भाडेकरूंवर ‘कर’भार नाहीच; ‘जीएसटी’ बाबत केंद्राचे स्पष्टीकरण

‘जीएसटी’ (वस्तू व सेवाकर) नोंदणीकृत व्यावसायिकाने आपले घर कुणा व्यक्तीला वैयक्तिक वापरासाठी भाड्याने दिल्यास भाडेकरूला त्यावर ‘जीएसटी’ भरावा लागणार नाही
Tenants non taxed Clarification of Center regarding GST maharashtra mumbai
Tenants non taxed Clarification of Center regarding GST maharashtra mumbaisakal

मुंबई : ‘जीएसटी’ (वस्तू व सेवाकर) नोंदणीकृत व्यावसायिकाने आपले घर कुणा व्यक्तीला वैयक्तिक वापरासाठी भाड्याने दिल्यास भाडेकरूला त्यावर ‘जीएसटी’ भरावा लागणार नाही,’ असे स्पष्टीकरण आज केंद्र सरकारकडून देण्यात आले. केंद्र सरकारने यासंदर्भात मागील महिन्यात नवे नियम लागू करून व्यावसायिकांना जीएसटी भरणे अनिवार्य केले होते, त्यानंतर गोंधळ निर्माण झाल्यामुळे आज केंद्र सरकारने हा खुलासा केला आहे. काँग्रेस नेत्यांनी आज याच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर निशाणा साधत ‘हीच खरी काळी जादू’ असल्याचा टोला लगावला होता. ‘एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला वैयक्तिक वापरासाठी घर भाड्याने दिल्यावर त्यालाही जीएसटी भरावा लागेल,’ असे वृत्त काही प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर केंद्र सरकारकडून उपरोक्त खुलासा करण्यात आला. फक्त व्यावसायिक किंवा व्यापारी संस्थांना कोणी आपले घर भाड्याने दिले तरच त्या भाडेकरूंना जीएसटी भरावा लागेल, असे केंद्र सरकारने आज ट्विटमध्ये म्हटले आहे.

तेव्हा बँकांना जीएसटी नाही

जीएसटी आकारणी ही घराच्या वापरावर ठरते. व्यापारी भाडेकरूसाठी जीएसटी आकारणी आधीपासूनच होती. निवासी घर असले आणि भाडेकरू जीएसटी नोंदणीकृत असला तरीही जीएसटी लागेल. एखादी बँक आपल्या कर्मचाऱ्यांसाठी घर भाड्याने घेताना बँकांच्या नावे मालकाशी भाडेकरार करत असेल तर बँकांना जीएसटी भरणे गरजेचे आहे. मात्र हल्ली बँका आपल्या कर्मचाऱ्याच्या नावे मालकाशी भाडेकरार करतात व कर्मचाऱ्याला पगारात ‘एचआरए’ किंवा भाडेपरतावा देतात. तेव्हा बँकांना जीएसटी लागणार नाही, असे सनदी लेखापाल (सीए) चिराग राऊत यांनी ‘सकाळ’ ला सांगितले.

महागाई दर ६.७१ टक्क्यांवर

अन्नपदार्थांच्या किमतीत घट झाल्यामुळे, देशातील किरकोळ महागाईचा दर जुलैमध्ये ६.७१ टक्‍क्‍यांपर्यंत खाली आला आहे. जूनमध्ये महागाई दर ७.०१ टक्क्यांवर होता, सरकारने आज ही आकडेवारी जाहीर केली. सरकारी आकडेवारीनुसार, जुलै २०२२ मध्ये अन्नधान्य महागाई जूनमधील ७.७५ टक्क्यांवरून ६.७५ टक्क्यांवर आली.जुलै २०२१ मध्ये महागाई दर ५.५९ टक्के होता. भाजीपाल्याच्या महागाईचा दर १०.९ टक्के झाला आहे. डाळी, कडधान्ये यांच्या दरात ०.१८ टक्के घट झाली आहे.

ग्राहक किंमत निर्देशांक आधारित किरकोळ महागाई दर रिझर्व्ह बँकेच्या सहा टक्क्यांच्या अपेक्षित पातळीपेक्षा वरच राहिला आहे. गेल्या सात महिन्यांपासून तो सहा टक्क्यांच्या वर राहिला आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यांत किरकोळ महागाई दर सात टक्क्यांच्या वरच राहिला आहे. जागतिक अस्थिर वातावरणामुळे पुरवठा साखळीवर दबाव कायम असल्याने जागतिक पातळीवर महागाई वाढत आहे. त्याचा परिणाम देशांतर्गत महागाईवरही होत आहे.

