ट्रम्प कोरोनाबाधित झाल्याने जगभरातील शेअर मार्केटमध्ये खळबळ; कच्च्या तेलातही घसरण

वृत्तसंस्था
Friday, 2 October 2020

ट्रम्प कोरोनाबाधित झाल्याचे वृत्त आल्यानंतर अमेरिकन शेअर बाजार आणि आशियाई शेअर बाजारात पडझड झाली आहे. त्याबरोबर कच्च्या तेलाचे दरही कोसळले आहेत. आज (ता.२) गांधी जयंती असल्याने भारतीय शेअर बाजार मात्र बंद आहे. 

नवी दिल्लीः राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीमुळे अमेरिकेतील शेअर बाजारात गेल्या काही दिवसांपासून निराशेचे वातावरण आहे. त्यातच राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलोनिया ट्रम्प कोरोनाबाधित झाल्याचे वृत्त आल्यानंतर अमेरिकन शेअर बाजार आणि आशियाई शेअर बाजारात पडझड झाली आहे. त्याबरोबर कच्च्या तेलाचे दरही कोसळले आहेत. आज (ता.२) गांधी जयंती असल्याने भारतीय शेअर बाजार मात्र बंद आहे. 

आशियातील शेअर बाजारात चीनमधील शांघाई कम्पोजिट तथा हाँगकाँगमधील हँगसँग शुक्रवारी बंद होते. जपानमधील निक्कीची सुरुवात चांगली झाली होती. नंतर ही आघाडी गमावून 0.8 टक्के नुकसान सोसत तो 22,999.75 अंकावर आला. ऑस्ट्रेलियाचा बेंचमार्क एस अँड पी/ एएसएक्स 200 एक टक्क्यांनी कमी होऊन 5,815.90 वर आला. सिंगापूर, थायलंड आणि इंडोनेशियाच्या बाजारातही घसरण झाली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ट्रम्प यांनी टि्वट करत दिली माहिती
ट्रम्प यांनी टि्वट करत कोरोना विषाणूची लागण झाल्याची माहिती दिली. त्यांनी टि्वटमध्ये म्हटले की, आज रात्री, मेलानिया आणि मला कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल आला आहे. आम्ही त्वरीत क्वारंटाइन झालो  असून उपचाराची प्रक्रियाही सुरु केली आहे. आम्ही याचा एकत्रित सामना करु. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

ट्रम्प यांचे डॉक्टर सीन कॉनली म्हणाले की, गुरुवारी सायंकाळी त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. तत्पूर्वी व्हाइट हाऊसच्या वरिष्ठ अधिकारी होप हिक्स या बाधित झाल्या होत्या. हिक्स आणि डोनाल्ड ट्रम्प हे या आठवड्यात अनेक ठिकाणी एकत्रित दिसले होते. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत होप हिक्स एअर फोर्स वनमधून नेहमीच प्रवास करतात. दोन दिवसांपूर्वी झालेल्या प्रेसिडेन्शियल डिबेटमध्येही होप हिक्स हिच्यासह इतर वरिष्ठ सहकारी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: US Asian Share Market Oil Sinks After Trump Corona Test Positive