श्रीमंत होत रिटायर होण्यासाठी लक्षात घ्या 'या' टिप्स

Retired-Person
Retired-Person

आर्थिक स्थैर्य असावे, पैशांची चिंता नसावी ही इच्छा प्रत्येक माणसाचीच असते. काम करत असताना तर हे वाटत असतेच पण निवृत्तीनंतर या बाबींची आवश्यकता अधिक भासत असते. कारण निवृत्तीनंतर आपले काम थांबलेले असते आणि त्यामुळे उत्पन्न मर्यादित असते किंवा नव्याने उत्पन्न निर्माण करता येत नाही. त्यामुळेच निवृत्तीनंतर आर्थिक अडचणी येऊ नयेत हीच प्रत्येकाची इच्छा असते.

आयुष्यभर संघर्ष आणि मेहनत केल्यानंतर निवृत्तीनंतरचे आपले आयुष्य आरामदायी असावे, आर्थिक चिंता नसावी ही इच्छा प्रत्येक माणसाच्या मनात घर करून असते. परंतु हे घडण्यासाठी फक्त मेहनत उपयोगी नसते, तर त्यासाठी आर्थिक नियोजन अत्यंत महत्त्वाचे असते. आर्थिक नियोजन ही काही प्रचंड गोष्ट नाही. प्रत्येक सर्वसामान्य माणसाच्या आवाक्यातीलच हा विषय आहे. गरज असते ती योग्य ते पाऊल उचलण्याची. निवृत्तीनंतरच्या आयुष्याच्या गरजा लक्षात घेऊन केलेल्या आर्थिक नियोजनामुळे निवृत्तीनंतर आपल्याला आर्थिक स्थैर्य असलेले, स्वावलंबी आणि चिंतामुक्त जीवन जगता येते. 

यासाठी आवश्यक असणारे मुद्दे आणि टिप्स लक्षात घेऊया,
१. निवृत्तीनंतरच्या गरजांसाठी आज करा बचत

दरमहिन्याला होणाऱ्या खर्चाची तोंडमिळवणी करताना, महिन्याचे बजेट आखताना पुढील आयुष्यातील आर्थिक उद्दिष्टे आणि निवृत्तीनंतरच्या गरजा लक्षात घेतल्या जात नाहीत. त्याविषयीचे नियोजन केले जात नाही. भविष्यातील आर्थिक गरजांसाठी तरतूद करताना केवळ मुलांचे शिक्षण, त्यांची लग्ने, पर्यटन, इतर कौटुंबिक गरजा यांचाच विचार केला जातो. मात्र निवृत्तीनंतरच्या आर्थिक गरजा लक्षात घेतल्या जात नाहीत. त्यासाठी बचत आणि तरतूद केली जात नाही. मात्र निवृत्तीनंतरच्या आर्थिक गरजांचे नियोजन करण्यासाठी तरुणपणातच त्यासाठी बचत करणे आवश्यक आहे. कारण आपल्या नोकरीच्या किंवा कृतीशील असण्याच्या मोठ्या कालावधीत केलेली नियमित बचतच निवृत्तीनंतरचे आर्थिक स्थैर्य निर्माण करू शकते. ही बचत जितकी जास्त करता येईल तितकी चांगली. साधारणपणे उत्पन्नातील २० ते २५ टक्के रकमेची बचत करणे योग ठरते. त्यापेक्षा अधिक करता आली तर उत्तमच.

२. करा नियमित गुंतवणूक
निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी दर महिन्याला बचत करतानाच त्या बचतीची योग्य ती गुंतवणूक करणेही महत्त्वाचे. कारण दरवर्षी महागाई वाढत असते. त्यामुळे आज असलेले रुपयाचे मूल्य आपल्या निवृत्तीनंतर बदललेले, घटलेले असेल. त्यामुळेच आपली जीवनशैली, वृद्धापकाळातील गरजा, भविष्यातील आपल्या योजना, भविष्यातील आपत्कालीन खर्च यांचा विचार आताच करणे आवश्यक आहे. केलेल्या बचतीचे रुपांतर योग्य गुंतवणूकीत केले पाहिजे. म्हणजेच त्यावरील दीर्घकालातील परताव्यामुळे निवृत्तीनंतर आर्थिक स्थैर्य निर्माण होईल. हे नियोजन करण्यासाठी आर्थिक सल्लागारांशी चर्चा करून त्याची अंमलबजावणी केली पाहिजे.

