‘टेस्ला’ भारतात लवकरच येतेय. जाणून घ्‍या तिचा इतिहास..

तुषार सोनवणे
शुक्रवार, 2 ऑगस्ट 2019

२१व्या शतकात जागतिक पर्यावरणाच्या समस्येवर चर्चा होत असताना, प्रदूषणमुक्तीचा नवा पर्याय टेस्ला मोटारच्या माध्यमातून उपलब्ध झाला आहे.

जागतिक पातळीवर नावीन्यपूर्ण संशोधन करणाऱ्या व्यक्तींमध्ये अमेरिकेच्या इलोन मस्क या उद्योजकाचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. ‘टेस्ला’ इलेक्‍ट्रिक मोटारच्या माध्यमातून त्यांनी ऑटोमोबाईल क्षेत्रात नवा इतिहास लिहिला आहे. २१व्या शतकात जागतिक पर्यावरणाच्या समस्येवर चर्चा होत असताना, प्रदूषणमुक्तीचा नवा पर्याय टेस्ला मोटारच्या माध्यमातून उपलब्ध झाला आहे.

जगात ग्लोबल वॉर्मिंगच्या मुद्द्यावर जागतिक परिषदा सुरू असतात. जगातील जास्त कार्बन उत्सर्जन करणाऱ्या देशांवर ते कमी करण्यासाठी नियम आखून दिले जातात; परंतु प्रदूषण कमी होताना दिसत नाही. त्यामुळे पेट्रोल-डिझेलवर चालणाऱ्या वाहनांना पर्याय निर्माण करणेदेखील आवश्‍यक बनले आहे. हेच टेस्ला कंपनीच्या इलोन मस्क यांनी हेरले आणि टेस्लाने इलेक्‍ट्रिकवर चालणाऱ्या कारच्या निर्मितीवर संशोधन सुरू केले. टेस्ला कंपनीची स्थापना २००० ते २००३ दरम्यान झाली. इलोन मस्क यांच्या मतानुसार त्यांना अशा गोष्टी बनवायला आवडतात, ज्याची कल्पना सामान्य माणूस करू शकणार नाही. त्यामुळे त्यांनी इलेक्‍ट्रिक कारच्या क्षेत्रात पाऊल ठेवले.

‘टेस्ला’ कंपनीच्या कारच्या बॅटरी त्यांनी बनवलेल्या असतात. या इलेक्‍ट्रिक कारमुळे हवा आणि आवाजाचे प्रदूषण होत नाही. टेस्ला मोटारच्या मॉडेल एस, मॉडेल एक्‍स या कारला ग्राहकांनी पसंती दिली. परंतु इलेक्‍ट्रिक कार असल्यामुळे या कार सर्वसामान्यांच्या आवाक्‍याबाहेर होत्या. आजही या कारची किंमत जास्तच आहे. या कारच्या उच्च गुणवत्ता आणि अनेक गोष्टी स्वयंचलित असल्यामुळे किंमत जास्त असल्याचे सांगितले जाते. 
टेस्लाच्या कारचे पिकअप पेट्रोल आणि डिझेलच्या कारपेक्षा कमी नाही. या कारला पूर्ण चार्ज होण्यास ८ ते ९ तास लागतात. कार पूर्ण चार्ज झाल्यानंतर साधारण ५०० किलोमीटरपर्यंत प्रवास करू शकता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आपल्या २०१५च्या अमेरिका दौऱ्यात टेस्ला कंपनीच्या मुख्यालयाला भेट दिली होती. टेस्ला कंपनीने कारनंतर आता इलेक्‍ट्रिक ट्रक निर्मितीचे काम सुरू केले आहे. जगातील अनेक कंपन्या आता इलेक्‍ट्रिक कारच्या प्रयोगावर काम करीत असताना, टेस्ला कंपनीने उडणाऱ्या कारचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहे. कंपनीने आपल्या कारचे चार्जिंग पॉईंट अमेरिकेत अनेक ठिकाणी सुरू केले आहेत. याशिवाय कंपनीचे कारनिर्मिती कारखाने कॅनडा आणि युरोपातदेखील सुरू करण्यात आले आहेत. कंपनीत सध्या ३० ते ४० हजार कर्मचारी कार्यरत आहेत.

टेस्ला कंपनीनंतर भारतातही आता काही नामांकित कंपन्यांनी इलेक्‍ट्रिक कार बाजारात आणल्या आहेत. यामुळे ऑटोमोबाईल क्षेत्रातील तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार २०३० पर्यंत भारतात इलेक्‍ट्रिक वाहने आपला दबदबा निर्माण करतील.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 'Tesla' is coming to India soon. Know its history ..