एअर इंडियाच्या विमान सेवेला लाल झेंडा; अमेरिकेच्या डीओटीकडून नाराजी

पीटीआय
Thursday, 25 June 2020

वंदे भारत मिशनअंतर्गत विमान सेवा दिली जात असताना दोघांकडूनही कराराचे उल्लंघन केले जात असल्याचा आरोप अमेरिकेच्या परिवहन विभागाने केला. त्यामुळे एअर इंडियाला चार्टर्ड फ्लाइटवर अमेरिकेने बंदी घातली आहे.

नवी दिल्ली - एअर इंडियाला आता अमेरिकेच्या डीओटीच्या परवानगीशिवाय अमेरिका-भारत विमान सेवा देता येणार नाही. वंदे भारत मिशनअंतर्गत विमान सेवा दिली जात असताना दोघांकडूनही कराराचे उल्लंघन केले जात असल्याचा आरोप अमेरिकेच्या परिवहन विभागाने (डीओटी) केला. त्यामुळे येत्या २२ जुलैपासून एअर इंडियाला चार्टर्ड फ्लाइटवर अमेरिकेने बंदी घातली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

डीओटीने म्हटले की, अमेरिकी कंपन्यांना उड्डाणास परवानगी न देण्याची भारत सरकारची कृती भेदभावपूर्ण आणि बंधने आणणारी आहे. वंदे भारत मिशनअंतर्गत एअर इंडियाकडून भारत-अमेरिका मार्गावर विशेष उड्डाणे केली जात असताना अमेरिकी कंपन्यांना मात्र या मार्गावर सेवा देण्यास भारत सरकारकडून परवानगी दिली जात नाही. डीओटीच्या निर्णयामुळे तेथे अडकलेले भारतीय सध्यातरी मायदेशी परतू शकणार नाही. विशेष बाब असेल तर त्यासाठी डीओटीची परवानगी घ्यावी लागणार आहे, असे नमूद केले आहे. भारत सरकारकडून अमेरिकी विमान कंपनीच्या चार्टर्ड फ्लाइटला मंजुरी दिली जात नाही आणि त्यांना भारतात सेवा देण्यापासून रोखल्याचे डीओटीने नमूद केले. वंदे भारत मोहिमेंतर्गत नियमाप्रमाणे उड्डाणे केली जात नव्हती आणि त्यामुळे दोन्ही देशांकडून विमान कराराचे उल्लंघन होत असल्याचे मत डीओटीने नोंदवले.

टेनिस जगतात खळबळ : नंबर वन टेनिस स्टार जोकोविचला कोरोनाची लागण

एअर इंडियांकडून विशेष उड्डाणे केली जात होती आणि नागरिकांना थेट तिकीट विक्री केली जात होती. त्यामुळे अमेरिकी विमान कंपन्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत होते. डीओटी म्हटले की, २६ मे रोजी डेल्टा एअरलाइन्स इंटरनॅशनल (डेल्टा) कंपनीने भारताच्या नागरी उड्डयन मंत्रालयास निवेदन करून एअर इंडियाप्रमाणेच सेवा पुरवण्याचा प्रस्ताव मांडला होता. परंतु अद्याप त्यास उत्तर मिळाले नाही. त्यामुळे जेव्हा भारताकडून अमेरिकी विमान कंपन्यांवरील बंदी उठविली जाईल, तेव्हा अमेरिकेकडून या निर्बंधाचा पुनर्विचार केला जाईल, असे म्हटले आहे. दरम्यान, कोरोनामुळे परदेशात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी एअर इंडियाच्या सहकार्याने ६ मे रोजी वंदे भारत मोहीम सुरू केली. याअंतर्गत विशेष विमान सेवा सुरू करण्यात आली. यानुसार ३८९ उड्डाणातून जगभरातील सुमारे एक लाख भारतीयांना परत आणले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: US has banned chartered flights from Air India since July 22

Tags
टॉपिकस