३. निवृत्तीनंतरच्या गरजांसाठीची रक्कम फक्त निवृत्त झाल्यावर वापरा
निवृत्तीनंतरच्या गरजांसाठी केलेली बचत आणि गुंतवणूक बऱ्याच वेळा अचानक उद्भवलेल्या खर्चासाठी किंवा अन्य कारणांनी वेळेआधीच वापरला जातो. त्यातून तात्कालीन उपाययोजना तर होते मात्र भविष्यातील आर्थिक अडचणी निर्माण होतात. कारण असे केल्याने निवृत्तीनंतरचे आयुष्य जगण्यासाठी केलेली आर्थिक व्यवस्था ही आधीच वापरली गेल्याने निवृत्तीनंतर आर्थिक अडचणी निर्माण होतात. वृद्धापकाळात नव्याने उत्पन्न मिळवणे शक्य नसते. त्यामुळे जर आवश्यकतेपेक्षा कमी आर्थिक उपाययोजना केल्यास वृद्धापकाळात मोठ्या आर्थिक अडचणीला सामोरे जाण्याची वेळ येते.

४. वृद्धापकाळातील वैद्यकीय खर्च लक्षात घ्या
तरुण वयातच प्रत्येकाचेच आरोग्य चांगले असते. तब्येतीच्या कुरबुरू नसतात. मात्र जसजसे वय वाढत जाते आणि विशेषत: वृद्धापकाळात आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. वैद्यकीय खर्चात मोठी वाढ होते. काही वैद्यकीय खर्च नियमितपणेच करावे लागतात. अशावेळी जर आपल्या नियोजनात जर या खर्चाचा अंदाज घेतलेला नसेल किंवा त्यासाठीची आर्थिक तरतूद केलेली नसेल तर मोठे आर्थिक संकट निर्माण होण्याची शक्यता असते. याशिवाय दिवसेंदिवस वैद्यकीय सुविधा, औषधोपचार आणि खर्च यात वाढ होत चालली आहे, हे खर्च महाग होत चालले आहेत. त्यामुळे भविष्यात जेव्हा आपण निवृत्त होऊ त्यावेळेस या खर्चांसाठी मोठ्या रकमेची आवश्यकता भासणार आहे. त्यामुळे यासाठी आर्थिक तरतूद आताच करणे योग्य. यासाठी आपण आरोग्य विम्याचा वापर केला पाहिजे. खरेतर आरोग्य विमा हा प्रत्येकासाठीच आवश्यक आहे, मग ते तरुण असो किंवा ज्येष्ठ नागरिक असोत. उतार वयात उद्भवणाऱ्या अनेक गंभीर आजारपणांचा खर्च या विम्यातून भागवला जाऊ शकतो. यासाठी आवश्यक असणाऱ्या रकमेची तरतूद आताच करणे महत्त्वाचे.

5. निवृत्तीनंतरची हौसमौजसुद्धा लक्षात घ्या
तरुण वयात तर आपण पर्यटन किंवा जीवनशैलीमुळे लागणाऱ्या खर्चाची काळजी घेतच असतो. मात्र निवृत्तीनंतरसुद्धा आपण पर्यटन किंवा आपल्या हौसमौजचा आनंद घेत असतो किंवा घेऊ शकतो. किंबहुना बऱ्याचवेळा आयुष्यभरच्या संघर्षात हौसमौज करणे राहूनच गेलेले असते. निवृत्तीनंतर निवांतपणे आयुष्याचा आनंद घेऊ, असे प्रत्येकाच्याच मनात कुठेतरी दडलेले असते. मात्र त्यासाठीची आर्थिक तजवीज तरुण वयातच केली पाहिजे. कारण पैसा फक्त गरजा भागवण्यासाठीच नव्हे तर आयुष्याचा आनंद घेण्यासाठीदेखील आवश्यक ठरतो. जर पुरेसा पैसा उपलब्ध असेल तर निवृत्तीनंतरही आपण चांगल्या जीवनशैलीत जगू शकतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com