच्या शहरांमध्ये हॉटेल आहेत. कंपनी कर्ज कमी करण्यासाठी टाटा समूहाच्या संचालकांनी विकत घेतलेल्या अपार्टमेंटचीसुद्धा विक्री करते आहे. काही वर्षांआधी कंपनीवर एकूण 31 अब्ज रुपयांचे कर्ज होते. मात्र कंपनीने कर्ज कमी करण्याचे धोरण अवलंबल्यापासून त्यात घट होऊन ते मार्चअखेर 20 अब्ज रुपयांवर आले आहे. 2022 पर्यत इंडियन हॉटेल्स आपल्या मालकीच्या मालमत्ता कमी करून 50 टक्क्यांपर्यत आणणार आहे. सध्या कंपनीकडून चालवल्या जात असलेल्या हॉटेलपैकी 70 टक्के मालमत्ता ताज हॉटेलच्याच मालकीची आहे. इंडियन हॉटेल्सची सध्या 151 हॉटेल आहेत.

loading image