परकी गंगाजळीमध्ये घट

देशातील परकी चलनसाठा पाच ऑगस्ट रोजी संपलेल्या आठवड्यात ८९.७ कोटी डॉलरनी घसरून ५७२.९७८ अब्ज डॉलरवर आला आहे, अशी माहिती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिली.२९ जुलै रोजी संपलेल्या आठवड्यात, परकी गंगाजळी २.३१५ अब्ज डॉलरने वाढून ५७३.८७५ अब्ज डॉलर झाला होता. पाच ऑगस्ट रोजी संपलेल्या आठवड्यात सोन्याचा साठा ६७.१ कोटी डॉलरनी वाढून ४०.३१३ अब्ज डॉलर झाला आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीतील साठा ४६ दशलक्ष डॉलरनी वाढून १८.०३१ अब्ज डॉलर झाला आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीतील देशाची राखीव स्थिती तीन दशलक्ष डॉलरनी घसरून ४.९८७ अब्ज डॉलर झाली आहे.

निर्यात ३६.२७ अब्ज डॉलरवर

जुलै महिन्यात देशातून होणाऱ्या निर्यातीत २.१४ टक्के वाढ होऊन ती ३६.२७ अब्ज डॉलर झाली आहे, तर या महिन्यात व्यापार तूट जवळपास तिप्पट होऊन ती ३० अब्ज डॉलरवर पोहोचली आहे, असे सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार स्पष्ट झाले आहे. जुलै २०२१च्या तुलनेत या महिन्यात आयात ४३.६१ टक्क्यांनी वाढून ६६.२७ अब्ज डॉलर झाली आहे. जुलै २०२१ मध्ये व्यापार तूट १०.६३ अब्ज डॉलर होती.या महिन्याच्या सुरुवातीला जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, जुलै २०२१ मध्ये ३५.५१ अब्ज डॉलरच्या तुलनेत जुलैमध्ये ३५.२४ अब्ज डॉलरची निर्यात झाली आहे असून त्यात ०.७६ टक्के घसरण आहे. कच्च्या तेलाच्या आयातीत ७० टक्क्यांहून अधिक वाढी झाल्यामुळे या महिन्यात व्यापार तूट विक्रमी ३१ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे.

औद्योगिक उत्पादन वाढले

देशातील औद्योगिक उत्पादन जून २०२२ मध्ये १२.३ टक्क्यांनी वाढल्याचे आज जाहीर झालेल्या अधिकृत आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या औद्योगिक उत्पादन निर्देशांक माहितीनुसार, जून २०२२ मध्ये उत्पादन क्षेत्राचे उत्पादन १२.५ टक्क्यांनी वाढले. खाण उत्पादन ७.५ टक्क्यांनी तर वीज निर्मिती १६.४ टक्क्यांनी वाढली आहे. जून- २०२१ मध्ये औद्योगिक उत्पादन निर्देशांक १३.८ टक्क्यांनी वाढला होता. एप्रिल-जून २०२२ या कालावधीत निर्देशांक १२.७ टक्क्यांनी वाढला, जो एका वर्षापूर्वी याच कालावधीत ४४.४ टक्क्यांनी वाढला होता.

..तर जीएसटी द्यावा

व्यावसायिक फर्मने आपले घर नोकरदार व्यक्तीला वैयक्तिक वापरासाठी दिले तर त्याच्यावर जीएसटी लागू होणार नाही, असेही म्हटले आहे. मात्र जीएसटी नोंदणीकृत संस्था किंवा व्यक्ती यांनी भाड्याने घेतलेल्या घरातून ते व्यापार व व्यवसाय चालवीत असतील तर मालकाला दिलेल्या भाड्यावर त्यांनी १८ टक्के जीएसटी भरला पाहिजे, त्याचा परतावा त्यांना नंतर मिळू शकतो.

सारासार विचार न करताच केंद्र सरकारने रोजच्या वापरातील खाद्यपदार्थांवर वस्तू आणि सेवा कर (जीएसटी ) लागू केला होता आता त्यानंतर ही ‘खरी काळी जादू’ आहे.

- जयराम रमेश, काँग्रेसचे सरचिटणीस

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com