'जम्मू-काश्मीर'मध्ये गुंतवणुकीचे आवाहन

वृत्तसंस्था
गुरुवार, 8 ऑगस्ट 2019

'अमूल' आणि 'लेमन ट्री'सुद्धा गुंतवणूक करण्यास उत्सुक 

मुंबई: केंद्र सरकारने जम्मू आणि काश्मीर मधील कलम 370 रद्द केल्यानंतर तेथील गुंतवणूकीचा विषय ऐरणीवर आला आहे. कोटक महिंद्रा बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक उदय कोटक यांनी काश्मीरमधील गुंतवणूकीसंदर्भात वक्तव्य केले आहे. 'जम्मू आणि काश्मीरमध्ये नैसर्गिक साधन संपत्ती आणि मनुष्यबळाची गुणवत्ता मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असून तिथे विकासाची मोठी क्षमता आहे', असे मत उद्य कोटक यांनी मांडले आहे. तर  'त्या परिसरातील दरडोई राष्ट्रीय उत्पन्न (एनएसडीपी) 63,995 रुपये असून ते देशाच्या सरासरीच्या जवळपास 55 टक्के आहे. त्यातही कृषी उत्पादनाचा वाटा 80 टक्के आहे. सरकार आणि उद्योगविश्वाने त्यातही स्थानिक व्यवसायाने मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करून तिथला विकासदर वाढवण्याची आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करत लोकांचे राहणीमान उंचावण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी या क्षणी मोठी गरज आहे', असे मत कॉन्फेडेरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीच्या (सीआयआय) अध्यक्षांनी जम्मू आणि काश्मीरच्या संदर्भात व्यक्त केले आहे. कलम 370 रद्द झाल्यामुळे या राज्याची अर्थव्यवस्था सर्वांसाठी खुली झाली आहे. त्यामुळे अनेक कंपन्यांनी या भागात गुंतवणूकीसाठी पुढाकार घेतला आहे. प्रसिद्द डेअरी अमूलने काश्मीरमध्ये गुंतवणूकीची इच्छा व्यक्त केली आहे.

 स्टीलबर्ड या हेल्मेटचे उत्पादन करणाऱ्या कंपनीने या भागात नवा प्रकल्प सुरू करण्याचा प्रस्ताव दिला आहे. तर हॉटेल व्यवसायातील आघाडीची कंपनी लेमन ट्रीनेसुद्धा दोन नवे हॉटेल गुलमर्ग आणि सोनमर्ग परिसरात बांधण्याचा प्रस्ताव दिला आहे. लेमनट्रीचे या भागात याआधीच तीन हॉटेल कार्यरत आहेत. सध्या जम्मूच्या परिसरात ल्युपिन, सन फार्मा, कॅडिला, कोका कोला, रॅडीसन, डाबर आणि बर्जर पेंट्स यांचे उत्पादन प्रकल्प कार्यरत आहेत. कॉन्फेडेरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीने (सीआयआय) केंद्र सरकारला काश्मीरमधील गुंतवणूकीसंदर्भात दहा कलमी धोरण अजेंडा सुचवला आहे. विविध क्षेत्रातील गुंतवणूकीसंदर्भात आणि विकासासंदर्भात त्यामध्ये सूचना करण्यात आल्या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Uday Kotak calls for investments in J&K