esakal | 'इंजिनिअर्स'ला टीसीएसचा आधार; तब्बल 30,000 जणांची भरती!
sakal

बोलून बातमी शोधा

'इंजिनिअर्स'ला टीसीएसचा आधार; तब्बल 30,000 जणांची भरती!

'इंजिनिअर्स'ला टीसीएसचा आधार; तब्बल 30,000 जणांची भरती!

sakal_logo
By
वृत्तसंस्था

मुंबई: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने (टीसीएस) 30,000 पदवीधरांना नियुक्ती पत्र जारी केले आहेत. त्यातील 12,356 कर्मचाऱ्यांची नियुक्ती एप्रिल ते जून दरम्यानच झाली आहे. मागील पाच वर्षांतील टीसीएसमधील ही सर्वात मोठी भरती आहे. उर्वरित कर्मचारी चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत (जुलै ते सप्टेंबर) रुजू होण्याची शक्यता आहे. 30 जून 2019 अखेर टीसीएसमधील एकूण कर्मचाऱ्यांची संख्या 4 लाख 36 हजार 641 इतकी आहो. त्यातील महिला कर्मचाऱ्यांचे प्रमाण 36.1 टक्के इतके आहे. कंपनीने 3 लाख 15 हजार कर्मचाऱ्यांना डिजिटल टेक्नॉलॉजीस आणि 3 लाख 61 हजार कर्मचाऱ्यांना गतिमान पद्धतींचे प्रशिक्षण दिले आहे. टीसीएसमधील कर्मचाऱ्यांनी नोकरी सोडण्याचे (अॅट्रीशन रेट) प्रमाण 11.5 टक्के आहे. हे प्रमाण जितके कमी तितके त्या कंपनीचे व्यवस्थापन आणि कार्यसंस्कृती चांगली असे समजले जाते. 

चालू आर्थिक वर्षाच्या सरलेल्या पहिल्या तिमाहीसाठीचे टीसीएसचे निकाल कालच जाहीर झाले आहेत. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसला (टीसीएस) तब्बल 8,131 कोटी रुपये नफा झाला आहे. जूनअखेर सरलेल्या पहिल्या तिमाहीत कंपनीला घवघवीत नफा मिळाला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत झालेल्या नफ्याच्या तुलनेत 10.8 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीला 7,340 कोटी रुपयांचा नफा झाला होता. टीसीएसने विश्लेषकांचे अंदाज चुकवत दमदार कामगिरी करून दाखवली आहे. टीसीएसच्या महसूलातसुद्धा चांगलीच वाढ झाली आहे. कंपनीचा महसूल 38,172 कोटी रुपयांवर पोचला आहे. महसूलातील वाढ 11.4 टक्के इतकी आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने समभागधारकांसाठी 5 रुपये प्रति शेअरचा अंतरिम डिव्हिडंड जाहीर केला आहे.

loading image