'एक लाखाची गाडी' असलेल्या 'नॅनो'ची विक्री शून्यावर! 

पीटीआय
शुक्रवार, 8 फेब्रुवारी 2019

2020 च्या एप्रिलपर्यंत 'नॅनो'चे उत्पादन पूर्णपणे थांबविण्याचे संकेत कंपनीने यापूर्वीच दिले होते. भारतातील पर्यावरण मानकांच्या निकषांची पूर्तता करण्यासाठी 'नॅनो' प्रकल्पामध्ये आणखी गुंतवणूक करणार नसल्याचेही कंपनीने सांगितले होते.

नवी दिल्ली : 'एक लाखाची गाडी' म्हणून जोरदार जाहिरात झालेली 'टाटा समूहा'ची 'नॅनो' ही गाडी आता अखेर 'भूतकाळ' होण्याच्या मार्गावर निघाली आहे. यंदाच्या जानेवारीमध्ये एकही नवी 'नॅनो' गाडी तयार झालेली नाही किंवा एकाही नव्या गाडीची विक्रीही झालेली नाही. 

विशेष म्हणजे, 2020 च्या एप्रिलपर्यंत 'नॅनो'चे उत्पादन पूर्णपणे थांबविण्याचे संकेत कंपनीने यापूर्वीच दिले होते. भारतातील पर्यावरण मानकांच्या निकषांची पूर्तता करण्यासाठी 'नॅनो' प्रकल्पामध्ये आणखी गुंतवणूक करणार नसल्याचेही कंपनीने सांगितले होते, त्याचवेळी या गाडीच्या भवितव्याविषयीचे चित्र स्पष्ट झाले होते. 

2018 च्या जानेवारीमध्ये एकूण 83 'नॅनो' गाड्यांचे उत्पादन झाली होती. पण यंदाच्या जानेवारीमध्ये एकही गाडी तयार झालेली नाही, असे कंपनीने स्पष्ट केले आहे. गेल्या वर्षी जानेवारीत 62 गाड्यांची विक्री झाली होती आणि यंदाच्या जानेवारीत काहीही विक्री झालेली नाही. 'एका महिन्याच्या उत्पादनाच्या आकड्यांवरून गाडीच्या भवितव्याविषयी अंदाज बांधणे योग्य नाही. यासंदर्भात कोणताही निर्णय अद्याप झालेला नाही', असे कंपनीच्या प्रवक्‍त्याने म्हटले आहे. 

2008 च्या जानेवारीमध्ये 'नॅनो'चे प्रथम दर्शन झाले होते. 'एक लाखाची गाडी' असे त्याचे वर्णन आणि मार्केटिंग करण्यात आले होते. 2009 च्या मार्चमध्ये ही गाडी बाजारात आली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tata Motors Sells Zero Units of Nano in January 2019