बाप रे! टाटा मोटर्स ठेवणार पुण्यात तीन दिवस उत्पादन बंद !

वृत्तसंस्था
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

भारतातील सर्वात मोठी व्यावसायिक वाहन उत्पादक आणि आघाडीची ऑटोमोबाईल कंपनी असलेल्या टाटा मोटर्सने तीन दिवस उत्पादन बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे

मुंबई:भारतातील सर्वात मोठी व्यावसायिक वाहन उत्पादक आणि आघाडीची ऑटोमोबाईल कंपनी असलेल्या टाटा मोटर्स लि.ने तीन दिवस उत्पादन बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आजपासून (8 ऑगस्ट ते 10 ऑगस्ट)  पुढील तीन दिवस पिंपरी (पुणे) आणि जमशेदपूर येथील आपल्या उत्पादन प्रकल्पांमधील उत्पादन बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. एका इंग्रजी संकेतस्थळावर यासंदर्भातील माहीती समोर आली आहे. टाटांची आलिशान कार उत्पादक कंपनी जॅग्वार लॅंड रोवरनेही (जेएलआर) टाटा मोटर्सचाच कित्ता गिरवत तीन दिवस उत्पादन बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या ऑटोमोबाईल क्षेत्रात असलेल्या मोठ्या मंदीचा फटका सर्वच वाहन उत्पादक कंपन्यांना बसला आहे. त्यामुळेच अनेक कंपन्या उत्पादन घटवण्यावर भर देत आहेत. 

मागणी घटल्यामुळे टाटा मोटर्सकडे सध्या उत्पादन केलेल्या वाहनांची संख्या मागणीपेक्षा जास्त ठरते आहे. त्यामुळेच ही दरी भरून काढण्यासाठी कंपनी दोन्ही उत्पादन प्रकल्प बंद ठेवणार आहे. मात्र या उत्पादन प्रकल्पांमधील इलेक्ट्रॉनिक्स विभाग आणि इंजिनियरिंग संशोधन विभागाचे कामकाज या कालावधीत सुरूच राहणार आहे. मंदीच्या वातावरणात मागणी आणि उत्पादन यांचा ताळमेळ साधताना कंपनीला कसरत करावी लागते आहे. टाटा मोटर्सच्या पुण्यातील प्रकल्पात प्रवासी आणि व्यावसायिक वाहनांचे उत्पादन केले जाते. सध्या ऑटोमोबाईल क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगार गळती सुरू आहे. यातील बहुतांश कामगार हे कंत्राटी स्वरुपाचे आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tata Motors halts production at Pune